काँग्रेस नेते राहुल गांधींना देश विनाकारण हसतो, महाराष्ट्रातही राहुल गांधी यांच्या एआय कॉप्यांचे पिक आले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांना काय काय प्रश्न पडतात पाहा. महाराष्ट्र विधानसभेत काल मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्धार महायुती सरकारने व्यक्त केला. अनेकांना प्रश्न पडलाय की हे आरक्षण टिकणार की नाही? मात्र रोहित पवार हे बुद्धीमान असल्यामुळे त्यांना असा काही प्रश्न पडलाय की खुद्द शरद पवार चक्रावले असावेत.
मराठा समाजाचा टक्का राज्यात २८ टक्के असताना त्यांना फक्त १० टक्के आरक्षण का? असा सवाल रोहित पवार यांना पडला आहे. मराठा आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील म्हणतात महाराष्ट्रात ६ कोटी मराठा आहेत. रोहित पवारांनी जरांगेंनी जाहीर केलेला टक्का आकडा अगदीत खाली आणला आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी असल्याचे गृहित धरले तर जरांगे यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात ५० टक्के मराठा आहेत. रोहित पवार यांनी गायकवाड आयोगाच्या हवाल्याने हा टक्का अवघा २८ वर आणला आहे. महाराष्ट्रात २८ टक्के मराठा समाज असताना आरक्षण १० टक्के कसे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. म्हणजे आकड्यांचा घोळ फक्त राहुल गांधी घालतात असे नाही. पच्चतीस लाख, ढाई हजार पाचसौ, साडे तीन लाख ५० हजार, असे मानव जातीला ज्ञात नसलेले अनेक आकडे राहुल गांधी यांच्याकडे आहेत. या गणित कौशल्याचे ते वेळोवेळी प्रदर्शनही करीत असतात. रोहित पवारांचे गणित आणि त्यांची समज राहुल गांधी यांच्या वर ताण आहे.
काँग्रेस आघाडीच्या काळात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता असेही त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना १३ टक्के आरक्षण दिलं होतं, आता महायुती सरकारने १० टक्के आरक्षण दिलं आहे. भाजपा मराठ्यांचे आरक्षण कमी कमी करते आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता.
रोहित पवारांचे हे विधान म्हणजे अज्ञान म्हणावे की कांगावा? काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत अखेरच्या सहा महिन्यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात आरक्षण दिलेले नव्हते. मग जे दिलेलेच नव्हते, जे मिळालेच नव्हते ते कमी करण्याचा प्रश्नच येतो कुठे? भाजपाच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून मराठ्यांसह धनगर, मुस्लीम आणि लिंगायत यांना आरक्षण देता आले असते परंतु मोदींशी बोलण्याचे धाडस त्यांच्यामध्ये नाही, असा दावाही रोहीत पवार यांनी केलेला आहे.
रोहित पवार हे आमदार आहेत, त्यांना सरकारला प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. घरा घरातील लहान मुले प्रश्न पडले की उत्तर आधी घरच्या वडीलधाऱ्यांना विचारतात. त्यामुळे थोडा प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर रोहित पवार यांनी हा प्रश्न चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात दहा वर्ष मंत्री असलेल्या शरद पवारांना विचारायला हवा होता. बहुधा आजोबांना प्रश्न विचारण्याचे धाडस रोहित पवारांना नाही. कारण मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत आरक्षण देणे शक्य नाही, असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितलेले आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याची गरज नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे अनेकदा मांडली आहे. जे तुम्हाला झेपले नाही ते इतरांनी करावे ही अपेक्षा बाळगणे हा मुळात निलाजरेपणा आहे. तो करताना आपल्याला झेपले नव्हते ही कबूली तरी द्या.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शहाणपण शिकवण्याइतपत रोहित पवारांचे वय नाही, त्यांचा अनुभव नाही. संघर्ष यात्रा काढताना विहरीत पोहण्याची प्रात्यक्षिके दाखवण्याइतके ते सोपेही नाही. चीन भारतात घुसखोरी करतोय, चीनने भारताची भूमी कब्जात घेतली आहे आणि त्याला मोदी जबाबदार आहेत, असा आरोप राहुल गांधी करतात तेव्हा ते हास्यास्पद वाटतात. कारण चीनची भारतात झालेली घुसखोरी हे जवाहरलाल नेहरुंचे पाप आहे, हे जगाला ठाऊक आहे. तसेच मराठा समाजाला आजतागायत आरक्षण मिळाले नाही हे पवारांसारख्या मराठा नेत्यांचे पाप आहे. कैक मराठा नेते वर्षोनुवर्षे महाराष्ट्राची सत्ता उबवत असताना मराठा समाजाला आज आरक्षणाचा लढा लढावा लागतोय हे कोणाचे कर्तृत्त्व? याची उकल रोहित पवारांना होत नसेल तर त्यांनी आजोबांना विचारून घ्यावे एकदा.
हे ही वाचा:
टीएमसी नेत्यांवर महिलांचे गंभीर आरोप
शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत शेतकऱ्याचा मृत्यू
शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; एक मृत्यू, १२ पोलिस आणि ५८ शेतकरी जखमी
मराठा आरक्षण पुढे न्यायालयात टिकेल न टिकेल, परंतु एका ब्राह्मणाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न तर केले. शरद पवारांसारखा हा विषय नाही झटकून तरी टाकला नाही. मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होण्यापूर्वी रोहित पवार त्यांच्या संपर्कात होते. आंदोलनादरम्यान त्यांनी अनेकदा जरांगेंची भेट घेतली. त्यांचे समर्थन केले. ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका असेल तर, हे त्यांनी जरांगेंना सांगायला हवे होते. परंतु शिव्या खाव्या लागतील या भीतीने बहुधा रोहित पवार इथेही गप्प राहिले. जरांगे आता पुन्हा उपोषण आणि आंदोलनाचा नवा सीझन सुरू करणार आहेत, तेव्हा तरी रोहित पवारांनी आपली आरक्षणासंबंधी भूमिका नेमकी काय हे त्यांना सांगून पाहावे.
रोहित पवार यांची बडबड महाभारतातल्या विराट युद्धाआधी बायकांच्या गराड्यात बसून आपल्या पराक्रमाच्या कथा सांगणाऱ्या राजकुमार उत्तर यांच्यासारखी रोहित पवार यांची बडबड आहे. आपआपल्या कोंडाळ्यात बसून अशी बडबड करायला कुणाचे काय जाते?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)