नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार

देशाने एक काळ असाही पाहिला जेव्हा डावे इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वापेक्षा क्रूरकर्मा औरंगजेबाच्या प्रेमात होते. शिवरायांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि पराक्रमापेक्षा त्यांना औरंग्याच्या टोपी विणण्याचे कौतुक जास्त होते. काँग्रेसचे नेते मुघल इतिहासाला कुरवाळत होते. अकबराची उंची मोजत होते. महाराष्ट्रातील खुजे नेतेही शिवाजी महाराज कुणबी की ९६ कुळी असा विखारी वाद घालून हिंदुस्तानच्या या दैवताला जातीच्या मखरात सजवण्याचा प्रयत्न करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्याच शिवरायांना पुन्हा मस्तकी धारण केले आहे. कोची येथे आयएनएस विक्रांतच्या लोकार्पणाच्या सोहळ्यात नौदलाच्या नव्या चिन्हाचे अनावरण मोदींच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात हे नवे चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करण्याची घोषणा मोदींनी या कार्यक्रमात केली.

किती विपरीत चित्र आहे पाहा. शिवरायांना जन्म महाराष्ट्रात झाला. परंतु तिथेच अनेकांनी दाढ्या कुरवाळण्याच्या राजकारणासाठी इतिहासाची मोडतोड केली. हिंदवी स्वराज्यासाठी लढणाऱ्या, इस्लामी आक्रमकांच्या धर्मवेडाशी झुंजणाऱ्या शिवरायांना सेक्युलर, मुस्लिमांचे तारणहार बनवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या सैन्यात ५७ टक्के मुस्लीम होते, त्यांनी मशिदी उभारल्या, मशिदींना वतने दिली, त्यांचे गुरू मुस्लीम होते, अशा वारेमाप थापा मारणारा पिवळा-ब्रिगेडी इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ज्यांच्या विरोधात महाराज लढले, त्यांचे महिमामंडन करण्याचा प्रयत्न झाला, ज्याने हिंदुंची शेकडो मंदिरे फोडली, हिंदूंची हत्यांकाडे केली, बाटवावाटवी हा ज्याचा छंद होता, देशात इस्लामी राज्य निर्माण करण्याचे ध्येय ठेवून जो जगला, हिंदवी स्वराज्य खणून काढण्यासाठी जो अखेरच्या श्वासापर्यंत लढला तो औरंगजेब टोप्या विणून आपला उदरनिर्वाह चालवायचा असा भाकड इतिहास लिहून त्याच्या आरत्या ओवाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अफजलखान हा धर्मवेडा आक्रमक नव्हता तर तो केवळ आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी स्वराज्यावर चालून आला होता, असे युक्तिवाद करण्यात आले.

इतिहास संशोधनाशी काडीचा संबंध नसलेले इतिहासकार महाराष्ट्राला नवा पिवळा इतिहास सांगत होते. इतिहासाचार्य शरद पवार आणि त्यांचे चेले-चपाटे यात आघाडीवर होते. त्यात कोकाटे, आव्हाड अशा अनेकांचा सहभाग आहे. शिवाजी महाराज गुजराथ्यांच्या विरोधात होते म्हणून त्यांनी सुरतेवर स्वारी केली, अशी विषारी तर्कटे पेरण्याचे काम या नमुन्यांनी केले.

महाराष्ट्रातील पिवळे इतिहासकार हे धंदे करत असताना मोदींनी छत्रपतींचा इतिहास मस्तकी धरला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी यांना भाजपाने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले. महाराष्ट्रात प्रचाराला आलेले मोदी छत्रपतींचे आशीर्वाद घेण्यासाठी रायगडावर गेले, शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले. काशी विश्वेश्वर मंदिराच्या नूतनीकरणाच्या सोहळ्यात सहभागी झालेल्या मोदींनी छत्रपतींच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा दिला. जेव्हा औरंगजेब निर्माण होतो, तेव्हा एखादा शिवाजी त्याच्यासमोर उभा ठाकतो, त्याला आव्हान देतो या शब्दात त्यांनी नेमक्या शब्दात महाराजांचे जीवनकार्य लोकांसमोर मांडले.

जवाहरलाल नेहरुंना महाराष्ट्राबाबत कमालीचा आकस होता. ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्रात आचार्य अत्रे यांनी याबाबत तपशीलात लिहिले आहे. मराठी जनांच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे नेहरुंनी त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात असलेला छत्रपतींचा अपमानास्पद उल्लेख गाळला होता. परंतु मुघली इतिहासाची भलामण करण्याऱ्या या नेत्यांना छत्रपतींचे राजकारण आणि त्यांचे कार्य कधी उमगलेच नाही. तेवढी त्यांची उंची नव्हती. याला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे काही सन्माननीय अपवादही होते. गेट वे ऑफ इंडीयाच्या समोर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर पाकिस्तानची सीमा महाराष्ट्रापर्यंत आली असती, असे त्यांनी नि:संदिग्ध शब्दात सांगितले. परंतु काँग्रेसमध्ये अशी उदाहरणे विरळाच आहेत.

हे ही वाचा:

निसर्गाच्या कडेलोटाने चीनमध्ये दुष्काळाचा तेरावा

महत्त्व गणपती स्तोत्र उच्चारणाचे

शिरच्छेद करण्याचा फतवा काढणारा मशिदीतील स्फोटात ठार

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर गडकरींचा मेगा प्लॅन

 

या पार्श्वभूमीवर मोदींनी केलेला शिवरायांचा गौरव अगदी ठसठशीतपणे दिसतो. नव्या नौदल चिन्हावर शिवरायांच्या राजमुद्रेची आठवण करून देणारा अष्टकोनी आकार आहे. हा आकार त्या राजमुद्रेवरूनच घेण्यात आला आहे, असा उल्लेख या चिन्हाबद्दल माहिती देताना नौदलाच्या अधिकाऱ्याने केला. एकेकाळी जगात सामर्थ्यशाली असलेल्या भारताच्या नौदलाचा गौरव पुनर्स्थापित करण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले. सागरी किल्ले उभारले, सशक्त नौदलाची बांधणी केली. त्यांच्या या दूरदृष्टीची पूर्ण कल्पना त्यांचे कडवे शत्रू असलेल्या मुघल, पोर्तुगीज, इंग्रजांना होती. छत्रपती शिवराय यांना आणखी काही वर्षे आयुष्य मिळाले असते तर औरंगजेबाला महाराष्ट्रात येण्याची गरज भासली नसती तेच उत्तरेत जाऊन औरंगजेबाला भिडले असते, असे मत इतिहासकारांनी नोंदवलेले आहे.

डाव्या भारतीय इतिहासकारांनी त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केले, ज्यांच्या जीवितकार्याने मराठ्यांना अटकेपार भगवा फडकवण्याची प्रेरणा दिली त्या पराक्रमी योद्ध्याला महाराष्ट्रातील काही जातवादी नेत्यांनी त्यांना जातीच्या चौकटीत कोंडण्याचा प्रयत्न केला. परंतु मोदींनी या सर्वांना त्यांची लायकी दाखवली. केरळच्या पावन भूमीत दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या मोदींनी हिंदुस्तानचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा गौरव केला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version