इंडी आघाडीचे नेते भाजपाशी लढण्यासाठी एकत्र येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी एकत्र येतात. पण एकत्र नसतात तेव्हा एकमेकांचे कपडे उतरवण्याचे काम करत असतात. अमेठी मधून पळ काढून थेट वायनाडमध्ये निवडणूक लढवणाऱे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ही निवडणूक सोपी नाही. केरळमधील सत्ताधारी डावे त्यांची अब्रू वेशीवर टांगतायत.
महाराष्ट्रात काँग्रेसची उबाठा गटाशी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाशी आघाडी आहे. या दोन्ही पक्षांचा असा काही पालापाचोळा झाला आहे की पवार-ठाकरे कायम राहुल गांधी यांची पालखी खांद्यावर घ्यायला सज्ज असतात.
उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर त्यांना सांगली लोकसभा मतदार संघाच्या मोबदल्यात पंतप्रधानपदाची ऑफरही दिलेली आहे. तरीही काँग्रेसवाले उबाठासाठी सांगली सोडायला तयार नाही ही बाब वेगळी. या लांगुलचालनाला महाराष्ट्रातील काँग्रेसची तुलनेने भक्कम असलेली परिस्थितीही थोडीफार कारणीभूत आहे.
केरळमध्ये काँग्रेस डाव्यांच्या दयेवर आहे. काँग्रेसच्या तुलनेत तिथे डावे किती तरी मजबूत आहेत. केरळमधून राहुल गांधी लढणार हे ठाऊक असूनही सत्ताधारी डाव्यांनी इथून भाकपाचे नेते डी.राजा यांच्या पत्नी एनी राजा यांना मैदानात उतरवले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काल त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी राहुल गांधींची यथेच्छ धुलाई केली.
हे ही वाचा:
केजरीवाल ‘आत’ गेल्यावर आता संजयसिंग ‘बाहेर’
मोदींचा जन्म मौजमजा करण्यासाठी झालेला नाही !
पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ४३ लाख रुपयांचे बक्षीस असणारे दोन नक्षलवादी ठार!
अन्सारीच्या मृत्यूनंतर तुरुंग अधीक्षकाला जीवे मारण्याची धमकी!
राहुल गांधी वायनाडमध्ये भाजपाशी लढायला आले आहेत का? इथे त्यांची लढत सत्ताधारी डाव्या आघाडीशी होणार हे त्यांना ठाऊक नाही का? ही डावी आघाडी देश पातळीवर निर्माण करण्यात आलेल्या इंडी आघाडीचा घटक पक्ष असून इथून वरिष्ठ नेत्या एनी राजा लढतायत हे ठाऊक असूनही राहुल गांधी इथे आले आहेत, असे विजयन यांनी ठणकावून सांगितले आहे.मालवणी भाषेत याला गुवा घाणीवर काढणे म्हणतात. देशाच्या सत्तेवर सुमारे सहा दशकं राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे हे हाल आहेत. राहुल गांधींना मोदींना सत्तेवरून हटवायचे आहे. प्रत्यक्षात स्मृती इराणी यांनी त्यांना अमेठीवरून पळवून लावले. जे स्मृती ईराणी यांच्यासमोर टिकू शकत नाहीत, त्यांनी मोदींचे नाव तरी कशाला घ्यायचे.
गांधी घराण्यातील सोनिया, प्रियांका वाड्रा आणि राहुल यापैकी एकही सदस्य रायबरेली-अमेठीतून लढू इच्छित नाही. कारण लढलो तर दारुण पराभव होणार, हे निश्चितपणे तिघांना ठाऊक आहे. गेल्या वेळी राहुल गांधी डाव्यांच्या कृपेने वायनाडमधून जिंकून आले. यावेळी ती कृपा शिल्लक राहिलेली दिसत नाही. त्यामुळे यंदा राहुल यांच्या नशिबी संसदयोग दिसत नाही.एखाद्या मग्रुर श्रीमंताने भिकाऱ्याला हाकलावे तसे डावे पक्ष राहुल गांधी यांना वायनाडमधून हाकलत आहेत. काँग्रेसचा दुटप्पीपणा आणि कचखाऊ भूमिका या विरुद्धही विजयन यांनी कडवट टीका केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात गळा काढण्यासाठी रविवारी दिल्लीत २८ पक्षांचे नेते अवतरले होते. त्यात डावे पक्षही होते. केजरीवालांच्या अटकेला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षानेच दारु घोटाळ्याप्रकरणी आप विरुद्ध आवाज उठवला होता. आज तेच या अटकेच्या विरोधात बोलतायत. जिथे जिथे काँग्रेस नेत्यांच्या विरोधात ईडीची कारवाई झाली तिथे त्यांनी कचखाऊपणा करत पक्षांतर केले, असेही विजयन म्हणाले आहेत.
देशात काँग्रेस सत्ता आल्यानंतर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी केरळमधील डाव्यांची सत्ता बरखास्त केली होती. पण काळाचा महीमा असा की भाजपाच्या द्वेषाने पेटलेले हे पक्ष आपला उभा दावा विसरून एकत्र आले. परंतु आता काँग्रेसची ताकद इतकी क्षीण झाली आहे की, या पक्षाची साथ आपलं काही भलं करू शकणार नाही उलट याचे ओझे होईल असे डाव्यांना वाटू लागले आहे. काँग्रेसने आता भाजपाशी लढण्याची शक्ती गमावली आहे, असे डाव्यांना ठामपणे वाटते आहे. राहुल यांच्या नेतृत्व क्षमतेवर तर त्यांचा काडीचाही विश्वास उरलेला नाही. त्यामुळेच केरळमध्ये राहुल गांधी यांच्याविरुद्ध डाव्यांची किरकिर सुरू आहे.
बरं इतकी बेअब्रू झाल्यानंतर काँग्रेस नेते डाव्यांच्या विरोधात चकार शब्दाने बोलत नाहीत. दर दुसऱ्या सभेत राहुल गांधी देशासाठी कसे शहीद झाले हे सांगणारे काँग्रेसचे वयोवृद्ध अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे याबाबत मौन बाळगतात. कधी कधी वाटते ते राजीव गांधी यांच्या ऐवजी राहुल गांधी यांचे नाव मुद्दाम घेतात. खुन्नस काढण्यासाठी. ज्या इंडी आघाडीचा रामलीला मैदानावर डंका वाजवण्याचा प्रयत्न भाजपा विरोधी पक्षांनी केला त्यांची परिस्थिती देशभरात अशीच आहे. फक्त केरळमध्ये डाव्यांनी राहुल गांधींची जोड्याने पूजा केली असे नाही तर झारखंडमध्येही आठ उमेदवार जाहीर केले आहेत.
काँग्रेसला तिकीट देणे म्हणजे एक सीट कमी करणे हे डाव्यांनाही कळून चुकले आहे. चाटुकारांशिवाय कोणीही राहुल गांधी यांना किंमत द्यायला तयार नाहीत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)