हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत कलानगर येथील मातोश्री निवासस्थान हे आकर्षणाचे केंद्र होते. बडे बडे दिग्गज इथे बाळासाहेबांना भेटण्यासाठी येत असत. त्यांच्या निधनानंतर हा महीमा ओसरत गेला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार इतिहास जमा झाल्यानंतर हा महीमा संपल्यात जमा आहे. परंतु बारकाईने पाहिले तर ती झळाळी आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थला येते आहे. गेल्या काही महिन्यातील घडामोडी स्पष्टपणे हेच सांगतायत.
राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा मुक्काम कृष्णकुंजवरून शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी हलवला. नवे निवासस्थान त्यांना फळले असे म्हणायला वाव आहे. त्यांच्या नव्या निवासस्थानी दिग्गजांची रांग लागलेली दिसते. राज्यात खांदेपालट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री आणि वरीष्ठ भाजपा नेते नीतीन गडकरी अशा अनेक नेते मंडळींनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थला भेट दिली. गेल्या काही दिवसात आमीर खानच्या लाल सिंह चढ्ढा या सिनेमाच्या विरोधात वादळ निर्माण झालं होतं. लोकांनी सोशल मीडीयावरुन या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मोहीमच हाती घेतली होती. परीणामस्वरुप हा सिनेमा जोरदार आपटला सुद्धा. या दरम्यान आमीर डीप्रेशनमध्ये गेल्याची चर्चा होती. याच काळात आमीर शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांना भेटला.
एकीकडे अडचणीत असलेले बॉलिवूडचे तारे-सितारे मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत. कठीण काळात त्यांच्याकडून मदतीची याचना करीत. संजय दत्त जेव्हा दाऊद गॅंगशी संबंध आणि एके ४७ च्या प्रकरणात गजाआड झाला तेव्हा सुनील दत्त यांनी अनेकदा मातोश्रीच्या पायऱ्या झिजवल्या होत्या. दिलीप कुमार, अमिताभपासून मायकल जॅक्सन आणि लताबाईंपासून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असे दिग्गज बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सोनू सूदला मातोश्रीवर बोलावण्यासाठी कार्यकारी संपादक संजय राऊतांना अख्खा अग्रलेख पाडावा लागला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तेवर असूनही मातोश्रीची रया गेल्याचे चित्र होते. या काळात मातोश्री दोनचे काम जोरात सुरू होते. मात्र मातोश्री एक मात्र झळाळी गमावत असल्याचे चित्र आहे.
मराठी हृदयसम्राट राज ठाकरे यांनी हिंदुजननायक हे बिरुद स्वीकारून भगवी शाल पांघरल्यापासून लोक पुन्हा त्यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छवी पाहू लागले आहेत. कधी काळी जे बाळासाहेबांशी संबंध ठेवून होते ते आता राज ठाकरे यांच्याशी जवळीक बाळगून आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शिवसेनाप्रमुखांशी स्नेह होता, त्यांच्या पश्चात तसेच ऋणानुबंध राज ठाकरे यांच्याशी निर्माण झाले. मंगशेकर घराणे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे. पण बाळासाहेबांच्या पश्चात हे नातं उद्धव ठाकरे यांना टिकवता आले नाही. परंतु राज यांनी ते टिकवले. अलिकडेच आशा भोसले यांनी शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांची भेट घेतली.
अलिकडे एका मुलाखतीत वारसा हा वास्तूचा नसतो विचारांचा असतो असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. मातोश्रीची उतरलेली झळाळी पाहून हे विधान आता खरे वाटू लागले आहे. बाळासाहेबांचा वारसा उद्धव ठाकरे पुढे नेऊ शकले नाहीत. त्यामुळे मातोश्रीचे महत्व आज शिवतीर्थला मिळत असल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा:
‘शबाना, नसीरुद्दीन स्लीपर सेल एजंट’
पोलीसाच्या मित्रानेच सोनाराला लुटले…
सिनेमांच्या पात्रात श्रीगणेश, मनाला पटते का?
‘केरळमध्ये काम करण्यासाठी देशभक्तीबरोबरच बलिदान आणि शौर्यही हवे’
बाळासाहेब हयात असताना राज ठाकरे यांनी त्यांची फोटो बायोग्राफी अर्थात चित्र चरीत्र प्रसिद्ध केले होते. या कार्यक्रमात अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, शरद पवार, जॉर्ज फर्नांडीस, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन आणि अर्थात स्वत: बाळासाहेब असे दिग्गज व्यासपीठावर एकत्र आले होते. त्या कार्यक्रमात भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना वक्तृत्व कलेचा उत्तम नमुना असलेले एक उत्कृष्ट भाषण केले. राज जे करतो ते नेत्रदीपक असतं. आज अक्षय तृतीया आहे. आज जर एखाद्या देवतेचे पूजन केले तर ते अक्षय राहतं असं म्हणतात. या चित्र चरित्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी त्याचे दैवत असलेल्या बाळासाहेबांचे अक्षय पूजन केले आहे, असे उद्गार प्रमोद महाजन यांनी या प्रकाशन सोहळ्यात काढले होते. या सोहळ्यात राज आणि उद्धव हे दोघे बंधूही स्टेजवर होते. बाळासाहेबांचा पुत्र म्हणून त्यांचे विचार एखाद्या चरीत्रग्रंथाच्या रुपात जतन करण्याचे काम करायला हवे होते उद्धव यांनी, परंतु ते केले राज ठाकरे यांनी. राज यांनी हे काम का केले? या प्रश्नाचे उत्तर त्यांनीच अलिकडे दिलेले आहे. वारसा हा वास्तूचा नसतो तो विचारांचा असतो.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)