26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरसंपादकीयअहो, आश्चर्यम्... विळा-भोपळा एकत्र आला; एका सुरात बोलले जरांगे-मुंडे

अहो, आश्चर्यम्… विळा-भोपळा एकत्र आला; एका सुरात बोलले जरांगे-मुंडे

कुणाचा तरी मुलगा किंवा कुणाची तरी मुलगी म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांना किंमत आहे

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे…’ या विधानाचा भल्याभल्यांनी धसका घेतलाय. राजकीय नेत्यांसोबत मनोज जरांगे यांच्यासारख्या राजकीय मोहऱ्यांनी सुद्धा या घोषणेच्या विरोधात आघाडी उघडलेली दिसते. ही मंडळी या विधानाचा जमेल तसा विरोध करीत आहेत. आश्चर्य म्हणजे ज्या जरांगे यांच्या विखारी प्रचारामुळे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची लोकसभा निवडणुकीत विकेट पडली, त्या सुद्धा म्हणतायत महाराष्ट्राच्या राजकारणात अशा घोषणेची आवश्यकता नाही. मजबूत राजकीय वारसा असूनसुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांची राजकीय फरफट का झाली, याचे उत्तर त्यांच्या या विधानात आहेत.

हिंदू जेव्हा जातीजातीत विभाजित होतो, तेव्हा भाजपाचा राजकीय पराभव होतो. हे राजकीय सत्य आहे. एकगठ्ठा मुस्लीम मतांना विभाजित झालेल्या हिंदूंच्या काही जातींचा तडका दिला की, काँग्रेसच्या विजयाचे रसायन तयार होते. लोकसभा निवडणुकीत तेच झाले. पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना हिंदू मतांमध्ये झालेल्या विभाजनाचा फटका बसला.

मनोज जरांगे यांच्या विखारी जातवादी प्रचारामुळे पंकजा यांचा बीडमध्ये पराभव झाला. महाराष्ट्रात हे जे जातवादी वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे ‘बटेंगे तो कटेंगे…’ हिंदू समाजासाठी इशाराही होता आणि उताराही होता. हा उतारा लागू पडला तर आपले दुकान बंद होणार हे जरांगेंना कळले. म्हणून ते बटेंगे तो कटेंगेच्या विरोधात बोलले. जरांगे बेरकी आहेत, त्यांना आपले राजकीय हित किंवा अहित कळते. पंकजांना मात्र ते कळत नसल्यामुळे त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे…’च्या विरोधात भूमिका घेतली. आपली कुऱ्हाडीवर पाय मारण्याची सवय पुन्हा सिद्ध केली. “ ‘जे लोक हिंदू खतरे में…’ चा नारा देतायत तेच लोक मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत.” ‘बटेंगे तो कटेंगे…’ चा शॉक बसलेल्या जरांगेचे हे विधान त्यांच्या ब्रिगेडी मानसिकतेला अनुसरून आहे. जरांगे ज्यांची सुपारी वाजवतायत त्या पवारांनी मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले, देवेंद्र फडणवीसांनी ते मिळवून दिले हे महाराष्ट्रातले राजकीय सत्य आहे. परंतु तुतारीच्या पथ्यावर पडेल तेच बोलायचे अशी शपथ घेतल्यामुळे जरांगेंना फडणवीसांच्या विरोधात बोलणे भाग आहे. तुतारीच्या सोयीसाठीच मराठा आरक्षणासाठी राबलेल्या

 

अनेकांना जरांगेनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले. आपली पवार निष्ठा सिद्ध केली. पवारांनी आणि काँग्रेसने जरांगेच्या मागण्या दोरीवर वाळत टाकल्या, परंतु ऑल इंडिया उलेमा कौन्सिल आणि मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. याचा अर्थ मराठा समाजाच्या लक्षात आलेला आहे. तरीही जरांगे पवारांना लक्ष्य न करता फडणवीसांना शिव्या घालतात त्याचे कारणही मराठ्यांना लक्षात आले आहे.

जरांगेंचे ठीक आहे ते पवारांच्या मीठाला जागतायत. मुस्लीम मौलवींच्या मागण्या, मविआच्या नेत्यांनी या मागण्यांवर डोलावलेली मान, या पार्श्वभूमीवर ‘बटेंगे तो कटेंगे…’, हिंदूंनी मनावर घेतले जातीचा विखार फार टिकवता येणार नाही, मराठा विरुद्ध ओबीसी फार पुढे रेटता येणार नाही. मराठ्यांना मुस्लीम मौलवींसमोर वाकवता येणार नाही, हे जरांगेंच्या लक्षात आले म्हणून त्यांना ‘बटेंगें तो कटेंगे…’ला विरोध केला. परंतु पंकजांचे काय? ‘बटेंगे तो कटेंगे…’ ही पक्षाने स्वीकारलेली वैचारिक भूमिका आहे. योगी आदित्यनाथ जे म्हणाले, तेच वेगळ्या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत, ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’. तरीही पंकजा त्यांची वेगळी तान छेडतायत.

हे ही वाचा:

“कोमट” पाण्यातील गॅरंटीच्या “चकल्या”

काँग्रेस, कन्हैय्या कुमार सारख्या नेत्यांची महिलांबाबतची मानसिकता समोर येते!

व्हीपीएम दहिसर शाळेच्या द्रिशीका बंगेराची महाराष्ट्र संघात निवड!

महाराष्ट्राची सेवा करण्याची पुन्हा संधी द्या!

 

‘योगी आणि मी एकाच पक्षाच्या असलो तरी ही माझी भूमिका नाही. आपण विकासाच्या मुद्द्यावर काम केले पाहीजे, महाराष्ट्रात अशा घोषणांना स्थान नाही.’ ही पंकजा मुंडे यांची ‘बटेंगे तो कटेंगे…’ या घोषणेवरील प्रतिक्रिया आहे. ज्यांना महाराष्ट्राचे राजकारण माहीत नाही, त्यांना पंकजा यांचे हे विधान ऐकून असे वाटेल की पंकजा या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा मोठ्या नेत्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या भूमिकेला किंमत आहे. वस्तूस्थिती अशी आहे की गेल्या काही वर्षात त्यांना स्वत:च्या ताकदीवर एकही निवडणूक जिंकता आलेली नाही. २०१९ मध्ये त्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. २०२४ मध्ये त्या बीड लोकसभा मतदार संघात पराभूत झाल्या आहेत, विधानसभा निवडणुकीत जिंकण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घ्यावे लागले. पंकजा यांची राजकीय ताकद खूप मोठी आहे, असे फक्त त्यांनाच वाटते. पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेऊन आगाऊपणा करणाऱ्या पंकजांना ही वस्तुस्थिती कुणी तरी सांगण्याची गरज आहे.

 

वडील खूप मोठे नेते होते म्हणून मुलगा किंवा मुलगी त्यांच्या एवढीच सक्षम असेल असा नियम नाही. महाराष्ट्राचे राजकारण पाहिले तर हा नियम उलटा पडलेला दिसतोय. कुणाचा तरी मुलगा किंवा कुणाची तरी मुलगी म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांना किंमत आहे. परंतु हा एवढा मुद्दा वजा केला की, हे नेते म्हणजे फार मोठे शून्य आहेत. कदाचित नगरसेवकही बनू शकणार नाही ही एवढी त्यांची क्षमता मामुली आहे. त्यांना नशीबाच्या जोरावर जे काही मिळते ते भोगावे आणि जमेल तेवढे राजकारण रेटावे. भूमिका वगैरे मांडण्याचा प्रयत्न करू नये. तेवढी त्यांची पोच आहे, असा महाराष्ट्रात कुणाचाही गैरसमज नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा