अमेरिकेत चीनची भांडी घासतायत राहुल गांधी…

चीनबद्दल राहुल गांधी यांची बांधिलकी

अमेरिकेत चीनची भांडी घासतायत राहुल गांधी…

राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे विदेश दौरे कायम चर्चेत असतात. हा जगातील बहुधा एकमेव नेता आहे, जो परदेशात जाऊन स्वत:च्या देशाची बदनामी करतो आणि शत्रू राष्ट्राची प्रशंसा करतो. २०२३ मध्ये झालेला ब्रिटन दौरा आणि सध्या सुरू असलेला अमेरिका दौरा यात राहुल गांधी यांनी ते सातत्य राखले आहे. रा.स्व.संघावर टीका, चीनची भलामण, या नेहमीच्या मुद्द्यांसोबत यावेळी जातीगत जनगणनेच्या मुद्द्याची भर पडली आहे. चीनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत, तिथून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांबाबत, वाढत्या बेरोजगारी बाबत जगातील देश, वित्त मानांकन संस्था उच्चारवाने बोलत असताना राहुल गांधी चीनमध्ये बेरोजगारीची समस्या कशी नाही, हे सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते हास्यास्पद ठरतात. विदेशात गेलेले राहुल गांधी चीनचे ब्रँडींग करतात, तेव्हा या चीनधार्जिणेपणाचे कोडे अनेकांना सुटत नाही.

 

भारत, अमेरिका आणि युरोपीय देशांना बेरोजगारीची समस्या भेडसावत असताना चीनमध्ये ही समस्या नाही, कारण चीन हा जगातील नंबर वन उत्पादक देश आहे. युनिवर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये राहुल गांधी यांनी हे विधान केलेले आहे. कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान नसताना त्यावर आत्मविश्वासाने बोलणे ही राहुल गांधी यांची खासियत आहे. अर्थशास्त्राचा त्यांचा कितपत अभ्यास आहे हे निवडणुकीच्या काळात त्यांनी जाहीर केलेल्या खटाखट योजनेमुळे जाहीर झालेले आहे. त्यांच्या फुकट अर्थकारणामुळे काँग्रेसशासित राज्ये भिकेला लागली आहेत. चीनची भलामण करण्यात त्यांना काहीही समस्या नाही. ते या देशाच्या कायम प्रेमात असतात. २००८ मध्ये कम्युनिस्ट पार्टीसोबत काँग्रेसने केलेल्या कराराने या प्रेमाला अधिकृत रुप दिले, परंतु हे प्रेम जवाहरलाल नेहरु यांच्यापासून सुरू आहे.

 

राहुल गांधी जे विधान करतायत ते तद्दन चुकीचे आहे. चीनमध्ये कार्यरत असलेल्या अनेक बड्या विदेशी कंपन्या आपला मुक्काम हलवत आहेत, चीनमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी मंदी आलेली आहे. विकासकांनी उभारलेली शहरे ओस पडली आहेत. माल विकत घेण्यासाठी ग्राहकच नाही. अनेक घोस्ट सिटीज चीनमध्ये निर्माण झालेल्या आहेत. या क्षेत्रातील कंपन्यांना मोठे कर्ज देणाऱ्या बँका एका पाठोपाठ माना टाकत आहेत. बँकेतील ठेवी बुडाल्यामुळे लोक रस्त्यावर येत आहेत. आता अर्थकारण असे डळमळीत असल्यावर त्याचा रोजगार निर्मितीवर किती परिणाम होत असेल याची कल्पना करा. ग्लोबल टाइम्स या चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये बेरोजगारीचा दर २०२४ मध्ये ५.२ टक्के आहे.

 

चीन हा पोलादी पडद्या आड वावरणारा देश आहे. त्यामुळे सरकारी मुखपत्रात दिलेल्या माहितीवर विश्वास किती ठेवायचा हा प्रश्नच आहे. चीनच्या तुलनेत भारतात उत्पादन क्षेत्र कमी असून आपला भर सेवा क्षेत्रावर असल्यामुळे तुलनेने आपल्याकडे रोजगार निर्मिती कमी होते. परंतु गेल्या दहा वर्षांच्या काळात आत्मनिर्भर भारत या उपक्रमाच्या अंतर्गत आपण अशा अनेक गोष्टी देशात निर्माण करतो आहोत, ज्या आधी फक्त आपण आय़ात करायचो. त्यात मोबाईल फोन, खेळणी, अशा अनेक फुटकळ गोष्टींचा समावेश होता. आता अशी उत्पादने आपण निर्यात करीत आहोत. कधी नव्हे ते आपण शस्त्रांचीही निर्यात करीत आहोत.

 

आयफोनची निर्मिती भारतात होते आहे, टेस्ला भारतात दाखल होते आहे. या दोन्ही अमेरिकी कंपन्या असून त्या कालपर्यंत चीनमध्ये उत्पादन करीत होत्या. हीच कथा युरोपातील कंपन्यांचीही आहे. भारताबाबत सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असताना राहुल गांधी त्या सांगत नाहीत त्याचे कारण स्पष्ट आहे. त्या मोदी सरकारच्या यशोगाथा आहेत. राहुल गांधी यांच्या बिनबुडाच्या विधानांमुळे जनतेमध्ये त्यांची अशी काही प्रतिमा निर्माण झालेली आहे की, गांधी-नेहरु घराण्याच्या मनसबदारांना सांगत फिरावे लागते की राहुल हे पप्पू नाहीत. ते उच्चशिक्षित आहेत, प्रत्येक गोष्टीवर सखोल विचार करतात ते कुशल रणीनीतीकार आहेत. हे ताजे विधान गांधी-नेहरु घराण्याचे पाळीव सॅम पित्रोदा यांचे आहे.

हे ही वाचा:

विनेश फोगटला तिकीट दिल्याने अनेक काँग्रेस नेते नाराज !

अजित पवार म्हणतात, अमित शहांसमोर मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला नाही

प. बंगाल: भाजपा बूथ अध्यक्ष विजय भुईया हत्येप्रकरणी एनआयएकडून छापेमारी

‘इस्रायलला पुरविण्यात येणारी लष्करी सामुग्री थांबवता येणार नाही!’

चीनबद्दल राहुल गांधी यांची बांधिलकी इथे थांबत नाही. केनियातील नैरोबी विमानतळाचे कंत्राट अदानी समुहाला मिळाल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली. अदानींचा त्यांनी निषेध केला. मोदी आपल्या मित्रांना जगभरात अशा प्रकारे कामे मिळवून देतात हे परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीने चांगले नाही, अशी टिप्पणी रमेश यांनी केली होती. यातली गोम अशी आहे की अदानींसमोर या टेंडरमध्ये चायना कम्युनिकेशन्स, कन्स्ट्रक्शन कंपनी (सीसीसीसी) ही चीनची सरकारी कंपनी उभी होती. ही कंपनी रस्ते, बंदरे, रेल्वे आणि विमानतळ उभारणीच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावर काम करणारी कंपनी आहे. आफ्रिकेतील पायाभूत सुविधांच्या निर्मितीत तिला आजवर कोणीही स्पर्धक नव्हता. एका भारतीय कंपनीने तिला मात देऊन नैरोबी विमानतळाचे कंत्राट मिळवले त्याचा खरे तर सर्व देशवासियांना अभिमान असायला हवा. परंतु काँग्रेस नेत्यांना पोटदुखी का व्हावी?  त्याचे कारण अवघा काँग्रेस पक्ष चीनच्या दावणीला बांधण्यात आलेला आहे, २००८ मध्ये झालेल्या कराराने यावर शिक्कामोर्तब केलेले आहे.

२०२३ मध्ये ब्रिटनमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाबाबत राहुल गांधी म्हणाले होते. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, सैन्यदलाचा विस्तार याबाबतीत दीर्घकालिन रणनीतीमुळे चीनचा जागतिक दबदबा वाढलेला आहे. जर हे खरे असेल तर त्याचे खापर काँग्रेसवर फोडण्याची गरज आहे. कारण दीर्घकालीन म्हणजे किमान पुढील चाळीस पन्नास वर्षांचा विचार हा काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी केला नाही. नाही तर आज जागतिक स्पर्धेत चीनचा नाही भारताचा दबदबा असता.

बांगलादेशी पत्रकार सलाह उद्दीन शोएब चौधरी याने माहितीच्या अधिकारात मिळवलेली २००८ च्या कराराची प्रत त्याच्या एक्स अकाऊंटवर अपलोड केलेली आहे. त्यामध्ये संरक्षण आणि लष्करी माहितीचे आदानप्रदान करण्यात येईल असे एक कलम आहे. चीन काँग्रेसला निवडणूक निधीबाबत मदत करेल, अशी दोन खतरनाक कलमे आहेत, असा दावा चौधरीने केलेला आहे. हे खोटं असेल तर कराराची खरी प्रत जाहीर करा, असे आवाहनही त्याने अन्तोनिया अल्बानिया माईनो अर्थात सोनिया गांधी यांना दिलेले आहे.

परदेशात गेल्यावर राहुल गांधी ज्या प्रकारे चीनची तरफदारी करतात ते पाहून जनतेच्या मनात २००८ च्या त्या कराराबाबत असलेले गूढ वाढत चालले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version