एकाचा हात हाती दुसऱ्याला डोळा मारण्याच्या करामती; आंबेडकर सांगा कोणाचे?

‘बऱ्या बोलाने एकत्र या नाही तर तुमची अंडीपिल्ली काढू’, या शब्दात प्रकाश आंबेडकर मविआला धमकावतात.

एकाचा हात हाती दुसऱ्याला डोळा मारण्याच्या करामती; आंबेडकर सांगा कोणाचे?

मुंबईत काल वंचित बहुजन आघाडीचा मेळावा झाला, या मेळाव्यासमोर प्रकाश आंबेडकर यांचे तडाखेबंद भाषण झाले. भाषण ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात फक्त एकच प्रश्न निर्माण झाला की आंबेडकर नेमके कुणाचे. राजकीयदृष्ट्या ते नेमके कुठे उभे आहेत.

 

वंचित आघाडी आणि शिउबाठाची युती झालेली आहे. शिउबाठा हा महाविकास आघाडीचा महत्वाचा घ़टक आहे. मविआत सहभागी असलेल्या तीन पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीशी संबंधित जागा वाटपा वाटपाबाबत चर्चा सुरू झालेली आहे. परंतु संभाजी ब्रिगेड, वंचित आघाडी किंवा एमआयएम आदी पक्षांना या वाटपात स्थान मिळणार आहे का? हे पक्ष मविआचे घटक असतील का? ही बाब अजून स्पष्ट झालेली नाही. मविआतील जागा वाटप जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत याचे उत्तर मिळण्याची शक्यता कमीच आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी वंचितचा उभा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हे उघडपणे मान्य केले आहे. प्रकाश आंबेडकरांची आमच्याबाबत मतं नवी नाहीत, अनेक वर्ष त्यांची भूमिका ही अशीच आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांच्याशी जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु ते शक्य झाले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही वंचित हा मविआचा घटक नाही, त्यामुळे त्यांना त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे, असे स्वच्छ शब्दात सांगितले आहे. शिउबाठासोबत गेल्यानंतरही आंबेडकर वारंवार काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात बोलत आहेत.

 

कालच्या मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा या दोन पक्षांवर तोंडसुख घेतले. मविआमध्ये वरकरणी जागावाटपाबाबत चर्चा होत असली तरी जागावाटपाबाबत तडजोड होऊ नये अशी अनेक नेत्यांची इच्छा आहे. म्हणून कुरापती काढून भांडण केली जातायत, म्हणजे आमचे जमलं नाही, म्हणून आघाडी झाली नाही,असं सांगायला मोकळे. मुळात जेव्हा तुम्हाला एखाद्या पक्षासोबत राजकीय तडजोड करण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्ही आदळआपट करत नाही. माध्यमांशी बोलताना तारतम्य ठेवून बोलता. न बोलायच्या मुद्यावर तोंड उघडत नाही. मविआमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. तिन्ही पक्षात मतभेद आहेत, परंतु आंबेडकर ज्या भाषेत मविआवर हल्ले करतात, तसे हल्ले कोणीही करताना दिसत नाही. अपवाद फक्त संजय राऊत यांचा. कारण ते ब्रह्मदेव आहेत.

 

आंबेडकर इथे थांबत नाहीत, ‘बऱ्या बोलाने एकत्र या नाही तर तुमची अंडीपिल्ली काढू’, या शब्दात धमकावतात. ईडी हा मविआतील अनेक नेत्यांचा बाप आहे, या शब्दात हिणवतात. अशी आघाडी कशी काय होऊ शकेल? धमकी देणाऱ्या आंबेडकरांना मविआचे नेते कसे काय सामावून घेऊ शकतील?

 

अंडीपिल्ली काढण्याची धमकी त्यांनी भाजपालाही दिली. परंतु भाजपा आणि वंचितचे कधी सख्य नव्हते. त्यामुळे भाजपाबाबत ही भाषा ते नेहमीच वापरतात. परंतु ज्यांच्यासोबत आंबेडकरांना जायची इच्छा आहे, त्यांच्याबाबत अशी भाषा वापरणे म्हणजे अतिच झाले. ही भाषा मविआच्या नेत्यांनाही फार झोंबते आहे, हे त्यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट आहे.
सर्वावर कडी म्हणजे त्यांनी भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. आंबेडकर म्हणतात, आम्ही भाजपासोबत चाललो आहोत, असे बोलले जाते, ज्या दिवशी भाजपा जायचे असेल तेव्हा कोणतीही ताकद रोखू शकत नाही. आंबेडकर भाजपा-शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु राजकारणात काहीही घडू शकते. काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ले करून ते भाजपा-शिवसेनेचे मदत मात्र करू शकतात.

हे ही वाचा:

‘नासिरुद्दीन यांच्या फार्महाऊसवर पुरस्काराची ट्रॉफी बनली बाथरूमचे हँडल

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकीट!

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात नव्या नियमांची चर्चा

रेल्वे अपघातामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाचा भार अदानी, सेहवाग उचलणार

आंबेडकर यांना इशारा नेमका कोणाला दिलाय? मविआवर त्यांचा विश्वास नाही, परंत ते शिउबाठा सोबत आहेत. या पक्षासोबत युतीची चर्चा सुरू आहे, परंतु याबाबत अजून कोणतीही स्पष्टता नाही, असे आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलेले आहे. गोंधळ निर्माण करणारी भाषा ते वापरतायत, कारण कदाचित गोंधळ निर्माण करणे हेच त्यांचे धोरण आहे. रोज उठून आंबेडकर काँग्रेस राष्ट्रवादीला झोडत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुणगान करीत असतात. आता तर ते भाजपासोबत गेलो तर कोणीही रोखू शकत नाही, असे म्हणतातय. या संदर्भात शिउबाठाचे नेते मौन बाळगून राहातात, हे विशेष.

 

मी तुमच्यासोबत आहे, असे ठामपणे सांगण्यापेक्षा याबाबत कायम संदीग्धता निर्माण करायची, एकाचा हात हातात घेऊन कायम दुसऱ्याला डोळे मारत राहायचे, असे प्रकाश आंबेडकरांचे धोरण दिसते. मविआतील काही नेते व्यक्तिगत पातळीवर असेच धोरण राबवताना दिसतायत. आघाडीचे बारा वाजले तरी चालेल माझे दुकान बंद होता कामा नये ही भूमिका या उठाठेवी मागे आहे. ही उठाठेव कोणाला महाग पडणार आहे. हे समजणे काय फार कठीण नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version