शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिलेदार खासदार संजय राऊत रोज भाजपावर जहरी टीका करतायत. शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे, हे सरकार १५ ते २० दिवसात कोसळेल, अशी संजय राऊतांची ताजी भविष्यवाणी आहे. ठाकरेंनी त्याला दुजोरा दिला आहे. परंतु या दोघांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बोळा फिरवला आहे.
पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी तर महाविकास आघाडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पक्ष पाठीशी उरला नसला तरी आपल्या पाठीशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कुमक आहे. तिघे मिळून भाजपाला सहज नमवू, यावर उद्धव ठाकरे यांचा बहुधा ठाम विश्वास आहे. परंतु पवारांच्या भरवशावर भाजपावर वज्रमूठ उगारणारे ठाकरे कधी तरी अचानक मागे वळून पाहतील आणि पाठीशी असलेले लोक अचानक गायब झाल्याचे दिसेल, अशी शक्यता सध्या बळावली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि छगन भुजबळांचे ताजे वक्तव्य पाहिले तर याची खात्री पटावी. पाचोऱ्यात काल रविवारी महाविकास आघाडीची आणखी एक वज्रमूठ सभा झाली. खेड, मालेगाव, छत्रपती संभाजी नगर, नागपूर आणि आता पाचोरा. मुंबईतही १ मे रोजी वज्रमूठ सभा आहे. प्रत्येक सभेत वज्रमुठ उंचावून भाजपाला बेटकुळ्या दाखवणारे सभा संपल्यानंतर तीच वज्रमूठ एकमेकांवर उगारतात असे चित्र आहे. सभेच्या दुसऱ्या दिवशीच मविआचे आधारवड शरद पवार यांनी केलेले विधान ठाकरेंच्या मेंदूला मुंग्या आणणारे आहे.
पवारांनी सांगून टाकलंय की, ‘२०२४ मध्ये एकत्र लढण्याची इच्छा आहे, परंतु फक्त इच्छा असणे पुरेसे नाही. लढणार कि नाही, हे आताच कसे सांगणार? अजून जागावाटपाची चर्चाच सुरू झालेली नाही.’ बदल हाच जगातला एकमेव स्थायीभाव आहे, याची जाणीव फक्त पवारांनाच आहे. आज आहे, ते उद्या असेलच याची शाश्वती नाही. हे फक्त पवारांसारखा द्रष्टाच सांगू शकतो.
पवारांचा द्रष्टेपणा शिउबाठाला भोवळ आणणारा आहे. छगन भुजबळ यांनी तर पवारांवर कडी केली आहे. ‘१६ आमदारांना अपात्र ठरवले तर सरकार कसे कोसळेल, फार फार तर मुख्यमंत्री बदलेल. शिंदे-फडणवीस सरकारकडे १६५ आमदार आहेत, त्यातले १६ आमदार गेले तरी सरकार कोसळत नाही.’ हे भुजबळांनी सांगितलेले गणित आहे. जे त्यांना कळतं ते उद्धव ठाकरे आणि राऊतांना कळू नये यात आश्चर्य नाही. कारण या दोघांनी डोळ्यावर भाजपा द्वेषाच्या पट्ट्या बांधल्या आहेत. त्यामुळे कळत असले तरी वळत नाही.
हे ही वाचा:
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना कावेरी मोहीम आणणार सुरक्षित मायदेशी
गावातील लोकांमध्ये फूट पाडून राजकीय पक्षांनी आपली दुकाने चालवली
अश्लील रॅप गाण्याच्या चित्रीकरणाच्या विरोधात अभाविपची पुणे विद्यापीठात जोरदार निदर्शने
नरेंद्र मोदींची लोकप्रियता उद्धव ठाकरेंची पोटदुखी
मविआ जशी २०१९ च्या निवडणुकीनंतर अचानक निर्माण झाली. तशी २०२४ च्या निवडणुकी आधी अचानक विसर्जित होऊ शकते. कारण आघाडीत लाथाळ्या जोरात सुरू आहेत. मविआच्या मार्गाने पुन्हा सत्ता मिळू शकते, यावर बहुधा मविआतील नेत्यांचाच विश्वास उरलेला नाही. महाविकास आघाडी टिकावी ही उद्धव ठाकरे यांची मनापासून इच्छा आहे. परंतु अजित पवार मविआ सोडून बाहेर पडावेत म्हणून संजय राऊतांनी ताकद लावली आहे. राज्यात पुतण्यांनी घोटाळे केले आहेत, हे त्यांचे ताजे वक्तव्य वानगीदाखल सांगता येतील.
नाना पटोले देखील अजित पवारांना ठोकताना दिसतात. इथे दादांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिथे नानांनी मुख्यमंत्री बनायला १४५ आमदार लागतात, याची आठवण करून दिली. एकत्र राहिलो तर सत्ता मिळेल, असा आशावाद असल्यामुळे हे तिन्ही पक्ष लाथाळ्या करूनही एकत्र आहेत. कसब्याच्या विजयामुळे त्यांचा आशावाद अधिक बळकट झाला आहे. परंतु राजकारणातील समीकरणे आणि नियमही बदलत असतात. कोणाच्या ध्यानीमनी नसताना शिवसेनेत फूट पडली, तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते.
बारामतीच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी दोन भूकंपाचे भाकीत केले आहे, त्यातला एक भूकंप त्यांच्याच पक्षात होऊ शकतो. फोडाफोडीचे राजकारण कोणाची स्ट्रॅटेजी असेल तर त्यांना करू द्या, या संदर्भात आम्हाला आमची भूमिका घेऊ द्या, ती भूमिका काय असेल हे आज सांगणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिलेली आहे. पवारांचे आयुष्य फोडाफोडीत गेले. तेच पवार आज त्यांच्या पक्षाच्या फुटीबाबत इतकी सयंत भूमिका घेतायत. कारण जे घडतंय ते त्यांच्या नियंत्रणाबाहेरचे आहे. डेथ वॉरंट निघालेले आहे, परंतु ते कुणाचे हा प्रश्न आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट भुजबळांनी तूर्तास तरी निकाली काढले आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)