महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातच शिवसेनेच्या विभाजनाची सुरूवात झाली. ती प्रक्रिया अजून थांबताना दिसत नाही. ही गळती थांबवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काय केले? पक्ष सोडून बाहेर पडलेल्या नेत्यांवर ठपका ठेवला. त्यांच्यावर टिकेचे शेणगोळे फेकले. त्यांच्याविरोधात गद्दार, घाण, मुडदे, खोके, मिंधे अशा नवनव्या शेलक्या शब्दप्रयोगांचा वापर केला. बदनामीची ही मोहीम अखंडपणे राबवण्यात आली. इतका आटापिटा करून गळतीची प्रक्रिया थांबताना दिसत नाही. नवे नवे ‘गद्दार’ बाहेर पडतातच आहेत. शिवसेनेत ‘गद्दार’ आहेत तरी किती ? की उद्धव ठाकरे ‘गद्दारांचे’च पक्षप्रमुख आहेत? असा सवाल लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे.
ठाकरेंच्या लक्षातच येत नाही की, इथे दोष गळणाऱ्या पाण्याचा नाही, फुटलेल्या मडक्याचा आहे. पक्षफुटीच्या घटनांचा इतिहास पाहिला तर सत्तेवर असलेला पक्ष विरोधी बाकांवर बसलेल्या पक्षांना फोडण्याच्या घटना जास्त आहेत. शिवसेनेच्या बाबतीत मात्र उलट झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, राज्यात मविआची सत्ता असताना शिवसेना फुटली. ४० आमदार बाहेर पडले. जे अडीच वर्षांपूर्वी घडले तेच पुढे अनेक टप्प्यांत सुरू आहे. कालपरवा राजन साळवी, सुभाष बने हे माजी आमदार फुटले. आता माजी आमदार वैभव नाईक आणि भास्कर जाधव यांच्या फुटीची चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा:
युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या मनात घाण, न्यायालयाने कान उपटले!
एलन मस्कची टेस्ला उघडणार मुंबई, दिल्लीत नोकरीची दारे
कॅनडातील टोरंटो विमानतळावर विमान उलटले; १८ प्रवासी जखमी
ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
कोणतीही घटना अचानक घडत नाही. मागे काही तरी घटनाक्रम निश्चितपणे असतो. २०२३ मध्ये नाणारमध्ये रत्नागिरी रिफायनरी होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रचंड विरोध केला. बारसूमध्ये आधी त्यांनी पर्यायी जागा सुचवली नंतर पुन्हा घुमजाव केले. जेव्हा हा वाद तापलेला होता, तेव्हा बारसू येथे रिफायनरी व्हायला हवी, असे मत राजन साळवी यांनी व्यक्त केले होते. तेव्हाच खरे तर संकेत मिळाले होते, की साळवींच्या डोक्यात वेगळे काही तरी सुरू आहे. नेते जोपर्यंत पक्ष सोडण्याचा विचार करत नाहीत, तोपर्यंत निष्ठेच्या आणाभाका घेणे त्यांना भाग. साळवींच्या पाठी एसीबीच्या चौकशीचा लकडा लागला होता. ते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले, परंतु काहीच मदत मिळाली नाही.
संकटाच्या काळात पक्षप्रमुख पाठीशी उभे राहात नाहीत, अशी खंत आधी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केली होती. त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या तेव्हा जाधवही मातोश्रीवर गेले होते. त्यांनाही मदत मिळाली नव्हती. तुमचे तुम्ही बघून घ्या… असा पवित्रा तेव्हाही ठाकरेंनी घेतला होता. अडीच-तीन वर्षांनी राजन साळवी यांच्या बाबत पुन्हा तेच घडताना दिसते आहे. थोडक्यात काय तर ठाकरे बदलेले नाहीत. ज्या विनायक राऊतांवर त्यांनी
कोकण सोडलेला आहे, ते करतील त्याला मम म्हणणे हे ठाकरे तेव्हाही करत होते, आताही करतायत. हे दोन राऊत ठाकरेंना बुडवण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवताना दिसत नाहीत. विनायक राऊत हे उद्धव ठाकरेंना इतके जवळ
का? त्याचे उत्तर अनेकांना माहीत नसेल. शिवसेनेचे पैसे घेऊन पद विकण्याची प्रथा सुरू करणारे विनायक राऊत हेच होते. त्यांनी ठाकरेंना पैशाची एक नवी वाट दाखवली होती.
यशवंत जाधव ते राजन साळवी तेच तेच आणि तेच घडताना दिसते आहे. ‘मला तुम्हाला देण्यासारखे काही नाही’, असे सांगणाऱ्या नेत्याच्या पाठीशी दमदार लोक उभे राहात नाही, असे नाही. परंतु असे म्हणणारा माणूस समाजासाठी सर्वस्व
उधळणारा असेल तरच. दुसऱ्याचे ओरबाडून तुंबड्या भरणाऱ्याने असे काही म्हटले तर लोक एक तर त्याची टिंगल करतील किंवा त्याला मनावर घेणार नाहीत. उद्धव ठाकरे नावाचा नेता, ना संघटनेचे भले करू शकत, ना आपले याची जाणीव आता शिवसैनिकांच्या मनात घट्ट झालेली आहे. शिवसेनाप्रमुखांचा धगधगता वारसा पुढे नेण्याचे सोडून ठाकरे काँग्रेसचा हिरवा वारसा पुढे नेतायत, यामुळेही अनेकांचा भ्रमनिरास झालेला आहे. म्हणून मी म्हणालो, दोष गळणाऱ्या
पाण्याचा नाही. फुटलेल्या मडक्याचा आहे.
शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे बदलेले आहेत, असा आभास निर्माण करण्यात ते काही प्रमाणात ते यशस्वी झाले होते. शिवसैनिकांसाठी, जनतेसाठी बंद झालेले मातोश्रीचे दरवाजे शिवसेना फुटल्यानंतर किलकिले झाले होते. दारावर जो येईल,
त्याच्याशी चर्चा करणे, त्याला शिवबंधन बांधणे असे प्रयोग ठाकरेंनी काही काळ इमाने इतबारे केले. भाजपाच्या पराभवासाठी ज्यांच्याशी शिवसेनेचा उभा दावा होता ते समाजवादी, कम्युनिस्ट, ब्रिगेडी तसेच कधी काळी ठाकरेंना कोत्या मनाचे, खुजे नेते म्हणणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे त्यांच्या कच्छपी लागले होते. ते भाजपाचा पराभव करू शकतील असे भास त्यांनाही होऊ लागले होते.
चौधरी आणि सरोदे असे आणखी दोन नमुने गोळा करून या मंडळींनी प्रचाराचा धुमधडाका उडवून दिला होता. उद्धव ठाकरे त्यांना भाजपा नावाच्या असूराचा नाश करायला जन्माला आलेल्या अवतारासारखे भासू लागले होते. परंतु राजन साळवी यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे वेध लागल्याच्या बातमीवर जेव्हापासून शिक्कामोर्तब झाले त्यानंतर हे तिघेही जाहीरपणे कपाळ बडवण्याचा कार्यक्रम करतायत. कोणत्याही विषयांवर बडबड करणारा, आपण बोट दाखवू त्याच्या विरोधात बेछूट टीका करणारा एक प्रवक्ता, एक मुखपत्र, एक गुलछबूंच्या गोतावळ्यात असलेला युवराज आणि अत्यंत बेताचे कर्तृत्व एवढ्या बेताच्या भांडवलावर ठाकरे पक्ष चालवतायत. हे कर्तृत्व इतके बेताचे आहे, की पक्ष नावाच्या मडक्याला पडलेले भोक बुजवण्याची ताकद सुद्धा यांच्यात उरलेली नाही. त्यामुळे कितीही दोष दिला तरी पाणी गळतच राहणार.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)