अहद पेशावर तहद तंजावर, हिंदवी स्वराज्य… हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते. पहिले बाजीराव पेशवे यांच्या कारकीर्दीत या स्वप्नाला मूर्त रूप यायला सुरूवात झाली. मराठ्यांचे झेंडे माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीत अटकेपार फडकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोल्हापूरच्या सभेत या स्वप्नाचा पुनरोच्चार केला. एका बाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हिंदूंची संपत्ती अल्पसंख्यकांमध्ये वाटण्याचे डोहाळे लागलेले असताना मोदींनी छत्रपतींच्या स्वप्नाचा केलेला पुनरुच्चार ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
अहद पेशावर, तहद तंजावर, हिंदवी स्वराज, ही घोषणा नसून अखंड भारताचे स्वप्न आहे. असा अखंड भारत जिथे हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकत असेल. छत्रपती शिवरायांनी हे स्वप्न पाहिले. २०२४ हे वर्ष भारतीय इतिहासातील अत्यंत
महत्वाचे वर्ष आहे. कारण हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला याच वर्षी २० जून रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. अखंड भारताचे स्वप्न उराशी बाळगून अस्तित्वात आलेल्या रा.स्व.संघाच्या स्थापनेला यंदाच्या विजयादशमीला ९९ वर्ष पूर्ण होत आहेत. संघाचे शतक महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. याच वर्षी लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. देशात विभाजनवादी एजेंडा राबवणाऱ्या शक्ती आणि अखंड, सशक्त आणि संपन्न भारताचे स्वप्न पाहणाऱ्या शक्ती यांच्यामध्ये सरळ मुकाबला पाहायला मिळतो आहे. हा संघर्ष सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अहद पेशावर, तहद तंजावर, हिंदवी स्वराज्य… या स्वप्नाची पुन्हा आठवण करून दिली.
ही घोषणा महाराष्ट्राच्या मातीत झाली, ही मातीत विभाजनवादी शक्तींना उत्तर देईल हा मोदींनी व्यक्त केलेला आशावाद ऐतिहासिक आहे. मोदींनी कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंवर केलेली टीका वाचाळवीर संजय राऊत यांना झोंबलेली दिसते. मोदींचा जन्म गुजरातमध्ये झाला. औरंगजेबाचा जन्मही गुजरातमध्ये झाला. म्हणून मोदींमध्ये औरंगजेब संचारतो अशी जहरी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात औरंगजेबाचे समर्थन करणारा फक्त एकच पक्ष आहे. तो म्हणजे शरद पवारांचा पक्ष. जितेंद्र आव्हाड यांनी तर औरंगजेब कसा क्रूर आणि हिंदूविरोधी नव्हता याचे सर्टिफिकेट जारी केले आहे. आव्हाड हे शरद पवारांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्याच मनातले बोलत असतात. त्यामुळे औरंगजेब आणि त्याचे समर्थक राऊतांच्या अगदीच जवळ आहेत. ते उगाच गुजरातपर्यंत धाव घेतायत, हे त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा!
अदानी बंदराबाबत फेक बातमी पसरवणारा ‘तो’ व्हिडीओ गुजरातचा नाही इजिप्तचा !
‘राजपुत्रामध्ये नवाब, निजाम, सुलतान आणि बादशाह विरोधात बोलण्याची ताकद नाही’
२०१५पासून आम आदमी पार्टीने जाहिरातींवर केला १५०० कोटी रुपयांचा खर्च
काशी कॉरीडोअरचे लोकार्पण करताना जेव्हा जेव्हा औरंगजेब जन्माला येतो, तेव्हा त्याला रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजही उभे ठाकतात, असे विधान केले होते. गॉडफादर शरद पवारांमध्ये किंवा मालक उद्धव ठाकरेंमध्ये असे विधान करण्याची धमक आहे का, हे एकदा राऊतांनी त्यांना विचारले पाहिजे. बाकी सोनिया गांधींना घाबरून ज्यांचे मालक अयोध्येतील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत, त्यांच्या तोंडी महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची माती… हे शब्द शोभत नाहीत. छत्रपतींच्या इतिहासाबाबत फार बडबड न करता गुमान काँग्रेसची धुणीभांडी करावीत.
इंडी आघाडीतील तमाम पक्षांचा एजेंडा हिंदूविरोधी आहे, याबाबत आता कोणलाही शंका उरलेली नाही. एका बाजूला द्रमुक पक्षाचे नेते सनातन विरोधी बोल बोलतायत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांग खरगे त्याला दुजारो देतायत. कर्नाटक दक्षिण भारतातील नेते दक्षिणेच्या विभाजनाची भाषा करतायत. काँग्रेस नेत्यांनी सीएए रद्द करणार, ३७० कलम पुन्हा आणणार, समान नागरी कायद्याला विरोध करणार अशी घोषणाच केली आहे. काँग्रस नेते राहुल गांधी तर उघड उघड हिंदूंची संपत्ती जप्त करून अल्पसंख्यांकांमध्ये वाटण्याची भाषा करतायत. मोदींनी सुद्धा या मुद्द्यावरून काँग्रेसला झोडले आहे. काँग्रेस नेते याबाबत मूग गिळून बसले असताना मोदींचे आरोप खोटारडे असल्याची टीका राऊत करतायत. म्हणजे चाय से किटली गरमवाला मामला आहे. अहद पेशावर, तहद तंजावर, हिंदवी स्वराज्य ही घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मातीत दिली ती माती या मनसुब्यांना पूर्ण होऊ देणार नाही असे मोदी म्हणाले.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)