पंतप्रधान मोदींचा पुनरुच्चार; मी पुन्हा येईन…

मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्मबाबत सूचक पुनरुच्चार केला

पंतप्रधान मोदींचा पुनरुच्चार; मी पुन्हा येईन…

देशाने आज ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी ८६ मिनिटांचे तडाखेबंद भाषण केले. केंद्र सरकारच्या कामकाजाचा ताळेबंद मांडला. भाषणातून भारताच्या सुवर्णमयी भविष्यकाळाचे चित्र उभे केले. त्या दिशेने कशाप्रकारे पुढे जाता येईल याबाबत मार्गदर्शन केले. पुढच्या स्वातंत्र्यदिनी मी आपल्यासमोर देशाच्या प्रगतीचा, पूर्ण झालेल्या संकल्पांचा लेखाजोखा मांडेन, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. विरोधकांना हा आत्मविश्वास फारसा रुचलेला दिसत नाही.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाची अनेक वैशिष्ट्य असतात. त्यांचा रंगबिरंगी रुबाबदार फेटा, त्यांचे उत्स्फूर्त भाषण. हातात कागदाचा एक कपटा घेतल्याशिवाय ते बोलतात. सरकारच्या विविध योजना, त्यांचे यश आकडेवारीसह लोकांच्या समोर मांडतात. भविष्यातला भारत घडवण्यासाठीची ब्लू प्रिंट लोकांसमोर ठेवतात. यावेळीही त्यांनी जनतेच्या आशा आकांक्षाना फुंकर घालणारे भाषण केले. सर्वात महत्वाचे म्हणजे मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्मबाबत सूचक पुनरुच्चार केला. आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत भारत पहिल्या तीन क्रमांकात असेल असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे.

पंतप्रधान म्हणून दुसऱ्या टर्मच्या काळातील अखेरचा स्वातंत्र्यदिन आज होता. २०२४मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. तिसऱ्यांदाही आपलाच विजय होणार असे मोदींनी लालकिल्ल्यावरून जाहीर केलेले विरोधकांना कसे आवडेल? काँग्रेसला मात्र हा मुद्दा प्रचंड झोंबलेला आहे. ‘कोणाला जिंकवायचं आणि कोणाला हरवायचं हे जनतेच्या हातात असते. मी २०२४ मध्ये लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवेन, असे पंतप्रधान २०२३ मध्येच म्हणत असतील तर हा उद्दामपणाच आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.

प्रत्येक स्वातंत्र्यदिनी ते जर विरोधकांवर टीकास्त्र सोडत राहीले तर देश कसा घडवणार?’ असा सवाल ही त्यांनी केला. प्रत्यक्षात ही टीका करणारे खर्गे काँग्रेस मुख्यालयातील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधान मोदींवर जळजळीत टीका करत होते. मोदी विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप करत होते. ते स्वत: लालकिल्ल्यावरील सोहळ्याला गैरहजर होते. काँग्रेस मुख्यालयात झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात त्यांनी पंतप्रधानांवर यथेच्छ टीका करून घेतली.

‘पंतप्रधानांना स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आणि राजकीय कार्यक्रम यात फरक कळत नाही’, अशी टीका काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी केलेली आहे. तीच टीका त्यांनी खर्गेंवर करायला हवी होती. परंतु दिव्याखाली असलेल्या अंधारावर बोलण्याची काँग्रेसची परंपरा नाही. २०२४ चे निकाल भाजपाच्या बाजूने लागतील, असे ठामपणे सांगून पंतप्रधान विरोधकांना आव्हान देतायत. विरोधकांची I.N.D.I.A. आघाडी मोदींना सत्तेवरून हटवण्याच्या उद्देशाने बनवण्यात आली आहे. मीच येणार अशा आशयाची वक्तव्य करून मोदी या आघाडीला खिजवतायत. त्यांची हवा काढण्याचा प्रयत्न करतायत.

‘२०१४ मध्ये मी तुम्हाला परिवर्तनाचे आश्वासन दिले होते. तुम्ही मला आशीर्वाद दिलात. परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्स्फॉर्म अशी त्रिसूत्री राबवून, कठोर परीश्रम करून हे आश्वासन मी पूर्ण केले. २०१९ मध्ये आम्हाला पुन्हा परफॉर्मन्सच्या आधारावर सत्ता मिळाली. २०२४ मध्ये अभूतपूर्व विकासाचे लक्ष्य आपल्याला गाठायचे आहे’, असे मोदी म्हणाले. मोदींच्या भाषणात कधीच संदिग्धता नसते. सगळं काही स्पष्ट आणि स्वच्छ. २०२४ बाबत त्यांनी व्यक्त केलेला आत्मविश्वास काँग्रेस आणि विरोधी आघाडीतील नेत्यांना खटकतो आहे. त्यामुळे लोकांनाही तो खटकेल असे मानण्याचे कारण नाही. मोदींना आपलं घर भरायचे नाही, कारण त्यांचे घरच नाही. त्यांना त्यांच्या नातेवाईकांचेही भले करायचे नाही. त्यांना ना मुलगा, ना पुतण्या. हा सगळा तपशील लोकांना व्यवस्थित माहिती आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा केली होती. निकालाची आकडेवारी पाहिली तर त्यांचा आत्मविश्वास चूक नव्हता. शिवसेनेने पलटी मारली नसती तर तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले असते. शिवसेनेच्या राजकारणामुळे त्यांचे मी पुन्हा येईन… तब्बल अडीच वर्षे लांबले. मोदीही मी पुन्हा येईन असे ठामपणे सांगतायत. दोन्ही बाबतीत फरक एवढाच की महाराष्ट्रात सत्तेसाठी आज तरी युती-आघाडीच्या राजकारणाला पर्याय दिसत नाही. केंद्रात भाजपाची एक हाती सत्ता आहे. केंद्र सरकारमध्ये भाजपाच्या मित्र पक्षांचा सहभाग असला तरी त्यांच्या कृपेवर सरकारचे अस्तित्व अवलंबून नाही.

हे ही वाचा:

चाचणी न देताच संघात आलेल्या विनेशची आशियाई स्पर्धेतून माघार

केंद्र सरकारने ठरवले टॉमेटो विकायचे ५० रुपये किलो दराने!

भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ध्वजारोहण !

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन

भाजपा आणि त्यांच्या आधी जनसंघाने गेली अनेक दशके त्यांच्या जाहीरनाम्यात कलम ३७०, राममंदीर आणि समान नागरी कायद्याचे आश्वासन दिले. २०१४ पर्यंत अयोद्धेत भव्य राम मंदीर उभे राहील असे कोणालाही वाटत नव्हते. कलम ३७० हटेल असेही कुणाला वाटत नव्हते. नऊ वर्षांच्या कार्यकाळात मोदींनी या दोन्ही अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी साध्य केल्या. आता समान नागरी कायदाही फार दूर नाही. तिसऱ्या टर्ममध्ये अभूतपूर्व विकासाचे आश्वासन मोदींनी दिले आहे. पण कोणी सांगावे, सोबत पाकव्याप्त काश्मीरची भेट मोदी त्यांच्या परिवार जनांना, अर्थात देशवासियांना देतील. हे काम जर कोणी करू शकेल तर ते फक्त मोदीच हे लोकांना माहीत आहे. म्हणून जनता सुद्धा २०२४ मध्ये ‘मी पुन्हा येईन’ ही मोदींची भविष्यवाणी खरी करण्यासाठी हातभार लावणार हे नक्की.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version