बंद दाराआड चर्चा: भाजपाने जुळवले शिवसेना + ठाकरे समीकरण?

यंदा ४०० पार... प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपाने छोट्या-मोठ्या पक्षांना जवळ केले

बंद दाराआड चर्चा: भाजपाने जुळवले शिवसेना + ठाकरे समीकरण?

MNS leader Raj Thackeray meets Union Home Minister Amit Shah in Delhi | PTI

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर ही भेट झाली याचा अर्थ चर्चेचा विषय लोकसभा निवडणूक हाच असणार याबाबत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. ही भेट बंद दाराआडच झाली. कारण दार उघडं ठेवून राजकीय चर्चा करता येत नाहीत. भाजपासोबत शिवसेना सोबत ठाकरेही असतील याची खातरजमा भाजपा नेतृत्वाने केलेली आहे. येत्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभेत उद्धव ठाकरे शरद पवारांचे व्हीडीयो पाहायला मिळतील अशी दाट शक्यता आहे.

२०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरेंचा लाव रे व्हीडीयो उपक्रम खूप गाजला. परंतु भाजपाच्या यशावर त्याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती, परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा फायदा झाला नाही. पुढे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी मनसेसोबत सुरक्षित अंतर राखले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्यामुळे प्रभावित झालेले राज ठाकरे, २०१९ च्या निवडणुकीत मोदींच्या विरोधात गेलेले राज ठाकरे आणि २०२४ च्या आधी पुन्हा भाजपाच्या जवळ गेलेले राज ठाकरे महाराष्ट्राने पाहिले. एक वर्तुळ पूर्ण झालेले आहे.

गेले काही महिने राज ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत. राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत बैठका, मेळाव्यांचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष गांभीर्याने तयारी करत असल्याचे दिसत होते. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही राज ठाकरे यांच्यासोबत गाठीभेटींचा सिलसिला सुरू होता. या भेटीबाबत विचारले असता, आम्ही गप्पा मारतो, आमचे विषय राजकारणाच्या पलिकडचे असतात, असे खुलासे देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी केले. परंतु शिळोप्याच्या गप्पा मारायला ना फडणवीस रिकामटेकडे आहेत, ना एकनाथ शिंदे. काही तरी शिजतंय याचा लोकांना अंदाज होता. महायुतीमध्ये ठाकरेंच्या एण्ट्रीची चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकर यांचे भावी खासदार अशी कटआऊट लागणे सूचक होते. मनसे लोकसभा लढवणार यावर करण्यात आलेले ते शिक्कामोर्तब होते.

भाजपाची ही रणनीती आहे, यंदा ४०० पार… प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपाने काही प्रमाणात वैचारिक साम्य असलेल्या छोट्या-मोठ्या पक्षांना जवळ केले. उत्तर प्रदेशात अपना दल, राष्ट्रीय लोकदल, सुहेल देव भारतीय समाज पार्टी, बिहारमध्ये नीतीश कुमार यांच्या जेडीयूसोबत युती करताना चिराग पासवान आणि जितनराम मांझी या नेत्यांच्या पक्षांना सोबत घेण्याचे धोरणा भाजपाने ठेवले आहे. तामिळनाडून पीएमके, कर्नाटकमध्ये देवगौडांचा जनता दल(एस), तेलंगणा आणि आंध्रमध्ये तेलगु देसम, जनसेना या पक्षांशी युती झालेली आहे. ओडीशातही भाजपा बिजू जनता दलासोबत युती करण्याचा गांभीर्याने प्रयत्न करतोय.

हे ही वाचा:

‘घड्याळ’ अजित पवारांकडे तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस

सर्फराज, ध्रुव जुरेलची कोटी उड्डाणे

गरिबांचे धर्मांतर करण्याचा गाझियाबादमध्ये प्रकार

४०० पार करण्याचा मार्ग दक्षिणेतून जातो!

एका बाजूला इंडी आघाडी फक्त कागदावर दिसत असताना भाजपाने प्रत्येक राज्यात मतांचे गणित लक्षात घेऊन आघाड्या केलेल्या दिसतात.महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला मानणारा मतदार महाराष्ट्रात जेमतेम दीड टक्का आहे. परंतु मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आदी भागात मनसेचे ताकद एकवटली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेसोबत आली तर पुढे त्याचा उपयोग विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकीत होऊ शकेल. मराठी मतदारांवर मनसेचा असलेला प्रभाव महायुतीला काही भागात बळ देऊ शकतो.

महायुतीत आधीच दोन पक्ष आहेत. तिसऱ्या पक्षाला जागा नाही, असा मथळा असलेली बातमी दोन दिवसांपूर्वी टाईम्स ऑफ इंडियामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने प्रसिद्ध झाली. आमचे जागा वाटप पूर्ण झाले असल्याने आणखी एका पक्षाला सामावून घेणे कठीण असल्याचे एक वाक्य या संपूर्ण बातमीत आहे. मनसेला जागा नाही, असा मथळा मात्र पत्रकाराचाच आहे. राजकारणात कठीण असलेल्या गोष्टी होतात, अशक्य असलेल्याही होतात. त्याच न्यायाने मनसेला महायुतीत दाखल करण्यासाठी भाजपाने प्रयत्न केलेले आहेत. थेट गृहमंत्री अमित शहा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे भाजपा याबाबत किती गंभीर आहे, हे पुरेसे उघड होते.

राज ठाकरे यांना लोकसभेपेक्षा विधानसभा आणि महापालिकांमध्ये जास्त रस असणार हे उघड आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत एक-दोन जागा घेऊन भाजपाची साथ देणे मनसेसाठी परवडणारा सौदा ठरू शकेल. त्या मोबदल्यात राज ठाकरे यांच्यासारखी मुलुख मैदान तोफ भाजपाला लोकसभा निवडणुकीत उपलब्ध होऊ शकेल. राज ठाकरे यांच्या दिल्ली भेटीमुळे मविआमध्ये खळबळ आहे. एका दिवसात भाजपाला संपवण्याच्या बाता करणारे विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे भाजपासोबत जाण्यामुळे मविआवर कोणताही परिणाम होणार नाही, असे वक्तव्य केलेले आहे. सुप्रिया सुळे यांनी मात्र राज ठाकरे या मविआमध्ये आले असते तर त्यांचा सन्मानच झाला असता असे विधान केले आहे. सर्व काही ठिकठाक झाले तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत लाव र तो व्हीडीयोच्या दुसऱ्या सिझनमध्ये राज ठाकरे यांच्या सभेत ठाकरे आणि पवारांचे व्हीडीयो पाहायला मिळतील.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version