विधानसभेचे निकाल श्री गांधी-राऊत कृपेकरून

काँग्रेसचा पराभव झाला कारण ‘भारत तोडो’ हाच काँग्रेसचा अजेंडा आहे

विधानसभेचे निकाल श्री गांधी-राऊत कृपेकरून

विधानसभा निवडणुका झालेल्या पाच पैकी चार राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. तमाम एक्झिट पोलच्या दांड्या गुल करत भाजपाच्या पारड्यात तीन राज्य पडली. भाजपाने मध्यप्रदेश भक्कम बहुमतासह राखले. राजस्थान आणि छत्तीसगढ काबीज केले. भाजपाच्या यशाचे श्रेय नि:संशयपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावाताला आणि स्थानिक नेतृत्वाच्या मेहनतीला आहेच. परंतु विरोधकांचे शाप भाजपाला प्रचंड फळतात हे या निकालांनी स्पष्ट झाले आहे. ब्रह्मदेव संजय राऊतांची भविष्यवाणी पुन्हा एकदा तोंडावर पडली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्राही भाजपाला फळली.

 

विश्वप्रवक्ते ‘संजय राऊत म्हणतात हरणार म्हणजे भाजपा जिंकणार’, असा व्हीडीयो काल आम्ही न्यूज डंकावर केला. या शीर्षकाचा अर्थ एवढाच होता की जेव्हा भाजपाला शिव्या घालणे, भाजपावर आरोपांची राळ उडवून देणे एवढेच विरोधकांचे कर्तृत्व उरते, तेव्हा जनता अशा विरोधकांना धडा शिकवण्यासाठी संधी शोधत असते. ‘विरोधकांची शापवाणी माझ्यासाठी वरदान ठरते आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले होते. याचा अर्थ विरोधकांना कधी कळलाच नाही.

 

सत्ताधारी भरकटलेले असतील तर त्यांना दिशा दाखवणे, त्यांच्या चुका वेशीवर टांगणे, सरकारचे कान टोचणे हे विरोधकांचे कर्तव्य. प्रत्यक्षात विरोधक काय करतायत, तर फक्त हवेत गोळीबार. एका बाजूला बेरोजगारी वाढली म्हणून ओरड करायची दुसऱ्या बाजूला देशातील उद्योगपतींना टार्गेट करायचे, त्यांची बदनामी करायची, मोठ्या उद्योगांना विरोध करायचा. हा दुटप्पीपणा राहुल गांधीनी सातत्याने केला.

राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे बालिश आरोप, सुमार दर्जाची विधाने असे समीकरण बनले. ‘तुम्ही धाब्यावर जेवता तेव्हा तुमचे पैसे थेट अदानी यांच्या खात्यात जातात. तुम्ही मोबाईलवर सेल्फी काढता, पंखा चालवण्यासाठी स्विच दाबता तेव्हा तुमचा पैसा थेट अदानी यांच्या खात्यात जातो’, अशा प्रकारची टीका फक्त मनोरंजनासाठी ठीक असते. लोक ही टीका फार मनावर घेत नाही. लोकांच्या मनात राहुल गांधी यांची प्रतिमा एका कॉमेडीयनपेक्षा वेगळी नाही. महाराष्ट्रातील त्यांचे चेले-चपाटे मात्र राहुल गांधी यांच्या विनोदी विधानांची री ओढत राहिले, त्यांना कोरस देत राहीले. संजय राऊत तर काँग्रेसचे भाट बनले आहेत.

 

राहुल गांधींचे नेतृत्व सगळ्या देशाला पप्पूगिरी वाटत असताना संजय राऊतांचे डोळे मात्र त्यांच्या तेजामुळे दिपत असल्याचे चित्र देशाची जनता पाहात होती. याच अवस्थेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भाजपाला घाम फोडल्याचा साक्षात्कार होत होता. एका पत्रकार परीषदेत राहुल गांधी म्हणालेच होते, ‘राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा जा रहा है…’ नंतर थोडे शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की काही तरी चुकले. मग त्यांनी दुरुस्ती केली. सतत कसल्या तरी अमलाखाली असल्यासारखे बोलणारे राहुल हे उद्धव ठाकरेंच्या ‘आँख का तारा’ बनले.

 

देश अयोद्धेतील राम मंदिराच्या उद्घाटनाकडे डोळे लावून बसलेला असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा दिवटा प्रियांक खरगे हा उदयनिधी स्टॅलिनच्या सुरात सूर मिसळून सनातन नष्ट करण्याची भाषा करत होता. कोटावर दत्तात्रय गोत्राचे जनेऊ घालून फिरणाऱ्या राहुल गांधी यांनी यावर काही आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते. कारण हिंदुत्व बुडवणे हा त्यांचा अजेंडाच होता. रामाला काल्पनिक म्हणणारा हा पक्ष. यांच्याकडून दुसऱ्या काय अपेक्षा करणार? सनातनचा अपमान केला तरीही ठाकरेंची काँग्रेस भक्ती ढळली नाही. काँग्रेसचे जोडे उचलण्याचे काम त्यांनी मनापासून जारी ठेवले.

 

जाहीर भाषणात प्रियांकाबाई इंदिरा गांधींना महापुरुष म्हणतात. सिर्फ सौ रुपये में मुफ्त बिजली… अशा प्रकारच्या विनोदी घोषणा करतात. राहुल गांधी यांच्या भगिनी शोभाव्या अशा प्रकारची त्यांची प्रत्येक कृती असते. संजय राऊतांची भाषेवर प्रचंड पकड आहे. त्यांची डायलॉग डीलिव्हरी अमिताभ बच्चनच्या तोडीची आहे. त्यांनी त्यांच्या मालकांना बोलण्याचे काही धडे देण्याची गरज असताना ते फक्त आरत्या ओवाळण्यापुरते मर्यादित राहिले.

 

भाजपाचे विरोधक भाजपा समर्थकांना अंध भक्त म्हणतात. प्रत्यक्षात ते अंध विरोधक आहेत. त्यांना महिलांसाठी राबवलेली उज्ज्वला योजना दिसत नाही, गोरगरिबांना मिळणारे मोफत रेशन दिसत नाही, घरोघरी पोहोचलेली वीज, नळ जोडण्या, गरीबांसाठी बांधलेली घरं, शौचालयं काहीही दिसत नाही. वाढलेले जीएसटी कलेक्शन दिसत नाही, जागतिक अर्थकारणाच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घेतलेली झेप दिसत नाही, जी-२० चे यश दिसत नाही. विरोधकांनी डोळे झाकले तरी जनतेने मात्र डोळे बंद केलेले नाहीत. जनतेला केंद्र सरकारचे काम, राज्य सरकारचे काम, त्यामुळे अवतीभवती झालेला बदल जाणवतो आहे. विरोधकांचे तमाम दावे हास्यास्पद ठरवण्याचे काम जनतेने या निवडणुकीच्या निमित्ताने ताकदीने केले.

हे ही वाचा:

सर्वात मोठी पनौती कोण?’, सीटी रवी यांची राहुल गांधींवर खणखणीत टीका!

घर-घर मोदी आता मन-मन मे मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे वक्तव्य!

हवाई दलाला मिळाल्या १५३ अग्निवीरवायू महिला

अमित शहा म्हणाले, ‘अवघ्या पाच मिनिटांत कारागृह व्यवस्थापन मंत्र्याचा कैदी झालो’

काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेली मेहनत पाण्यात गेली, त्याचे कारण ‘भारत तोडो’ हाच काँग्रेसचा अजेंडा आहे, यावर जनतेचा ठाम विश्वास आहे. परदेशात जाऊन ‘इंडिया इज नॉट अ नेशन, इट इज युनियन ऑफ स्टेट्स’ ही राहुल गांधी यांनी उधळलेली मुक्ताफळे ऐकल्यानंतर त्यांचा इरादा भारत जोडो आहे, यावर विश्वास कोण ठेवेल? काँग्रेसने जातीचे कार्ड खेळले. जातीगत जनगणनेचा विषय प्रत्येक सभेत लावून धरला. हा मुद्दा चुकीचा नाही. परंतु त्या मागे काँग्रेसची भावना मात्र हिंदूंमध्ये फूट पाडण्याची होती हे लपून राहिले नाही. जनता सब समझती है. काँग्रेसला त्यांच्या कूनीतीचे फळ मिळाले.

 

मीडियाच्या बूमसमोर, कॅमेरासमोर बकवास करून तुम्ही भाजपाविरोधाचा कंड शमवू शकता. परंतु जनतेचे मत प्रभावित करू शकत नाही. विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने जनतेने राहुल गांधी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांना औकात दाखवलेली आहे. उद्याच्या अग्रलेखात दोन राज्य गमावून फक्त तेलंगणापुरत्या उरलेल्या काँग्रेसच्या एकमेव विजयाचे श्रेय राहुल गांधींच्या चरणी अर्पण करून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निष्ठा पुन्हा सिद्ध कराव्या.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version