26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरसंपादकीयबेअब्रु सरकार, रया गेलेले पवार

बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झालेली दिसते. एपीआय सचिन वाझे यांचे प्रताप शिवसेनेला जड जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सोडलेले मिसाईल दिशा बदलून अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे लागलेले आहे. मिटवामिटवीच्या प्रयत्नात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तोंडाला फेस आलेला दिसतो.

राजधानी दिल्लीत सोमवारी घेतलेल्या पत्रकार परीषदेत गडबडलेले-गांगरलेले शरद पवार जनतेला दिसले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल सफाई देताना पत्रकारांच्या प्रश्नामुळे पवार पुरते त्रिफळाचीत झालेले दिसले. महाराष्ट्रात पवारांचे महीमामंडन करणाऱ्या पत्रकारांची एक मोठी लॉबी आहे. त्यामुळे प. महाराष्ट्रापुरते प्रभावक्षेत्र असलेल्या पवारांच्या मर्यादा अभावानेच जनतेसमोर आल्या. पण जेव्हा जेव्हा त्यांना आव्हान देणारा शक्तीशाली नेता त्यांच्यासमोर उभा राहीला तेव्हा तेव्हा ते राजकारणाच्या आखाड्यात उताणे पडले हा इतिहास आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले

अंडरस्टँडीगचे राजकारण ही महाराष्ट्राची अनेक वर्षे खासियत राहीली आहे. भाजपा नेते गोपिनाथ मुंडे यांनी या राजकारणाला तडा दिला, पवारांच्या राजकारणाला ते पुरून उरले. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पवारांच्या राजकारणाचा पर्दाफाश केला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजपा-शिवसेना युतीची सत्ता आली.

हे ही वाचा:

संपुर्ण व्याजमाफी देणे अशक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सचिन वाझेचे बनावट आधार कार्ड ताब्यात

बंद शाळांसाठी पोषण आहाराचे कंत्राट; महानगरपालिकेचा अजब कारभार

मुंडे गेल्यानंतर पवारांच्या राजकारणाला आव्हान देणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. जनादेश धुडकावून सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तिघाडीसमोर फडणवीस यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.

सचिन वाझे यांच्या प्रकरणात खुद्द गृहमंत्री अडचणीत आल्यानंतर त्यांचा बचाव करण्यासाठी पवार सरसावले. यापूर्वी त्यांनी धनंजय मुंडे यांची सहीसलामत सुटका केली होती. शिवसेनेच्या संजय राठोड यांची विकेट गेली तेव्हा पवारांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्याला वाचवले परंतु शिवसेनेच्या मंत्र्याची मात्र विकेट काढली अशी चर्चा होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये वरचढ असल्याचे चित्र निर्माण झाले. वाझे प्रकरणाचे किटाळ उडाल्यानंतरही देशमुखांना पवार सहीसलामत बाहेर काढतील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना होता.

देशमुखांचा बचाव करताना ‘सरकार चालवताना अशा अडचणी येतात’, असे पवार म्हणाले होते. गृहमंत्र्यावर झालेल्या खंडणीखोरीच्या आरोपांना क्षुल्लक अडचणी म्हटल्यानंतर झटकून टाकणे सोपे होते. त्यासाठी केलेली स्क्रीप्ट मात्र एंटालियाच्या स्क्रीप्टसारखी अगदीच कच्ची निघाली.  देशमुख क्वारण्टाईन होते असे सांगून पवारांनी देशमुखांना क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला. सत्तेवर आल्यापासून ठाकरे सरकारने या क्वारण्टाईन कवचाचा अनेकदा उपयोग केला आहे. कधी समोरच्याला क्वारण्टाईन करून तर कधी क्वारण्टाईन होऊन. परंतु फडणवीसांनी पवारांच्या क्वारण्टाईन थिअरीच्या चिंधड्या उडवल्या. देशमुखांच्या १५ फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेचा ट्वीट रीट्वीट करून फडणवीसांनी पवारांचा खोटेपणा उघड केला. दिल्लीच्या पत्रकारांनी यावर विचारलेल्या प्रश्नांना टोलवण्याचा पवारांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना ते जमले नाही. दिल्लीकर पत्रकार प्रश्नावर ठाम राहील्यामुळे पवार उखडले. Enough Is enough या शब्दात त्रागा व्यक्त करत पवारांनी हा विषय थांबवला. पवारांचे असे उखडणे अलिकडे वरचे वर सुरू असते. अडचणीत आणणारे प्रश्न विचारले की ते पत्रकारांना झापत असतात. खरे तर आता त्यांनी याची सवय लावून घ्यायला हवी.

देशमुख क्वारण्टाईन असल्याचा पवारांचा दावा खोटा ठरवणारे पुरावे फडणवीसांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा सादर केले.

शरद पवार खोटं बोलतात हे महाराष्ट्राला नवे नाही. परंतु खोटं बोलून विषय टोलवायचा आणि सुटका करून घ्यायची हे कसब त्यांना चांगलेच साधलेले आहे. आजवर ते असे कात्री सापडले नव्हते. पवारांची राजकीय कारकीर्द आहे तेवढे फडणवीसांचे वय आहे, परंतु फडणवीस विरोधात असून त्यांना भारी पडत असल्याचे चित्र आहे. पवारांची चरफड आणि त्रागा त्यामुळेच आहे.

हे ही वाचा:

दूध का दूध, पानी का पानी होईलच – गिरीश बापट

आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त नद्यांची स्वच्छता; कारूळकर प्रतिष्ठानचा उल्लेखनीय उपक्रम

संपुर्ण व्याजमाफी देणे अशक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

हे सगळे महाभारत सुरू असताना राज्याच्या पोलिस दलात बदल्यांचा धंदा किती तेजीत आहे याचा पर्दाफाश करणारी पत्रकार परीषद फडणवीस यांनी घेतली. आपल्या भात्यात बरेच बाण शिल्लक असल्याचे फडणवीस दाखवून दिले आहे, ते माहीतीच्या ढीगाऱ्यावर बसले आहेत. राज्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला कंटाळलेले अधिकारी फडणवीसांना रसद पुरवत आहेत. बदल्यांच्या भानगडीचा आपल्याकडे ६.३ जीबी इतका डेटा असल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्याकडे याच्या पलिकडेही बरेच काही असणार याबाबत सत्ताधाऱ्यांनाही शंका नाही.

पवार आपल्या अनुभव आणि कूटनीतीचा वापर करून फडणवीसांना रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण ते त्यांना झेपत नसल्याचे चित्र तूर्तास तरी आहे.

इतकी बेअब्रू झाल्यानंतर तरी देशमुख जाणार की राहणार हा सवाल अनिर्णित आहे. कारण देखमुखांच्या जाण्याने सरकारला लागलेली घरघर थांबणार नाही हे पवार पुरते ओळखून आहेत, एकाची विकेट गेली की दुसऱ्याचे प्रकरण उभे राहणार हे ओळखण्या इतके पवार बेरकी आहेत. त्यामुळे ते जमेल तेवढे हे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. परमबीर यांनी केलेला दरमहा १०० कोटींच्या वसुलीचा आरोप सरकारच्या गळ्याचा फास बनण्याची चिन्हे आहेत. यातूनही हे सरकार वाचले तर ते आश्चर्य ठरणार आहे.

सरकार टिकण्याची शक्यता कमीच पण त्यातूनही हे सरकार टिकले तरी सत्तेत सामील असलेल्या तिन्ही पक्षांचे पोतेरे होणार हे नक्की. इतके बदनाम सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झाले नाही. राजकारणातून निवृत्त होण्याच्या वयात पवार अशा सरकारसाठी किल्ला लढवतायत. परंतु त्यांच्या भोवती असलेले वलय आता संपुष्टात येत चालले आहे. पवार बोलतील ते ब्रह्मवाक्य, अशी कितीही मुक्ताफळे संजय राऊत यांच्यासारख्या पवारभक्तांनी उधळली तरी पवारांना पूर्वीची ती चमक लाभणे कठीण. भर सभेत पावसात भिजलेल्या पवारांच्या पक्षाला जनतेने ५६ जागा दिल्या. त्यांनी शिवसेनेला गळाला लावून महाराष्ट्रात सत्ताही स्थापन केली. परंतु अवघ्या १६ महिन्यात ठाकरे सरकारची रया गेल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री गायब आहेत, फडणवीसांवर पलटवार करण्याच्या प्रयत्नात पवारांचे पितळ अगदीच उघडे पडले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा