राऊतांचे राजकारण थुकरट वळणावर!

संजय राऊत विरोधात बसल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या नावाने थुंकतायत.

राऊतांचे राजकारण थुकरट वळणावर!

महाराष्ट्राच्या राजकारणात इतके वाईट दिवस कधीच नव्हते. पत्रकारांसमोर भाषण देण्यापासून सुरू झालेले चाळे आता कॅमेरासमोर थुंकण्यापर्यंत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी त्याचा निषेध केला तेव्हा त्या धरणात मुतण्यापेक्षा थुंकणे चांगले या शब्दात त्याचे समर्थन करण्यात आले. सर्वसामान्यांना शिसारी येईल असे वर्तन आहे. कधी काळी राजकारणाला वळण देण्याची भाषा करणाऱ्या राऊतांचे राजकारण आत थुकरट वळणावर आले आहे.

 

मी पत्रकार आहे, असे सांगताना अभिमान वाटेल असा एक जमाना होता. परंतु चॅनलच्या मालकांनीच पाकिट पत्रकारिता सुरू केल्यामुळे पत्रकारितेचे पोतेरे झाले आहे. कोविड महामारीच्या काळात चॅनलवाल्यांनी ज्यांच्या कपाळी सुसंस्कृत आणि विचारी मुख्यमंत्र्याचा टिळा लावला, घरी बसूनही ज्यांचे बेस्ट मुख्यमंत्री म्हणून कौतुक केले, त्यांचे चेले आज पत्रकारांच्या कॅमेरासमोर थुंकण्याचे काम करत आहेत.

 

पत्रकारिता करून नेते झालेल्या संजय राऊतांचे हे कर्म. हेच राऊत कधी काळी महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीबद्दल कॅमेरासमोर लेक्चर द्यायचे. महाराष्ट्राची राजकारणात विरोध असतो शत्रुत्व नसते, अशी यांची भाषा होती. तेच संजय राऊत विरोधात बसल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या नावाने थुंकतायत. एखादा शत्रूही करणार नाही, असे वर्तन करतायत. ज्यांच्या मतावर ते राज्यसभेचे खासदार झाले, त्या एकेकाळच्या सहकाऱ्यांशी हे वर्तन आहे.

 

सुरुवात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यापासून केली. त्यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर राऊत थुंकले. त्यानंतर संजय शिरसाट यांच्याबाबत त्याची पुनरावृत्ती झाली. टीव्ही ९ च्या पत्रकाराने संजय शिरसाट यांच्याबद्दल प्रश्न केल्यानंतर राऊत कॅमेरासमोर थुंकले. अजित पवारांनी जेव्हा या कृतीवर टीका केली तेव्हा राऊतांनी थुंकण्याचेही समर्थन केले. धरण्यात मुतण्यापेक्षा थुंकणे चांगले, असा निलाजरा प्रतिवाद केला.

 

अजित पवारांनी जेव्हा धरणात मुतण्याचे ते वादग्रस्त वक्तव्य केले होते, तेव्हा टीका झाल्यानंतर त्यांना किमान लाज तरी वाटली होती. त्यांनी एक दिवसाचे उपोषण करून आत्मशुद्धी केली होती. भले ते राजकीय नाटक असेल, परंतु लोकलाजेसाठी त्यांनी ते केले होते. स्वत:च्या करणीबाबत जाहीर खेद व्यक्त केला होता. बरं ते फक्त बोलले होते, त्यांनी धरणात प्रत्यक्ष कृती केली नव्हती. इथे तर संजय राऊत दोन वेळा पचापचा थुंकले.

 

तरीही ना खेद असत ना खंत. त्यांनी लाजलज्जा सगळी मुंब्र्याच्य खाडीत विसर्जित केलेली दिसते. त्यांनी थुंकण्याचेही निर्लज्ज समर्थन केले आहे. पत्रकारांसमोर जाहीर शिवीगाळ करून त्यांनी आधी आपल्या मर्दानगीचे दर्शन घडवले होते. तिथे पाया घातला गेला होता, आता पत्रकारांसमोर थुंकून त्यांनी कळस चढवला आहे. कुणीही यावे आणि थुंकून जावे अशी पत्रकारितेची परीस्थिती आहे. थुंकी झेलून पुन्हा पत्रकारांना बूम घेऊन राऊतांच्या समोर नाचावे लागणार ही त्यांची मजबुरी आहे. चॅनलच्या मालकांना कणा नाही तर पगारी पत्रकाराची मान ताठ कशी असेल? हीच परीस्थिती राहिली तर उद्या न आवडणारा प्रश्न विचारल्याबद्दल एखाद्या पत्रकाराला मारहाण करायला राऊत कमी करणार नाहीत.

 

शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी पत्रचाळ प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. या प्रकरणात फक्त राऊत नाही, तर काही बिल्डर आणि अधिकारी गुंतलेले आहेत. त्यांची नावे मी त्या समितीसमोर देईन असे शिरसाट म्हणाले. राऊतांची बडबड सुरू राहिली तर लवकरच त्यांची रवानगी लवकरच तुरुंगात होईल, असे विधान शिरसाट यांनी केले होते. शिरसाट हे वारंवार पत्राचाळीचा विषय लावून धरतायत. राऊतांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करतायत. त्याचा परिणाम राऊतांच्या थुंकण्यात झाला.

हे ही वाचा:

मुंबईत तामिळनाडूच्या हिरे व्यापाऱ्याला लुटणारी टोळी जेरबंद

भारताच्या गगनयान मोहिमेत अंतराळवीरांच्या मेनूत ‘इडली’ नाही

ओदिशा अपघातातील पीडितांना वाचविण्यासाठी १४ तासांचा अथक संघर्ष

कमल हसन म्हणतात, मी कोणत्याही चित्रपटावर बंदी घालणार नाही!

सर्वसामान्य माणसाला शिसारी यावी इतक्या खालच्या पातळीला महाराष्ट्राचे राजकारण आले आहे. राऊतांचे यात मोठे योगदान आहे. राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, इथपर्यंत लोक बोलू लागले आहेत. ‘मी नंगा माणूस आहे’, हे विधान राऊतांनी काही दिवसांपूर्वी केले होते. राऊत आता त्याची प्रात्यक्षिकं दाखवू लागले आहेत. शहाण्या माणसाचेही कधी कधी स्वत:वरील नियंत्रण सुटते, तेव्हा एखादा वावगा शब्द तोंडातून जातो. परंतु एखादा माणूस कायम नियंत्रण सुटलेल्या स्थितीत कसा काय असू शकतो?

 

‘संजय राऊतांच्या जिभेवर संशोधन करण्यासाठी मी जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहीणार आहे’, असे नितेश राणे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. खरे तर राऊतांच्या मेंदूवर संशोधन व्हायला हवे, जो कॅमेरासमोर थुंकण्याची, शिवीगाळ करण्याची बुद्धी देतो.या निलाजरेपणावर क़डी म्हणजे राऊतांनी स्वत:ची तुलना स्वातंत्र्यवीर सावरकरांशी केली. म्हणे सावरकरांनी बेईमान्यांवर थुंकणे ही संस्कृती असल्याचे दाखवून दिले होते, असे विधान केले. राऊतांनी स्वत: ची तुलना सावरकरांसोबत करून जो अपमान केलाय, तेवढा अपमान तर राहुल गांधी यांनीही केला नसेल.

 

 

भ्रष्टाचार प्रकरणी राऊत तुरुंगात गेले होते तेव्हाही त्यांनी स्वत:ची तुलना क्रांतिकारकांसोबत केली होती. ज्या पत्रकारांनी राऊतांची शिवीगाळ झेलली, थुंकी झेलली त्यांना आणखी काय काय झेलायचे शिल्लक आहे, ते देवच जाणे.
हिंदी सिनेमात असे अनेक व्हीलन झाले, ज्यांना पडद्यावर पाहून लोकांच्या डोक्यात तिडीक जायची. लोक शिव्या घालायचे. राऊतांनी त्यांच्यावरही कडी केली आहे. खलनायकी चाळेही सौम्य वाटावे असे त्यांचे वर्तन झाले आहे. राऊतांचे वर्तन शिसारी आणणारे आहे, त्यांचे सहकारी, मित्र इतकंच काय, त्यांचे कुटुंबीय तरी त्यांच्या थुंकण्याचे समर्थन करू शकतील का?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version