गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. दिल्लीत आज निवडणूक आयोगापुढ या संदर्भात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणीला प्रारंभ झाला आहे. तत्पूर्वी या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. राजकारणात एकमेकांबद्दल टीका टिपणी करण हा विषय वेगळा असतो. त्याकडे लोक तितक्याच गांभीर्याने बघत असतात. मात्र निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र संस्थेवर अशा पद्धतीने टीकात्मक बोलणे किंवा त्यांच्या भूमिकेवर काही प्रश्न निर्माण करणे हे देशातील लोकशाहीवर, घटनेवर अविश्वास दाखविण्यासारखे आहे. याचे भान किमान लोकशाहीच्या पवित्र मंदिरात बसणाऱ्यांनी तरी ठेवणं अपेक्षित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातील सुनावणी प्रक्रिया सुरु झाली. या सुनावणीला ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः उपस्थित होते. या सुनावणी आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख म्हणाले की, निवडणूक आयोगाने कोणाच्याही दबावात न येता निर्णय घेतला तर पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. याचा अर्थ काय? निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्याचे अधिकार वेगळे आहेत. ज्याप्रमाणे न्यायालयावर कोणी दबाव आणू शकत नाही तशाच पद्धतीने निवडणूक आयोगावारही कोणी दबाव आणू शकत नाही. यापूर्वी निवडणूक आयोगाची ताकद काय असते ती देशाने पहिली आहे. अनेक प्रकारचे दबाव झुगारून देत निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असलेल्या आपल्या देशात खऱ्या अर्थाने निकोप निवडणुकांचे पर्व सुरु केले. निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैर प्रकारांना चाप लावण्याच काम शेषन यांनी केलं होतं. याची आठवण सर्वच राजकीय पक्षांना आहे. हे सांगायचं कारण म्हणजे सत्तेत असलेले सरकार निवडणूक आयोगावर अशा पद्धतीने कोणताही दबाव आणू शकत नाही. कोणी आणलाच तर त्याला ही स्वतंत्र संस्था भिक घालत नाही.
भारतीय राज्य घटनेमध्ये निवडणूक आयोगाला, त्यांच्या अधिकारांना काही विशिष्ठ स्थान आहे, हे कोणालाच विसरून चालणार नाही. आज केवळ आपला पक्ष अडचणीत आला. आपलेच लोक आपल्याला सोडून गेले आणि आपण सतेत्तून बाहेर पडलो म्हणून खापर कोणावर फोडायचं तर देशातील स्वतंत्र संस्थांवर, असाच हा प्रकार म्हणावा लागेल. आयोग हा सुद्धा न्यायालयाच्याचं भूमिकेत आहे. प्रत्येक जण आपली बाजू कशी श्रेष्ठ आणि योग्य आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठीच युक्तिवाद होत असतात. शेवटी सर्व बाजूंनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निकाल दिला जात असतो. अर्थात त्यावेळी तांत्रिक बाबींची पडताळणीही केली जात असते. ही तांत्रिक प्रक्रिया असली तरी जगासमोर बोलतानाही प्रत्येक जण निकाल आपल्याच बाजूने येईल, अशी खात्री बाळगत असतो. याचा अर्थ असा नाही की आपण खात्री बाळगली म्हणजे निकाल आपल्या बाजूनेच येईल . शेवटी तो मेरिटवर दिला जात असतो. त्यामुळे दिलेला निकाल स्वीकारणं किंवा त्या विरोधात अपील करण इतकच हातात शिल्लक असते. त्यामुळे अनिल देशमुख जे म्हणाले आहेत की निवडणूक आयोगाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्णय दिला तर निकाल आमच्या बाजून लागेल, हे विधान इथ गैर लागू होत.
या शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये सुनावणीसाठी हजर राहणार आहेत, त्यामुळे निवणूक आयोगाची कसोटी आहे. आता प्रश्न असा आहे की, निवडणूक आयोग सुनावणी वेळी कोण उपस्थित आहे? यावर निकाल देणार की युक्तीवादावेळी दोन्ही बाजूकडून सादर करण्यात येणारी कागदपत्र असतील किंवा त्यांचे म्हणणे आहे ते ऐकून निकाल देणार आहेत.
वास्तविक शरद पवार यांनी आयोगाच्या कार्यालयात सुनावणीवेळी उपस्थित राहायलाच पाहिजे असे नाही पण ते उपस्थित राहिले आहेत. आता ते का उपस्थित राहिले हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. पण त्यांच्या उपस्थित असण्याचा आणि निवडणूक आयोगाची कसोटी लागण्याचा काय संबंध? संजय राऊत यांनी जोडला ते संजय राऊत यांनाच ठाऊक. त्यात ते जाता जाता अस बोलले की कोणीतरी ऐरा गेरे उठतो आणि पक्षावर ताबा सांगतो. यामध्ये त्यांना अजित पवार यांना ऐरा गेरे म्हणायचं आहे.
हे ही वाचा:
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर
गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी
संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही
खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स
अजित पवार यांनी ज्यावेळी पक्षावर ताबा सांगितला तेव्हा त्यांचाकडे आमदारांचे समर्थन होते हे विसरून चालणार नाही. ज्यावेळी मुंबईतील वांद्रे येथे त्यांनी भूमिका स्पष्ट करणारी सभा घेतली तेव्हा त्यांच्या सभेला राज्यभरातून कार्यकर्ते, समर्थक आले होते, हे सगळ्या जगाने पाहिले आहे. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्वतः अजित पवार हे लोकांच्यातून निवडून येणारे नेते आहेत. त्यांच्या बरोबर गेलेले सर्व बडे नेते हे सुद्धा लोकांच्यातून निवडून येतात. त्यांना लोकांचा पाठींबा आहे. संजय राऊत यांनी अजूनपर्यंत एक निवडणूक लोकांच्यात जाऊन लढलेली नाही. नेहमी ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी लोकांच्यातून निवडून येणाऱ्यांना ऐरे गेरे अस संबोधणं हे न शोभणारे आहे. संजय राऊत हे जेव्हा लोकांच्यात जाऊन निवडणूक लढवतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की, जेव्हा आपण स्वतः उमेदवार असतो तेव्हा निवडणूक जिंकण हे किती जिकिरीच असत. नाहीतर देशातील महत्त्वाच्या संस्थाना नाव ठेवण असो किंवा लोकांचे पाठबळ असणाऱ्या नेत्यांना ऐरा गेरे म्हणण असो अशा तोंडाच्या वाफा घालवण्यात काय अर्थ आहे.