सत्तेवर आल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांना कवडीची मदत न करणारे शरद पवार आज आझाद मैदान येथील शेतकरी आंदोलनामध्ये सामील झाले. त्यांनी शेतकऱ्यांसमोर केलेल्या भाषणात यापूर्वी घेतलेल्या अनेक भूमिकेपासून घुमजाव केलेले आहे. पवारांचे राजकारण माहीत असलेल्यांना हा भंपकपणा नवा नाही.
शरद पवार यांच्याकडे दहा वर्षे केंद्रीय कृषी मंत्री पद होते. परंतु या काळात आय़पीएल आणि क्रिकेटमध्ये बिझी असल्यामुळे ते शेतकऱ्यांसाठी काही ठोस करू शकले नाहीत. ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीत शेतकऱ्यांना बाजारपेठ खुली करण्याच्या मुद्याची त्यांनी जोरदार वकीली केली होती. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरीत्रातही त्यांनी याचा उल्लेख केला. केंद्रात विविध मंत्री पदे सांभाळत असताना पंतप्रधानाकडे लक्ष ठेवून कसरती करण्यात वेळ गेला त्यामुळे निर्णायक काहीच करता आले नाही.
मुख्यमंत्री पदावर असताना यांच्या कारकीर्दीत गोवारी मोर्चावर गोळ्या घालण्यात आल्या. ११४ आंदोलकांचा बळी घेण्यात आला. ते पवार आता मोदींना आंदोलन हाताळण्याचे सल्ले देतायत. खरे तर त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हलाखीकडे लक्ष देण्याची गरज होती. त्यांचा रीमोट वापरून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सल्ला देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते. परंतु सत्तेवर येऊन वर्ष झाले तरी शेतकऱ्यांच्या हातात काही पडले नाही. त्यासाठी काही करण्याची गरज होती. परंतु बिनकामाच्याला कामाला लावायचे सोडून ते मोदींना सल्ले देतायत.
कंत्राटी शेतीच्या नावाने पवार, सुप्रिया सुळे ठणाणा करतायत. रोहीत पवार डायरेक्टर असलेली ‘बारामती अग्रो’ ही कंपनी करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे समजवून सांगते आहे. पवारांचा सहभाग असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने २००६ मध्ये काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा केला तोच कायदा आज मोदींनी आणला आहे. कृषी उत्पन्न समितीच्या बाहेर हजारो कंपन्यांना शेतमाल खरेदी करण्याचे परवाने दिले. तेच पवार आज कंत्राटी शेतीविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत. ही पवारांच्या राजकारणाची खासियत आहे.
हीच पवार खानदानाची खासियत आहे. ताई एकरात ११० कोटीची वांगी पिकवतात, पण त्यांचा फॉर्म्यूला शेतकऱ्यांना देत नाहीत. केंद्रातील कृषी मंत्री पद हाती असताना पवार इच्छा असूनही जे करू शकले नाहीत ते आज मोदी करतायत, पण पवारांनी मूळ भूमिकेवरून घुमजाव करत याला विरोध केला आहे. कारण त्यांना शेतकऱ्यांच्या हिताशी देणेघेणे नसून फक्त राजकारण करून आपल्या पोळीवर कुठूनही तूप ओढून घ्यायचे आहे. पवारांचे सगळे राजकारणच असे घुमजाव धोरणावर आधारीत असल्यामुळे जनतेने त्यांच्याकडे कायम घुमजाव केले. त्यामुळेच त्यांना आयुष्यात कधीही पूर्ण बहुमत आणता आले नाही, कायम कुलंगड्या करुन सत्तेवर येणे भाग पडले. या वयातही जेमतेम ५४ जागा मिळवण्यासाठी पवारांना पावसात भिजावे लागते. मीडियातील एक उपकृत वर्ग वगळता पवारांवर कोणाचा विश्वास नाही. उद्धव ठाकरेंची कालपर्यंतची भाषणे पाहीली तरी पवारांबाबत त्यांचे मत काय याचा उलगडा होऊ शकतो.
मोदींवर लोकांचा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणूनही विश्वास होता. त्याच विश्वासाच्या आधारावर ते देशाच्या सत्तेवर आले. सहा वर्षांनंतरही हा विश्वास तिळभरही कमी झाला नसल्याचे येणार प्रत्येक सर्वेक्षण सांगते आहे. जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. मोदी पवारांना फार मनावर घेत नाहीत त्याचे कारण एवढेच आहे.