काँग्रेसने देशात भाषावार प्रांत रचनेचे सूत्र स्वीकारले. अवघ्या देशात लागू केले. अपवाद होता फक्त महाराष्ट्राचा. १०६ हुतात्म्यांना रक्त सांडावे लागले तेव्हा १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य प्रत्यक्षात आले. ज्यांनी महाराष्ट्रात १०६ हुतात्म्यांचे बळी घेतले त्या काँग्रेस पक्षाच्या मांडीवर बसलेले आज पुन्हा मुंबई तोडायचा डाव… अशी घासलेली आरोळी ठोकतायत.
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जेव्हा मुंबईत येतात तेव्हा छातीत चर्र होते. ते मुंबई तोडायलाच येतात या भयाने मुंबईकर व्याकूळ होतो’, असे अकलेचे तारे ‘सामना’मध्ये तोडण्यात आले आहेत. ज्यांनी मुंबईतील मराठी माणसाला देशोधडीला लावले त्यांच्या तोंडी ही भाषा. या महाराष्ट्र द्रोह्यांचा एकदा सविस्तर पंचनामा करण्याची गरज आहे. मुंबईतला मराठी टक्का इतका कसा आणि कुणाच्या कारकीर्दीत रोडावला याचा जाब विचारण्याची गरज आहे.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत पत्राचाळीच्या प्रकरणात जेलची हवा खाऊन आले. त्या पत्राचाळीतल्या मराठी माणसांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे पाप राऊतांचेचे आहे. ईडीच्या कारवाईत राऊतांवर धाडी पडल्यानंतर ते वापरत असलेल्या आलिशान कार बिल्डरच्या मालकीच्या असल्याचे उघड झाले. बिल्डरचे नाव मेहता आहे, मराठे नाही. ते गुजराती आहेत, मराठी नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नावावर आलिशान गाड्या चालवतात त्या गाड्या कोणाच्या आहेत?
गुजराती बिल्डरांचे मीठ खायचे, इमान त्यांच्याशी बाळगायचे आणि मराठीचा धगधगता अभिमान तोंडी लावण्यापुरता. महापालिकेत २५ वर्षे सत्ता राबवणाऱ्यांनी इथे मराठी कंत्राटदारांना दुर्मिळ प्रजाती बनवले. गुजराती कंत्राटदार इथली सूत्र हलवतात. त्यांच्याच ओंजळीने पाणी पिण्याची ज्यांना सवय झाली ते कोणत्या तोंडाने मराठीचा गजर करतायत? त्यांना तुंबड्या भरणारा गुजराती बिल्डर चालतो, परंतु ३७० कलम हटवून देश एकसंध करणारा गृहमंत्री चालत नाही. कारण हा गृहमंत्री त्यांच्या काळ्या पैशाच्या भानगडी लोकांसमोर आणतो.
आरेमध्ये एक ‘रॉयल’ गृह प्रकल्प निर्माण झाला. बिल्डर मराठी नव्हता. पण या प्रकल्पाबाबत ओरडा झाला नाही. कारण त्याच्याशी याच लोकांचे साटेलोटे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा बनवताना ज्यांना बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी एखादा मराठी चेहरा शोधता आला नाही ते मराठी माणसाच्या गप्पा करतात.
मविआचे सरकार आल्यानंतर किती मराठी माणसांचे भले केले यांनी. युवराज आदित्य ठाकरेंना नाईट लाईफची स्वप्न पडत होती, तीही मराठी माणसाच्या भल्यासाठीच का? किती मराठी माणसांना पब संस्कृती आणि नाईट लाईफचे कौतुक आहे?
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यकाळात पालिकेची शिक्षक भरती करताना दहावीपर्यंत मराठीत शिक्षण झाल्यामुळे नोकरी नाकारणारे हेच होते. हे तरुण कित्येक दिवस आझाद मैदानात निदर्शने करत होते. कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
पालिकेच्या मराठी शाळांचा टक्का यांच्या काळात पडला. गोरगरीब मराठी मुलांना टॅब देण्याच्या नावाखाली यांनीच झोल केले. पालिकेच्या मराठी शाळांची दुरवस्था ठाकरे सरकारला दिसत नव्हती कारण ते उर्दूचा उद्धार करण्यासाठी उर्दू भवन बांधायचा घाट घालत होते.
प्रभादेवीत टॉवरवाल्या अमराठी माणसांना त्रास होतो म्हणून इथल्या भूमिपुत्र कोळी महिलांना हटवण्याचे काम करणाऱ्यांना मराठी माणसांच्या अस्मितेच्या बाता करणे शोभत नाही. अमित शहा मुंबईत आल्यावर सर्वसामान्य मुंबईकराला चर्र होत नाही, पण मनी लाँडरींगवाल्यांना मात्र चर्र होते. याच अमित शहा यांच्या घरी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा दिसते. ज्यांच्यावर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी सतत चिखलफेक करीत असतात. आणि मराठीचे तथाकथित आभिमानी ही टीका तोंड आवळून ऐकत असतात.
नरेंद्र मोदी यांना भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू करण्याआधी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. शिवछत्रपतींच्या इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत युती करण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केले. कोणत्या तोंडाने ही मंडळी मराठीचा गजर करतायत?
हे ही वाचा:
एप्रिल महिन्यात ‘इतक्या’ कोटींचे विक्रमी जीएसटी कलेक्शन
‘उबाठाचा प्रवास ‘ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे’, भविष्यात नरे पार्कातच त्यांच्या सभा होतील
कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाचे समान नागरी कायद्याचे आश्वासन
डोंबिवलीतल्या कैवल्यवारीत ‘अवघा रंग एक झाला’
अमित शहा यांच्या नावाने बोटं मोडून शिउबाठाला महापालिकेच मतं मिळणार नाहीत. राज्य हातातून गेले, पक्ष गेला आता महापालिकापण हातून जाणार असे चित्र आज तरी दिसते आहे. त्यातूनच अमित शहा यांना लक्ष्य केले जाते आहे.
अमित शहा ही ठाकरेंची दुखती रग बनली आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराची सूत्र दिल्लीतून हलवणारे अमित शहा हेच होते, याची सल या जळफळाटामागे आहे.
मुंबई महाराष्ट्राचे हृदय आहे. मुंबई तोडण्याचा डाव… अशी आवई निवडणुकीच्या आसपास उठू लागते हे मुंबईकरांना इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर समजू लागले आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही. परंतु मुंबई महापालिका नावाची सोन्याची कोंबडी मात्र हातून जाणार आहे, त्यामुळे टक्केवारीवाले बोंबा ठोकतायत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)