दिवाळीचे फटाके आणि गौप्यस्फोट…

उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि रोहित पवारांमध्ये एक अफाट साम्यस्थळ आहे

दिवाळीचे फटाके आणि गौप्यस्फोट…

दिवाळीत फटाके फोडण्याची आपली परंपरा आहे. दिल्लीतील प्रदूषणाचा फटाक्यांशी संबंध नाही याकडे दुर्लक्ष करत मुंबईची दिल्ली करायची आहे काय, असा सवाल न्यायालयाने केला. फटाके फोडण्यावर निर्बंध आणले. रात्री ७ ते १० या काळातच फटाके फोडा, अशी प्रेमळ सूचना केली. तीन तास फटाके फोडता येतील अशी दिलदार सूट दिली. एवढी कृपा करूनही लोक मानायला तयार नाहीत. पहाटेपासून आतषबाजी सुरू होते. लोकांचा फटाके फोडण्याचा उत्साह पाहून राजकीय नेत्यांनाही फटाके फोडण्याची सुरसुरी आलेली आहे. रोहित पवारांनी ताजा फटाका फोडलाय. बातमीदारीच्या भाषेत याला गौप्यस्फोट म्हणतात.

ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नातू रोहीत पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले पप्पू आहेत, असा खोडसाळ दावा अनेकजण करत असतात. हे काही खरं नाही. रोहीत पवार प्रचंड कर्तृत्ववान आहेत. फक्त ते दाखवण्याची संधी अद्यापि त्यांना मिळालेली नाही. तरुण वयात परीपक्व झालेल्या त्यांच्या केसांप्रमाणे ते सुद्धा अत्यंत परीपक्व आहेत. फक्त ते अजूनही कोणाच्या लक्षात आलेले नाही. दिवस दिवाळीचे आहेत. परंतु रोहित पवारांची दिवाळी रोजची. ते रोजच फटाके फोडत असतात. आपटीबार, लवंगी आणि लक्ष्मी बॉम्ब असे छोटेमोठे धमाके ते करत नाहीत. त्यांची क्षमता मोठी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होईल अशी त्यांची भाकीतं असतात. भूकंपाच्या तीव्रतेला त्यांचे सहकारी आणि समोर उभे असलेले सत्ताधारी अनुल्लेखाने मारतात ही बाब वेगळी.

राजकीय नेते, महाराष्ट्राची जनता फारसे मनावर घेत नसली तरी रोहित पवार आपलं टॅलेंट वाया जाऊ देत नाहीत. ते नित्यनियमाने राजकीय भाकीतं आणि भविष्यवाण्या करत असतात. भाकीतांच्या प्रांतातील त्यांचे वरिष्ठ संजय राऊत, राऊतांचे पार्ट टाईम नेते उद्धव ठाकरे या भाकीत सम्राटांच्या रांगेत रोहित पवार आता ताकदीने उभे ठाकले आहेत.
अनुभव नसल्याचा, कोवळे वय असल्याचा दावा करून आजवर रोहित पवारांच्या राजकीय भाकीतांना गंभीरपणे घेतले गेले नाही, परंतु आता ती वेळ आलेली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणावर रोहित पवार यांची बारीक नजर असते. कुशाग्र बुद्धीमत्ता असलेल्या रोहीत पवार यांचा अभ्यास गाढा आहेच, सोबत सिक्स्थ सेन्सची ईश्वरी देणगी त्यांना लाभलेली आहे. या जोरावर त्यांनी आगामी काळात कोणती उलथापालथ होऊ शकेल, किती भूकंप होऊ शकतील याचे भाकीत केलेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील आणि भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवतील अशी भविष्यवाणी रोहित पवार यांनी केलेली आहे.

अशी यादीच त्यांनी तयार केलेली आहे. घनिष्ठ कौटुंबिक संबंधांमुळे यातील राष्ट्रवादीशी संबंधित तपशील ते अजितदादांना पाठवतील. परंतु हा लाभ एकनाथ शिंदे यांना होणार नसल्याने त्यांची खरी अडचण होणार आहे. एकनाथ शिंदे यांना ही बहुमूल्य माहिती मिळवण्यासाठी बहुधा रोहित पवार यांची मनधरणी करावी लागणार आहे. रोहित पवारांनी आणखी एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केलेला आहे. महाराष्ट्रात हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करण्याची भाजपाची रणनीती होती, परंतु ती यशस्वी होत नसल्यामुळे आता ओबीसी-विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रय़त्न सुरू आहे. यामुळे मूळ प्रश्नांकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे अशी भाजपाची रणनीती आहे. उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस या मागे आहेत, असा गौप्यस्फोट रोहीत पवारांनी केलेला आहे.

रोहित पवारांच्या या गौप्यस्फोटामुळे देवेंद्र फडणवीस प्रचंड चिंतातूर झालेले आहेत. कारण गोपनीयता हा फडणवीसांच्या राजकारणाचा कणा आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे सतत म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्यांनी सांगितले होते. सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार सुद्धा नाही. इतकी गोपनीयता बाळगणाऱ्या फडणवीसांचे मनसुबे रोहित पवारांपर्यंत बिनबोभाट पोहोचले. महाराष्ट्राचे राजकारण १८० अंशामध्ये फिरवणारी इतकी महत्त्वाची गोपनीय रणनीती थेट रोहित पवार यांच्यापर्यंत कशी पोहोचली याचा शोध घेण्यासाठी फडणवीस आता जोरदार कामाला लागेल आहेत, असे समजते.

 

एकाच गौप्यस्फोटातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अस्वस्थ, चिंतातूर होतील अशी व्यवस्था रोहित पवारांनी केलेली आहे. धास्तावलेले हे तिघे रोहित पवार यांच्या पुढच्या भाकीताकडे लक्ष ठेवून आहेत. दसऱ्याच्या दिवशी शरद पवार यांनी रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला पुण्यातून हिरवा कंदील दाखवला होता. त्यासाठी भव्य सभा घेतली होती. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या दणक्यामुळे ४२ दिवसांची ही संघर्ष यात्रा रोहित पवारांना एका दिवसात गुंडाळावी लागली. त्यांच्या संघर्ष केवळ एका दिवसापुरता अल्पजीवी ठरला. त्यांच्या संघर्ष यात्रेमुळे जितका दणका राज्यातील महायुती सरकारला बसला नसेल तितका त्यांच्या ताज्या भाकीतामुळे बसला आहे.

 

उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि रोहित पवारांमध्ये एक अफाट साम्यस्थळ आहे. या तिघांना आपल्या पक्षात काय होणार आहे, एवढं सोडून सगळ्या जगात काय होणार याची माहिती असते. सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीचा अभ्यास करून त्यांच्यावर भाकीतं करण्याबरोबरच त्यांच्यासोबत पक्षात उरलेल्या नेत्यांकडे रोहित पवारांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण थोरले पवारच भाजपासोबत जाणार अशा जोरदार कंड्या सध्या उठू लागल्या आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version