अतुल भातखळकर यांचा विशेष लेख
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभेतले भाषण म्हणजे निव्वळ राहुल गांधीगिरी होती. या गांधीगिरीचा मुन्नाभाई मधल्या त्या गांधीगिरीशी काडीचाही संबंध नाही. राहुल गांधीगिरी हा एक पूर्णपणे वेगळा संशोधनाचा विषय आहे.
बोलायला मुद्दे नसतात तेव्हा काही तरी बरळायचे, ते सतत बरळत राहायचे, समोरच्याचा प्रतिवाद करण्याच्या भानगडीत पडायचे नाही, समोरचा काय म्हणतो आहे ते ऐकायचे नाही, सतत तेच तेच आणि तेच निरर्थक बोलत राहायचे या प्रकाराला राहुल गांधीगिरी म्हणतात. यात मेंदूचा संबंध नसतो फक्त तोंडाची टकळी चालवायची एवढेच कष्ट.
चीन प्रकरणी मुख्यमंत्री जे विधानसभेत बोलले त्यानंतर परकाया प्रवेश करून राहुल गांधीच महाराष्ट्राच्या विधानसभेत आले आहेत का असे मला वाटले. माझ्यासारखे अनेकांना वाटले.
चीनसमोर भारताने पळ काढला ही राहुल गांधी यांच्या अफाट आणि अद्वितीय बुद्धीमत्तेने जन्माला घातलेली थिअरी आहे. भारताच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आजी माजी लष्करी अधिकाऱ्यांनी ही थिअरी मोडीत काढून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे तोंड भरून कौतुक केले आहे. राहुल गांधींवर विश्वास ठेवायचा की लष्करी अधिकाऱ्यांवर हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडत नाही कारण त्याला राजकारण करायचे नसते, उद्धव ठाकरेंना मात्र लष्करी अधिकाऱ्यांना खोटे ठरवून राहुल गांधींची तळी उचलणे भाग आहे. त्याची अनेक कारणे आहेत.
एकेकाळी ‘सोनिया समोर झुकणारे हिजडे आहेत’, असे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. परंतु उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला इटालियन मातोश्रींसमोर कुर्निसात करण्यात वावगे वाटत नाही.
कणा मोडीत निघालेला माणूस वाकलेलाच असतो, त्यामुळे अबु आजमी समोर वाकला काय आणि सोनियांसमोर त्याला काय फरक पडतोय?
चीन प्रकरणात मोदींवर टीका करणे ही राहुल गांधींची मजबुरी आहे. चीनच्या नादी लागून भारताचा भूभाग गमावण्याची सुरूवात त्यांचे आजोबा पंडीत नेहरू यांनी केली, नव्या पिढीला हा इतिहास माहीत नाही या गैरसमजातून राहुल गांधी हे पाप मोदींच्या माथी मारू इच्छितात. जेव्हा जेव्हा काँग्रेसचे सरकार आले चीनने भारताचा भूभाग लाटला. यूपीएच्या कार्यकाळात चीनने लडाखच्या भूभागात प्रचंड घुसखोरी केली. तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह मख्ख बसून राहिले. कदाचित २००८ मध्ये काँग्रेस आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीत झालेल्या करारात हीच रणनीती ठरली असावी.
लोक हे सगळं विसरून गेले अशा भ्रमात राहून राहुल गांधी मोदींच्या विरोधात ही पप्पूगिरी करत असतात.
त्यांची आणि उद्धव ठाकरेंची मजबुरी एकच आहे. मोदी नावाच्या वावटळीसमोर यांचे टुकार नेतृत्व पालापाचोळ्या सारखे उडून जाण्याचे भय त्यांच्या मनात आहे. राजकारण संपले तर दुकान बंद होईल, दुकान बंद झाले तर टक्केवारी बंद होईल, टक्केवारी बंद झाली तर आजूबाजूला शीतासाठी जमलेली भूतं दिसेनाशी होतील, हेच भय मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात अत्यंत खोटारडी टीका करायला भाग पाडते. त्यात देशाचा, जवानांचा मान सन्मान पायदळी तुडवला जात असेल तर जाऊ दे, असा हा मामला आहे.
‘शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीनसमोर पळे’, अशी ‘राहुल गांधीगिरी’ त्यातूनच सुचते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या साडे तीन लाख वीज जोडण्या तोडायला निघालेले ठाकरे सरकार सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत हळहळ व्यक्त करते, या मुद्द्यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. राज्यातला शेतकरी, कामकरी, दुकानदार, महिला, व्यापारी हे सर्वघटक वाऱ्यावर सोडून उद्धव ठाकरे कोणासाठी कपाळ बडवतायत?
राज्यातील कोणत्याच समाज घटकाच्या सुखदु:खाबाबत हालचाल न करणारे हे ढीम्म सरकार लोकांच्याही डोक्यात गेले आहे. जनतेत इतका असंतोष आहे की आज निवडणूक झाली तर लोक महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील तिन्ही पक्षांना गाडून टाकतील.
कार्यक्षमता नाही, व्हिजन नाही फक्त घरी बसायचे आणि तोंडाच्या वाफा सोडायच्या एवढेच काम. त्यामुळे उद्धवजींना राहुल गांधीगिरी करण्यावाचून पर्यायही नाही. उद्धवजींना शिवसेनाप्रमुखांचा मार्ग झेपला नाही, मोदींचा झेपणार नाही. जेवढे झेपते तेवढेच करण्याकडे माणसाचा कल असतो आणि उद्धवजी तेच करतायत. ही ‘राहुल गांधीगिरी’ त्यांची त्यांना लखलाभ!