मविआमध्ये मुख्यमंत्री पदावरून लफडी सुरू आहेत, परंतु महायुतीही काही आलबेल नाही. भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केलेली आहे. मशिदीत घुसून मारू… वगैरे भाषेबाबत नापसंती व्यक्त केली आहे. अर्थात अजितदादांनी मीडियासमोर तसे काही विधान केलेले नाही. नितेश यांनीही त्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सगळा मामला सूत्रांचा आहे. तरीही असे घडले असेल असे मानायला वाव आहे. नितेश यांच्या भाषेमुळे अजितदादांना काही समस्या होत असेल. परंतु ती त्यांची त्यांनी सोडवावी. भाजपाने, त्याचा विचार करण्याची काही गरज नाही. भाजपा नेतृत्वानेही नितेश यांचा किरीट सोमय्या करण्याचा प्रयत्न करू नये.
हिंदू समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत एखाद्या राजकीय पक्षाच्या बॅनरखाली एकवटण्यापेक्षा सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली गेल्या काही काळात हिंदू समाज एकवटतो आहे. विषय लव जिहादचा असो, लँड जिहादचा, हिंदू संतांना दिलेल्या धमक्यांचा किंवा अलिकडे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीचा. राज्यभरात सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली हिंदूंचे आक्रोश मोर्चे निघतायत.
खरे तर राज्यात दोन हिंदुत्ववादी पक्ष सत्ता राबवत असताना हिंदुत्ववाद्यांना जिहादी तत्वांच्या विरोधात आक्रोश मोर्चे काढावे लागणे ही काही चांगली बाब नाही. गृहखात्यांची इतकी दहशत हवी की लव जिहाद, लँड जिहादचे चाळे म्हणजे जीवाशी खेळ वाटावा इतकी दहशत हवी. दुर्दैवाने, ही परिस्थिती महाराष्ट्रात नाही. परंतु हिंदू समाजावर एखादा अन्याय अत्याचार झालेला असताना शामळू सारखे सहन करत बसता आपण एकवटले पाहिजे, किमान जिहाद्यांना शिव्या घालून आपली भडास काढली पाहिजे, त्यांना शाब्दिक का होईना इशारा दिला पाहीजे, असे हिंदू समाजाला वाटते हे काही कमी नाही.
संत रामगिरी महाराजांना राज्यातील जिहादींनी ‘सर तन से जुदा…’ करण्याची धमकी दिली. तेव्हा तमाम लोकशाहीवादी, संविधानवादी, तोंडात मळी भरल्यासारखे शांत बसले. जीवे मारण्याची धमकी कशी काय देता? हे घटनेच्या तत्वांच्या विरोधात आहे, असे सांगणारा एकही मायेचा पूत महाराष्ट्रात दिसला नाही. परंतु सर तन से जुदावाल्यांना जेव्हा नितेश राणे यांनी दम भरला. मशिदीत घुसून मारण्याची भाषा केली तेव्हा सगळ्यांची टकळी सुरू झाली. अजितदादांची कथित नाराजीही त्याच बाबतीत आहे, असे म्हणतात.
खरे तर अजितदादा हे जातीच्या बाबतीत असो वा धर्माच्या बाबतीत विखारी भूमिका घेण्याबाबत प्रसिद्ध नाहीत. ते अशा प्रकारची विधाने कधीही करत नाहीत. हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला वाखाणण्यासारखा गुण आहे. आय़ुष्यभर शरद पवारांच्या सोबत राहूनही त्यांनी शरद पवारांसारखे राजकारण केले नाही. परंतु मूळ काँग्रेसच्या विचारातील सेक्युलर कंड त्यांनाही अनेकदा सुटत असतो. ‘मशीदीत घुसून मारू…’ या नितेश राणे यांच्या वक्तव्याने ज्यांचे ब्लड प्रेशर वाढले, अशा किती लोकांनी संत रामगिरी महाराजांना जेव्हा ‘सर तन से जुदा’ची धमकी देण्यात आली तेव्हा संताप व्यक्त केला होता? की अशा प्रकारच्या धमक्या देणे आणि त्यांची अमंलबजावणी करणे हा जिहाद्यांना आणि त्यांची पाठराखण करणाऱ्यांना त्यांचा जन्मसिद्ध अधिकार वाटतो.
अलिकडेच महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विसर्जनाच्या दिवशी भिवंडी, जामोद, बुलढाणा अशा अनेक ठिकाणी मिरवणुकीवर दगडफेक कऱण्यात आली. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना यात काहीच गैर वाटत नाही. या प्रकारांचा त्या पक्षांचे नेते ज्यामध्ये अजितदादांचाही समावेश आहे, कधी निषेध करताना दिसत नाही.
म्हणजे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली तर त्याचा निषेध करायचा नाही, त्याचा नितेश राणे यांच्यासारख्या नेत्याने जळजळीत शब्दात निषेध केला तर लगेच त्यांच्या भाषेवर नापसंती व्यक्त करत, पाटणकर काढा घेतल्यासारखा चेहरा करायचा.
हे ही वाचा:
राऊत म्हणतात, लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्यामुळेचं काँग्रेसच्या जागा वाढल्या
आता दंगल केलीत तर भरून द्या! उत्तराखंडमध्ये कायदा
छे छे राहुल गांधी दहशतवादी नाहीत…
…पुन्हा रेल्वे उलटवण्याचा प्रयत्न, रुळावर टाकला ७ मीटरचा खांब!
भाजपा शिवसेना युती असताना उद्धव ठाकरेंची लफडी बाहेर काढल्यामुळे ठाकरेंनी वैतागून कसे किरीट सोमय्या यांना युतीच्या एका बैठकीतून बाहेर ठेवण्यास भाजपा नेतृत्वाला भाग पाडले, त्याचा किस्सा अलिकडेच सोमय्या यांनी उघड केला. नितेश यांचा किरीट सोमय्या होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने वक्फ बोर्डाला वेसण घालण्यासाठी सुधारित वक्फ कायदा आणण्याचे सुतोवाच केले आहे. सध्या हा विषय संयुक्त संसदीय समितीच्या समोर आहे. वक्फ बोर्डाने जिथे रुमाल ठेवला ती जमीन त्यांची असा मामला गेली काही वर्षे सुरू आहे. मग ती जमीन मंदिराची असो, मठाची असो, एखाद्याची खासगी जमीन असो.
शरद पवार मैदानात उतरले आहेत. ‘वक्फ बोर्डाची एक इंच जमीन बळकावायला देणार नाही’, असे त्यांच्या पक्षाचे बॅनर जिथे तिथे लागले आहेत. ही जमीन वक्फ बोर्डाने कुठून आणली ? अल्लाच्या कुराणमध्ये जे नाही ते मुस्लीम मानत नाही. कुराणामध्येही वक्फ बोर्डाचा उल्लेख नाही. मग देशात रेल्वेच्या खालोखाल जमिनीची मालकी मिळवण्याचा जो पराक्रम केला आहे त्याचा आधार काय? हा आधार म्हणजे निव्वळ मुस्लीम मतांसाठी काँग्रेसने केलेली बनवाबनवी एवढाच आहे. मुकेश अंबानी यांची एंटालिया ही इमारत म्हणे वक्फची प्रॉपर्टी होती. या प्रॉपर्टीवर अंबानींची इमारत उभी राहिली याचा अर्थ कोणी तरी या जमीनीवर ठेवलेला रुमाल काढून घेतला. तो काढून घेताना नेमका काय सौदा झाला? हेही वक्फ बोर्डाने स्पष्ट करायला हवे. देशभरात असे किती सौदे झाले? त्यात किती देवाण-घेवाण झाली? सेक्युलर नेत्यांना वाटा किती मिळाला? ही बाब जनतेच्या समोर आली पाहीजे. वक्फचा धंदा सुरू राहावा यात शरद पवारांसारख्या नेत्यांना मोठा रस आहे. पवारांना असाही जमिनीमध्ये कायम रस असतोच. लवासाचे उदाहरण महाराष्ट्राने पाहिलेले आहे.
वक्फ प्रकरणी शरद पवारांनी घेतलेली भूमिका स्पष्ट सांगते मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात. हिंदू समाजाचे अहित करण्यातही त्यांना समस्या नाही. अशी भूमिका घेणाऱ्या सेक्युलर नेत्यांना ते काही वावगे करत असल्याचे वाटत नाही, परंतु नितेश राणे यांच्यासारख्या हिंदुत्ववादी नेत्याने या भूमिकेचा शेलक्या भाषेत समाचार घेतला तर त्याबाबत गळा काढत फिरायचे, कांगावा करायचा असा सगळा मामला आहे. याच फूटपट्ट्या केंद्रीय मंत्री रवनीत सिंह यांच्या विधानांना लावल्या जात आहेत. ‘काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशातील नंबर एकचे दहशतवादी आहेत’, असे ते म्हणाले, म्हणून नाना पाटोले राज्यभरात आंदोलन करत फिरत आहेत. परंतु नाना पटोले एकदा तरी असे म्हणाले का की, ‘देशात शिखांना पगडी आणि कृपाण घालायला बंदी आहे’, हे राहुल गांधी यांचे विधान चुकीचे होते? देशातील सेक्युलर नेते रवनीत यांचे विधान कसे चुकीचे आहे, यावर चर्वण करतायत परंतु राहुल गांधी अमेरिकत जे शेण खाऊन आले, खलिस्तानवाद्यांच्या हाती खुळखुळा देऊन आले, त्याबाबत मात्र कोणी तोंड उघडत नाही. जणू राहुल गांधी यांच्याकडे शेण खाण्याचा परवाना आहे.
नितेश राणे यांच्या विधानामुळे अजित दादांचा कोंडमारा होत असेल तर त्याची दखल कशाला घ्या? ‘सर तन से जुदा…’ सारख्या घोषणा आणि गणेश विसर्जन मिरवणुकीवर होणाऱ्या दगडफेकीमुळे जो पर्यंत त्यांच्या मस्तकात तिडीक जात नाही, तोपर्यंत त्यांच्या संतापाची फार चिंता करण्याचे हिंदुत्वावादी सरकारला कारण नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)