वागळे मार्गावर रवीशकुमार?

भाटगिरीचे एकपर्व संपुष्टात आले आहे.

वागळे मार्गावर रवीशकुमार?

देशात काँग्रेसची भाटगिरी करणाऱ्या पत्रकारांची टोळी होती. ही तीच जमात आहे. ज्यांनी हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याच्या काँग्रेसी कटात मोलाची भूमिका बजावली. ज्यांनी सोनिया गांधींना त्यागाची मूर्ति बनवले, राहुल गांधी हा ज्यांच्या दृष्टीने आशेचा किरण होता. प्रियांका गांधी म्हणजे इंदीरा गांधी यांची प्रतिमा. ज्यांच्यासाठी झाकीर नाईक हा विश्वशांतीचा दूत होता. पाकिस्तानबाबत ज्यांना कायम अमन की आशा वाटत राहिली. रवीश कुमार या जमातीचे मुकुटमणी होते. आज रवीश यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे. भाटगिरीचे एकपर्व संपुष्टात आले आहे.

डाव्याविचारांवर पोसलेली काँग्रेसची तळी उचलणारी ही गँग २०१४ पर्यंत खूप फॉर्मात होती. इतकी शक्तीशाली होती की खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं ठरवण्याची ताकद आपल्या लेखणीत किंवा वाणीत आहे, असा यांचा समज होता.
समाज माध्यमांनी यांचे मूर्तिभंजन केले. हे विचारवंत नसून सुपारीबाज आहेत हे सत्य लोकांच्या समोर आणलं. ज्या उद्योगपती गौतम अदानी यांनी एनडीटीव्हीचा ताबा मिळवला आहे, त्यांना रवीश यांनी जाता जाता व्यक्त केलेल्या प्रकट मनोगतात टोला लगावला आहे. जनतेला चवली-पावली समजणारे जगतसेठ प्रत्येक देशात असतात. आपल्या देशातही आहेत. पुरोगाम्यांना दुटप्पी आणि दांभिक का म्हणतात त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

रवीश ज्या एनडीटीव्हीमध्ये गेली २७ वर्षे असत्याचे दुकान चालवतायत, तो एनडीटीव्ही गेले दशकभर अशाच एका जगतसेठने दिलेल्या ४०० कोटींच्या बिनव्याजी कर्जावर बाळसं धरत होता. या विश्वप्रधान कमर्शिअल प्रा. लि. या कंपनीने एनडीटीव्हीची प्रमोटर कंपनी असलेल्या आरआऱपीआर होल्डींग प्रा. लि. या कंपनीला ४०३ कोटी ८५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले होते. याची परतफेड न झाल्यामुळे आरआरपीआरच्या ९९ टक्के शेअर्सवर व्हीसीपीएलचा ताबा झाला. या कंपनीकडे एनडीटीव्हीचे २९.१८ टक्के शेअर्स आहेत. ही कंपनी अदानी यांनी ताब्यात घेतली आणि एनडीटीव्हीत शिरकाव केला. सुमारे २६ टक्के शेअर्स अदानी यांनी बाजारातून थेट विकत घेतले. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने रवीश अदानींवर बरसले आहेत.

चिडीया का घोसला कोई और ले गया अशी रडारड करत रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीला राम राम ठोकला.
देशी तुपात घोळलेले अस्खलित हिंदी हे रवीश यांचे वैशिष्ट्य. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर बारीक नजर ठेवून त्यांचे उत्तम विश्लेषण करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. स्वाभाविकपणे त्यांचा चाहता प्रेक्षकवर्ग मोठा होता. रवीशकुमार मोदीविरोधाकांचे दैवत बनला. त्यांचा दोष एकच होता. परंतु तो एवढा मोठा होता की त्याने रवीशच्या कर्तुत्वावर बोळा फिरवला. पराकोटीचा मोदी द्वेष। हा रवीशचा युएसपी. एनडीटीव्हीचा राजीनामा दिल्यानंतर व्यक्त केलेल्या प्रकट मनोगतात त्याने जाता जाताही मोदीविरोधी जळजळ व्यक्त केली. सहानूभूती मिळवण्यासाठी चहा विकत होतो, असे मी तुम्हाला सांगणार नाही. रवीशकुमार या द्वेषाने आंधळे झाले होते.

मोदींच्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत या माणसाला काहीच चांगले दिसले नाही. दोन वर्षांपूर्वी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एका मुलाखतीत रवीशला प्रश्न विचारण्यात आला. गेल्या सहा वर्षात मोदींनी एकही सकारात्मक काम केले नाही का? त्यावर रवीशचे उत्तर पत्रकार म्हणून त्यांचा पराभव करून जाते. त्यांचा अजेण्डा स्पष्ट करते. मी इथे सकारात्मक गोष्टी सांगण्यासाठी नाही. वाईटातले वाईट सरकार सुद्धा काही तरी चांगले करतच असते. मी जे बोलतो ते चुकीचे आहे का एवढेच मला सांगा.

बुद्धीमान माणसांचे एक वैशिष्ट्य असते की एकदा त्यांनी काही भूमिका घेतली, की तीच योग्य आहे हे ठरवण्यासाठी ते कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. एकाला एक आणि दुसऱ्याला वेगळी फूटपट्टी लावू शकतात. रवीशच्या या वेगवेगळ्या फूटपट्ट्यांचे कैक व्हीडीयो यूट्यूबवर उपलब्ध आहेत. यातून काँग्रेसबाबत त्यांना असलेल्या ममत्वाची भूमिका ठसठशीतपणे समोर येते.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी सापडल्या सोन्याच्या खाणी

‘सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरे गटात महिलांचे बंड होईल’

कोरियन तरुणीशी लगट करणाऱ्या दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या

मुंबई मेट्रो-३ ने मिळवले हे नवे यश

२०१९ मध्ये पाच टक्के विकास दरावरून रवीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बाण चालवले होते. अर्थव्यवस्था कशी डळमळीत झाली आहे, सर्वत्र कसे निराशेचे वातावरण आहे, असे सांगणारे रवीश कुमारा २०१३ मध्ये तेवढाच विकास दर असताना ही परीस्थिती अन्य देशांच्या तुलनेत बरी कशी आहे, अशा आशावाद व्यक्त करतात. तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांची भलामणही करताना दिसतात. अर्थ स्पष्ट आहे, मोदी नावाचा माणूस रवीश कुमार यांची पोटदुखी आहे. त्यांच्याबाबत काहीही चांगलं या माणसाला दिसत नाही.

चीनमध्ये आज कोविडमुळे अराजक निर्माण झालं आहे. झिरो कोविड पॉलिसी साफ फसली आहे. लोकांचे बळी जातायत. अर्थ व्यवस्थेला घरघर लागली आहे. भारताकडे तुलनेने कमी संसंधाने असून सुद्धा नरेंद्र मोदी यांनी कोविड फार चांगल्या पद्धतीने हाताळला. त्यामुळे आपल्याकडे स्थिती खूप नियंत्रणात आहे. अर्थव्यवस्थाही रुळावर आहे. परंतु जेव्हा कोविड टीपेला होता. रवीश यांच्यासारखे पत्रकार डोळ्यातील मुसळ शोधण्याचे काम करत होते. मोदींवर टीका करून काँग्रेसची भलामण करत होते. या पत्रकारांची समस्या एकच आहे. त्यांना मोदी नावाच्या माणसामध्ये समस्या दिसतात, राहुल गांधी यांच्याबाबतीत मात्र ते कायम मौन बाळगताना दिसतात.

भारत जेव्हा कोविड लसीकरणाचे नवे नवे विक्रम निर्माण करीत होता, तेव्हा मोदींचे कौतुक करावे कसे असा यक्ष प्रश्न रवीश यांच्यासारख्यांच्या समोर उभा ठाकला. सत्य सांगता येत नसेल तेव्हा दिशाभूल करायची ही काँग्रेस नीती आहे. काँग्रेसची पल्स पोलियोची मोहीम यापेक्षी किती तरी यशस्वी होती अशी भलामण रवीश यांनी केली.

ही भलामण करताना पोलियो हा कोविडच्या तुलनेत खूप जुना आजार आहे, पोलियोचे डोस देण्यासाठी नोंदणीची गरज नसते, पोलियो लसीबाबत लोकांच्या मनात कोणतेही संदेह शिल्लक नाहीत अशा अनेक गोष्टी रवीशने नजरेआड केल्या.
चीनमध्ये आज जे घडते आहे, त्यामुळे रवीश यांच्यासारखे लोक तोंडावर आपटले आहेत. परंतु गिरे तो भी टांग उपर असा यांचा बाणा आहे.

दादरीमध्ये अकलाखची हत्या झाली तर त्याला धार्मिक रंग देणाऱ्या गँगमध्ये रवीश आघाडीवर होते. परंतु देशात अलिगढमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या भामट्याकडून एका अडीच वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या करण्यात येते, दिल्लीत श्रद्धा वालकरची हत्या होते तेव्हा तो कायदा सुव्यस्थेचा प्रश्न असतो. ज्यांनी आपली सगळी हयात केवळ भाजपा विरोध आणि काँग्रेसची दलाली करण्यात घालवली, त्या गोटी मीडियाचा शिरोमणी असलेल्या रवीशला मीडियातील एक गट मोदींच्या बाजूने बोलू लागला याचे मोठे वैषम्य होते.

हा मीडिया जनतेचा मीडिया नाही, यांनी मोदींना सत्तेवर आणणाऱ्या जनतेलाच बातम्यांतून बाहेर काढले आहे. हा मीडिया लोकशाहीची रोज हत्या करतोय. बऱ्याच अशा बातम्या आहेत, ज्या छापल्याच जात नाहीत, पत्रकार बोलायला घाबरू लागलेत, पत्रकारिता हीच चमचेगिरी झाली आहे. जाहिरातदारांनी तरी अशी मीडियावर बहिष्कार करायला हवा परंतु तेही होताना दिसत नाही. मीडियाची विश्वासार्हता शून्यावर आली आहे. देशात कोणत्याही क्षेत्रात सुवर्ण युग असल्याचे चित्र नाही, असलेच तर ते फक्त गोदी मीडियात आहे. जनता हताश आहे, मीडिया आचके देतोय, हे भस्म युग आहे, प्रत्येक चांगल्या गोष्टीचे भस्म केले जात आहे. कानून के आड में अधिकार कुचले जा रहे है, अभिव्यक्तियो कों रोंधा जा रहा है.

रवीशने मीडिया, उद्योगपती, न्यायव्यवस्था सर्वांनाच दोष दिला आहे. देशात काहीच चांगलं घडत नाही, काँग्रेसचा खड्डा आणखी खोल होत चाललाय, जनतेत प्रचंड निराशा आहे, हा यांचा प्रपोगंडा आहे. परंतु जनता यांना मनावर घ्यायला तयार होत नाही. अडीच दशकांपेक्षा जास्त काळ मोदीविरोधी अजेण्डा राबवून तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार असे चित्र आहे.
बुद्धीच्या जोरावर खऱ्याच खोटं करून जनतेच्या माथी मारण्याचे दिवस गेले. हाच रवीशकुमारच्या राजीनाम्याचा अन्वयार्थ आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version