‘गादी’वान झाले ताटाखालचं मांजर; मग अपमान होणारच ना ?

शाहू आणि त्यांच्या सुनबाई यांना एका माजी नगरसेवकाच्या बंडाचे भय वाटले.

‘गादी’वान झाले ताटाखालचं मांजर; मग अपमान होणारच ना ?

गादीला झळाळी असते मोठंपण असते ते परंपरा आणि वारशाचे, गादीवर बसणाऱ्याला ते मोठेपण झेपते की नाही, हाही मुद्दा महत्वाचा. कोल्हापूरच्या गादीवर बसलेले शाहू स्वत:च्या नावामागे छत्रपती बिरुद लावतात. छत्रपती म्हटलं की अवघ्या महाराष्ट्राची मान अदबीने झुकते. परंतु शाहू आणि संभाजे या पितापुत्रांच्या जोडीने या फडतूस राजकारण करून या बिरुदाला बट्टा लावण्याचे काम केले आहे. काँग्रेसचा एक स्थानिक नेता शाहूंच्या सुनेला दमबाजी करतो असे चित्र काल महाराष्ट्राने पाहीले. काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झालेल्या शाहूंच्या बोटचेप्या प्रतिमेमुळेच ही वेळ आलेली आहे.

कोल्हापूरच्या गादीवर विराजमान शाहू लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसच्या तंबूत गेले. उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. काँग्रेसचे खासदार झाले. खासदार झाल्यावर ते छत्रपतींची शिकवणूक विसरून काँग्रेसच्या मार्गावर चालायला लागले. तुष्टीकरणाचा चिखल तुडवू लागले. विशाळगडावर अनधिकृत बांधकामांवर सरकारने हाथोडा चालवताच, शाहू विशाळगडावर जाऊन अल्पसंख्यकांसमोर कान पकडून माफी मागतायत, असे चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. हा दर्गा उभारताना बहुधा त्यांना गाढ झोप लागली असावी. बहुधा नशीबाने मिळालेला मोठेपणा त्यांना पेलवला नाही. त्याची फळे त्यांना सुनेच्या अपमानाच्या रुपात त्यांना भोगावी लागतायत.

शाहूंच्या सुनबाई आणि मालोजी राजे यांच्या पत्नी मधुरीमा यांनी कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याच मतदार संघात काँग्रेसचे माजी नगरसेवक राजू लाटकर यांनीही उमेदवारी दाखल केली होती. अर्थात उघड बंडखोरी. म्हणजे गादीच्या विरुद्ध झेंडा फडकावला तो काँग्रेसच्या बंडखोराने. शिवसेनेचे राजेश क्षीरसागर इथूनच लढतायत. राजू लाटकर यांची बंडखोरी ही आपले नाक कापण्याची खेळी आहे. असा संशय शाहूंना आला. त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून त्यांनी खटपटी लटपटी केल्या.

काँग्रेस राजकारण अजून त्यांना कळलेले दिसत नाही. राजू लाटकर यांनी काही अर्ज मागे घेतला नाही. तेव्हा मात्र पक्षातील काही लोक मधुरीमा यांना पाडून आपले तोंड काळे करण्याचा प्रयत्न करीत असल्याची शाहू यांची खात्री झाली. काल सोमवारी शाहू, त्यांचे पुत्र मालोजी आणि मधुरीमा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेतला. वाटेत त्यांनी कोल्हापूरचे काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांना फोन करून अर्ज मागे घ्यायला जात असल्याची माहिती दिली. बंटी पाटील यांचे कोल्हापूरच्या राजकारणातले प्रस्थ मोठे आहे. त्यांची ताकद विरोधकही मान्य करतात. या प्रकारामुळे ते खवळले. त्यांनी तडक जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन मधुरीमा यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु ते येण्याच्या आधीच सगळा गेम झाला होता.

मधुरीमा यांनी अर्ज मागे घेतला होता. या प्रकारामुळे चिडलेल्या बंटी पाटील यांनी शाहूंच्या परिवाराचा कॅमेरासमोरच उद्धार केला. ‘साहेब तुम्ही माझी फसवणूक केली’, हे शाहू यांना ऐकवलेच, परंतु एवढ्यावर ते थांबले नाहीत. ‘दम नव्हता तर अर्ज भरला कशासाठी? नसता भरला तर मी माझी ताकद दाखवली असती.’ या शब्दात त्यांनी शाहू यांच्या परिवाराची खरडपट्टी काढली. थोडक्यात शाहूंची लायकी काढली.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील महिलांनी जागे होण्याची वेळ!

‘गाझावर १० ट्वीट, पण कॅनडातील हिंदूंबाबत मौन’

‘संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक’

सरकार प्रत्येक खासगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकत नाही

निवडणूक तोंडावर असताना कोल्हापूर उत्तर सारख्या मजबूत जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने माती खाल्यामुळे बंटी पाटील यांचे भडकणे स्वाभाविक आहे. याला म्हणतात पहिल्या घासाला अन्नात माशी पडणे. त्यांची नाराजी स्वाभाविक नाही
का? बिथरलेले बंटी पाटील गादीचा मान विसरले. त्यांनी शाहू आणि त्यांच्या सुनेला सुनावले. अद्वातद्वा बोलले. यात जर चूक असलीच तर ती शाहूंची आहे. ते छत्रपतींच्या गादीवर विराजमान होते. ते तिथून खाली उतरले खासदारकीच्या गादीसाठी. बंटी पाटील आणि स्वत:ला त्यांनी एका पातळीवर आणण्याचे काम केले. आज ते काँग्रेसचे यत्कश्चित खासदार आहेत. राहुल गांधी जसे बंटी पाटील यांचे नेते तसे शाहूंचे नेतेही आहेत. एका बाजूला छत्रपतींचा वारसा सांगायचा आणि दुसऱ्या बाजूला त्या वारशाच्या विरुद्ध अवघे राजकारण रेटणाऱ्या पक्षाच्या पालख्या खांद्यावर घ्यायच्या असा प्रकार शाहूंनी केला.

शाहू आणि त्यांच्या सुनबाई यांना एका माजी नगरसेवकाच्या बंडाचे भय वाटले. हा आपल्याला पाडेल अशी भीती वाटली म्हणून त्यांनी माघार घेतली हे त्यांना नाकारता येईल का? ही माघार पराभवाच्या भीतीने झालेली आहे. याला काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची किनारही आहे. कोल्हापूरात बंटी पाटील यांची ताकद आहे. ही ताकद वाढते आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांना ही ताकद खुपत होती. त्यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये बंटी पाटलांना धोबीपछाड देणारे राजकारण केले. त्यात त्यांना यश येतानाही दिसते आहे. मधुरीमा यांनी माघार घेतल्यानंतर राजू लाटकर हेच आमचे अधिकृत उमेदवार असतील असे जाहीर करायला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजिबात वेळ घालवला नाही.

गलिच्छ अंतर्गत राजकारण हा काँग्रेसच्या राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. शाहू यांचा परिवार या चिखलात उतरल्यामुळे त्यांच्या तोंडावर वारंवार शिंतोडे उडणार हे त्यांनी धरून चालले पाहिजे. कोल्हापूरकर काय किंवा महाराष्ट्राची जनता काय,
कोणीही कोल्हापूरच्या गादीचा मान ठेवावा अशी अपेक्षा करण्यापूर्वी ते भान स्वत: शाहू आणि त्यांच्या परीवाराला असणे गरजेचे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version