फडणवीसांनी सेट केला मानखुर्द पॅटर्न : ‘नवाबी’ फूटपट्टी इतरांनाही लागणार का?

हिंदुत्वाच्या विचारसरणीशी संबंध नाही, अशा माफिया प्रवृत्तीच्या धंदेवाईक लोकांना आपटायला हरकत नाही.

फडणवीसांनी सेट केला मानखुर्द पॅटर्न : ‘नवाबी’ फूटपट्टी इतरांनाही लागणार का?

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बदनाम नवाब मलिक यांना उमेदवारी दिली. नवाब मलिक याच्या विरोधात महायुतीचा दुसरा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने उमेदवार मैदानात उतरवलेला आहे. ही मैत्रीपूर्ण लढत नाही. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी नवाबच्या विरोधात प्रचार करण्याचे स्पष्ट केलेले आहे. युती आघाडीच्या निमित्ताने अनेकदा दुसऱ्याची घाण आपल्या पदरात येण्याची शक्यता असते. ही घाण आम्हाला नको, असा स्पष्ट पवित्रा फडणवीस यांनी घेतलेला आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि मतदार ही फूटपट्टी नवाबसारख्या प्रत्येक उमेदवाराला लावण्यात येईल अशी दाट शक्यता आहे.

 

वोट जिहादच्या विरोधात आवाज उठवला नाही तर त्याचा जबरदस्त फटका विधानसभा निवडणुकीतही बसेल याची जाणीव झाल्यामुळे महायुतीतील दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांच्या नेत्यांना झालेली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस वोट जिहादच्या विरुद्ध उघडपणे बोलतायत. हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना यामुळे चांगलेच बळ मिळाले आहे. महायुतीसाठी वातावरण एकूणच सकारात्मक असताना दुधात माशी पडावी त्याप्रमाणे नवाब मलिक यांची एण्ट्री झाली. ते स्वत: आणि त्यांची कन्या सना, मानखुर्द आणि अणुशक्ती नगर येथून निवडणूक लढवतायत.

मविआच्या काळात सकाळ संध्याकाळी दोन भोंग वाजायचे, त्यातला संध्याकाळचा भोंगा म्हणजे नवाब. संजय राऊत आणि मलिक यांचा बोलण्याचा पॅटर्न साधारण मिळताजुळता होता. बिनबुडाचे आरोप करायचे, ते आरोप पोकळ आहेत, हे स्पष्ट झाल्यानंतर दुसरा आरोप करायचा. तिसरा करायचा, असे आरोप करत राहायचे. नवाब मलिक याचे माफीया दाऊद इब्राहीमच्या बहीणीसोबत झालेले आर्थिक व्यवहार देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आणि मविआच्या काळातच त्यांची रवानगी तुरुंगात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेमुळे तुरुंगात गेल्यानंतरही ते मंत्रीपदावर कायम राहिले. त्यांना हात लावण्याची हिंमत ठाकरेंना झाली नाही.

 

महायुतीत अजित पवार यांची एण्ट्री झाल्यानंतर मलिक कुठे जाणार असा सवाल उपस्थित केला जात होता. मी राष्ट्रवादी सोबतच राहणार असे जाहीर केल्यानंतर ते अजित पवारांसोबत राहणार ही बाब स्पष्ट झाली. कारण त्यांचा पक्ष हा अधिकृत राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिले होते. महायुतीत मलिक यांच्यामुळे बेबनाव होणार ही बाब उघड होती. आता तर अजित पवारांनी त्यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे भाजपा-शिवसेनेची साफ गोची झाली. दाऊदशी संबंध असल्याचा आरोप ज्याच्यावर करण्यात आला तो महायुतीचा उमेदवार झाला तर त्याचा फटका महायुतीला बसणार हे उघड होते. एका बाजूला वोट जिहाद, बटेंगे तो कटेंगे, असे मुद्दे उचलून धरायचे आणि दुसऱ्या बाजूला नवाब मलिक सारख्या माणसाला महायुतीची उमेदवारी द्यायची हे हिंदुत्ववादी मतदार सहन करण्याची शक्यताच नव्हती.

 

याची जाणीव झाल्यामुळे मलिक याच्या विरोधात शिवसेनेने सुरेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मलिक याच्याविरोधात प्रचार करणार असे देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी डंके की चोट पे, जाहीर केले. एकनाथ शिंदे यांनी मलिक याच्याविरोधात उमेदवारच दिलेला आहे. त्यामुळे त्यांना सुरेश पाटील यांच्यासाठी प्रचार करणे भाग आहे.लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सांगली पॅटर्न गाजला. तसा विधानसभा निवडणुकीत मानखुर्द पॅटर्न गाजणार अशी शक्यता आहे. ही पॅटर्न फक्त मलिक आणि त्यांच्या कन्येपुरता मर्यादित राहणार की हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांनाही त्याची झळ बसणार हा सवाल आहे.

हे ही वाचा:

सैन्य मागे घेतल्यानंतर दिवाळीनिमित्त भारत- चीन सैनिकांमध्ये मिठाईची देवाणघेवाण

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत रवी राजांनी हाती घेतले ‘कमळ’

वन नेशन, वन इलेक्शन लवकरच लागू होणार

दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदींनी निरोगी, आनंदी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

 

मानखुर्द पॅटर्नने बाळसे धरले तर फक्त जिहादी मानसिकतेच्या उमेदवारांनाच नाही तर पक्षापक्षातून फिरून आलेले आणि पक्षाला चराऊ कुरण बनवणाऱ्या दलालांनाही मतदार दणका देतील अशी शक्यता आहे. अंधेरी पूर्वचे शिवसेनेचा उमेदवार मुरजी पटेल यांचे उदाहरण देता येईल. एसआरए भ्रष्टाचारात नखशिखांत लिप्त असलेला हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हा उमेदवार शिवसेनेने भाजपाकडून आयात केलेला आहे. याला भाजपाकडून उमेदवारी मिळेल अशी आशा होती.

संघटनेतील अनेक लोकांचा विरोध होता. हा मतदार संघ जागावाटपात शिवसेनेकडे गेल्यामुळे मुरजी पटेल याला शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीत मविआचे सरकार येऊ नये ही तमाम राष्ट्रवादी मानसिकतेच्या लोकांची अपेक्षा आहे. कारण हे सरकार आले तर महाराष्ट्राचा प.बंगाल व्हायला फार वेळ लागणार नाही. परंतु महायुतीत असले तरी हिंदुत्वाशी काडीचा संबंध नसलेले, भ्रष्टाचारात बरबटलेले आणि पक्षाच्या विचारसरणीशी काडीचाही संबंध नसलेले उमेदवार आहे. त्यांना सहन करण्याची ना कार्यकर्त्यांची मानसिकता आहे, ना हिंदुत्ववादी मतदाराची. जे लोक महायुतीत राहून मविआचा एजेंडा राबवणार अशा लोकांचा कडेलोट व्हावा, दणकून पराभव व्हावा, हीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु शिवलिंगावर बसलेल्या या विचंवांचे करायचे काय असा प्रश्नही होता. नवाब मलिक यांच्याबद्दल धोरण स्पष्ट करून फडणवीसांनी त्यांना बळ दिलेले आहे. महायुतीत आहे, परंतु हिंदुत्वाच्या विचारसरणीशी संबंध नाही, अशा माफिया प्रवृत्तीच्या धंदेवाईक लोकांना आपटायला हरकत नाही, असा अर्थ जर कार्यकर्त्यांनी काढला तर या निवडणुकीनंतर अस्सल हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे चेहरेच विधानसभेत दिसतील.  दलाली करणाऱ्यांना वाव मिळणार नाही. भाजपाच्या मजबूतीसाठी हे आवश्यकही आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version