वर्षभरात सहाव्यांदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकार त्यांची दखल घेत नाही, अशा प्रकारचा आरोप केला जातो आहे. ओबीसी कोट्याला धक्का लावणार नाही, असे सरकारचे नेते उपोषणा दरम्यानही सांगत आहेत. याबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतीली संदिग्धता नाही. त्यामुळे जरांगेच्या उपोषणाचे लाभार्थी असलेल्या विरोधकांनी तरी त्यांची भेट घेऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ असे आश्वासन द्यावे. त्यांना ज्यूस पाजावा आणि त्यांचे उपोषण सोडवावे. माजी खासदार संभाजी राजे जरांगेच्या प्रकृतीमुळे प्रचंड चिंतातूर झाले आहेत, त्यांनी विरोधकांवर उपोषणाच्या मुद्द्यावरून घणाघात केलेला आहे.
अंतरावली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची संभाजी राजे यांनी भेट घेतली. उपोषणाच्या बाबतीत सरकार हातावर हात ठेवून बसले असताना विरोधकही बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. संभाजी राजे विरोधकांना झापतायत ते अगदी योग्य. कारण तेच जरांगेंचे लाभार्थी आहेत. जरांगे आज मैदानात आहेत ते विरोधकांमुळे. जरांगेंचे आणि विरोधकांचे लक्ष्य सुद्धा एकच आहे, ते म्हणजे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस. मविआ सत्तेवर असताना जरांगे निवांत पडून होते. मविआची सत्तेवरून गच्छंति झाल्यावर ते अंगात संचारल्यासारखे मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण करू लागले.
गेली ५० वर्षे शरद पवार हे मराठा आरक्षणासाठी लढत होते. चार वेळा मुख्यमंत्री असताना केंद्रात दहा वर्षे मंत्री असताना, १९९९ चे २०१४ महाराष्ट्रात सत्तेवर असताना शरद पवार मराठा आरक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन लढत होते. परंतु भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पवारांना यश मिळाले नाही. महाराष्ट्रातील सगळे सहकार सम्राट पवारांच्या ओजंळीने पाणी पित असताना फडणवीसांमुळे मराठे गरीब आणि वंचित राहीले. जरांगेंना हे पाहावले नाही. अखेर शरद पवारांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. फडणवीसांवर ते दिवसरात्र टीका करू लागले.
जरांगे यांना उपोषणाला बसवणारे नेते म्हणून रोहित पवार आणि राजेश टोपे या नेत्यांकडे बोट दाखवले जाते. अंतरावलीत पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर घरी परतलेल्या जरांगेंची समजूत काढून त्यांना पुन्हा उपोषणाला बसवण्याचे कामही रोहित पवार यांनी केले. ही बाब त्यांनी माध्यमांसमोर मान्यही केलेली आहे. उपोषणाचे चुंबूगबाळे आवरून घरी परतलेले जरांगे जर रोहित पवारांमुळे पुन्हा मैदानात उतरतात, याचा अर्थ ते रोहित पवारांच्या अर्ध्या वचनात आहेत. जरांगेचे खरे सूत्रधार राजेश टोपे आणि रोहित पवार हेच आहेत. त्यामुळे ज्यूस पाजण्याची जबाबदारी रोहित पवारांचीच.
रोहित पवारांनी फक्त जरांगेना नुसता इशारा करावा. जरांगे लगेच उपोषण मागे घेतील. फक्त उपोषण करून कसे चालेल? राज्यभरात दौरा करून देवेंद्र फडणवीसांमुळे कसे मराठ्यांचे नुकसान झाले हेही सांगायला हवे. त्यामुळे रोहित पवारांनी ज्यूस घेऊन जावे. फक्त तो ज्यूस शुगर फ्री असावा याची पवारांनी काळजी घ्यावी. उपोषणाला बसल्यानंतर सर्वसामान्यांची शुगर लेव्हल घसरते. जरांगेंची मात्र वाढल्याचे वृत्त आहे. कशी ते लोकांना समजण्याच्या पलिकडचे आहे. बहुधा गोधडीचा चमत्कार असावा. असो, शुगर कशी वाढली त्यापेक्षा ती वाढलेली आहे हे महत्वाचे. त्यामुळे शुगर फ्री ज्यूस पाजणे आवश्यक आहे. रोहित पवारांनी ती काळजी घ्यावी.
हे ही वाचा:
वर्षा गायकवाड, उद्धव ठाकरेंच्या कारस्थानामुळे धारावीत जमाव उतरला!
ठाणे म्युनिसिपल ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची जानी मास्टरची कबुली
पंजाबमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडल्या ‘लोखंडी सळ्या’
महायुती सरकार काही ओबीसी कोट्यातून आरक्षण देणार नाही. आम्ही सत्तेवर आल्यास ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ येवढे सांगितले की, जरांगे उपोषण सोडतील. सुप्रिया सुळे यांनाही हे चांगल्याप्रकारे जमू शकेल. चुकून माकून सत्ता मिळाली तर सांगून टाकायचे, मराठा आरक्षणापेक्षाही राज्यात काही महत्वाचे विषय आहेत. जे त्यांनी आधीही सांगितले आहे. शरद पवार सत्तेवर असले की फडणवीसांना शिव्या देता येणार नाही, मग जरांगेनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या घालाव्यात. पवारसाहेब आरक्षण देतायत, परंतु मोदी देऊ देत नाहीत, असे सांगावे. मोदींना गाडून टाकण्याची भाषा करावी.
भविष्यात हा तमाशाही महाराष्ट्राला आणि मराठ्यांना पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तूर्तास जरांगेंनी उपोषण सोडण्याची गरज आहे. रोहित पवारांनी तातडीने पुढाकार घ्यावा. जरांगेंच्या प्रकृतीबाबत संभाजी राजेंना जी चिंता सतावते आहे तीही दूर होईल. देवेंद्र फडणवीस यांना लाखोली वाहण्यासाठी, त्यांच्या डोक्यावर मराठ्यांसाठी काहीही न केल्याचे खापर फोडण्यासाठी, त्यांना दोष देण्यासाठी, त्यांना शिव्या घालण्यासाठी, त्यांना गाडेन, पाडेन, चिरडून टाकेन वगैरे वगैरे म्हणण्यासाठी फक्त सलाईन घेऊन ताकद कशी येणार? निवडणुकी पर्यंत शिव्या घालण्याचा स्टॅमिना टिकवायचा असेल तर फक्त एका उपोषणात भागणार नाही.
निवडणुका घोषित झाल्यानंतर एक टप्पा, ठिक मतदानाच्या आधी एक टप्पा अशी व्यवस्थित रचना लावण्याची गरज आहे. जरांगेंना निवडणुकीपर्यंत पुरवून पुरवून वापरण्याची गरज आहे. त्यामुळे रोहित पवारांनी तात्काळ अंतरावलीला जाण्याची गरज आहे. कॅमेरासमोर जायचे नसेल तर रात्री जा, तेही शक्य नसेल तर निरोप पाठवा. तेही शक्य नसेल तर माणूस पाठवा, त्याच्या फोनवर जरांगेंशी बोला.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)