वडा-पाव, पुरणपोळी खा आणि घरी जा हाच I.N.D.I.A बैठकीचा अजेंडा

आघाडीच्या बैठकीतून विरोधक जातील तेव्हा ते तृप्त होऊन जातील असा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न

वडा-पाव, पुरणपोळी खा आणि घरी जा हाच I.N.D.I.A बैठकीचा अजेंडा

मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये उद्यापासून दोन दिवस I.N.D.I.A आघाडीची बैठक सुरू होते आहे. केंद्रात सलग दोन टर्म सत्तेवर असलेल्या भाजपाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी देशभरातील भाजपाविरोधक एकत्र येत आहेत. परंतु या बैठकीत विरोधकांच्या अजेंड्या पेक्षा स्नेहभोजनाच्या मेन्यूची चर्चा जास्त आहे. मोदींना हटवायचे यावर जरी एकमत असले तरी कसे हटवायचे याबाबत काहीच ठरत नाही. वंचित आघाडी आणि स्वाभामानी शेतकरी संघटनेने या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.

विरोधाकांच्या बैठकीत देशभरातील २६ पक्ष सामील होणार आहेत. शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीचे यजमानपण भूषवित आहेत. उद्या त्यांच्यातर्फे बैठकीला येणाऱ्या नेत्यांना स्नेहभोजन देण्यात येणार आहे. या स्नेहभोजनाचा मेन्यू प्रचंड गाजतोय. ठाकरेंनी उपस्थितांसाठी अस्सल मराठमोळा मेन्यू ठेवलेला आहे. पाटण्यात झालेल्या बैठकीच्या आधी लालू प्रसादांनी ठाकरेंचे बिहार कनेक्शन नीतिशकुमारांना कानात सांगितले. ठाकरेंचे पूर्वज इथलेच आहेत हे समजल्यावर नीतिश कुमारांना इतका आनंद झाला की त्यांनी ठाकरेंना आग्रहाने चंपारण मटण खाऊ घातले म्हणून उद्धव ठाकरे त्यांना कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा वाढून हिशोब चुकता करणार आहेत. सोबत कोळंबीचे मालवणी तिखले सुद्धा.

 

ममता दिदींना रोहू-कटला प्रचंड आवडतो, पंरतु त्याचा समावेश मेन्यूमध्ये अजिबात नको असा विशेष आदेश १० जनपथवरून आला असल्याचे समजते. त्यामुळे गोड्या पाण्यातील माशांवर चौकट मारण्यात आली. शाकाहारी मंडळींसाठी डाळींबीची उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ, झुणका-बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेचा, मसाले भात असे चविष्ट मराठी पदार्थ आहेत.   कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बैठकीत सहभागी होणार आहेत. उगाच बेळगाव, कारवार, निपाणीचा प्रश्न उपस्थित करून त्यांचे तोंड कडू करण्यापेक्षा मोदक, करंजी, पूरणपोळी, नारळ वडी, असे मराठमोळे गोडधोड घालून उद्धव ठाकरे त्यांचे तोंड गोड करणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद कर्नाटकात भाजपाचे सरकार असतानाच उपस्थित करायचा असतो, हा नियम असल्यामुळे असेल बहुधा पण हा मुद्दा चर्चेला येणार नाही.

 

उद्धव ठाकरे जेव्हा बंगळुरुच्या बैठकीत गेले होते तेव्हा सिद्धरामय्या यांनी कानडी टोपी घालून उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले होते. त्यांना शुद्ध तुपातला मैसूर पाक, धारवाडचे पेढे आणि बुंदीचे लाडू खायला घातले. त्याची परतफेड करण्याची संधी उद्धव ठाकरे सोडतील कशी?

 

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी बैठकीला येणार आहेत, त्यांच्यासाठी मराठमोळा पास्ता आणि पिझ्झा रांधण्याचे आदेश ठाकरेंनी दिले आहे. अनेकांना माहीत नसेल उद्धव ठाकरेंची काँग्रेसशी सोयरीक जुनी असली तरी त्यांची पिझ्झाची आवड जुनी आहे. बराच काळापूर्वी दिल्लीत शरद पवार, संजय राऊत यांच्यासोबत उद्धव ठाकरे एकत्र होते. ६ जनपथवर दुपारच्या जेवणासाठी मटण-भाकरीचा बेत होता. राऊत आणि पवार यांनी मटण आणि भाकरीवर ताव मारला, उद्धव ठाकरे यांनी तेव्हा पिझ्झा मागवला होता.

 

एकूणच काय तर आघाडीच्या बैठकीतून विरोधक जातील तेव्हा ते तृप्त होऊन जातील असा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. बाकी विरोधकांनी समन्वयक नियुक्त करणे टाळले आहे. आघाडीला अध्यक्ष केला तर तो नेता होईल भविष्यात पंतप्रधान पदाचा दावेदार होईल, म्हणून अध्यक्ष न म्हणता समन्वयक म्हणावे असा तोडगा निघाला. परंतु समन्वयक होण्यासही बरेच इच्छुक असल्याचे लक्षात आल्यामुळे हा नादही सोडून देण्यात आला. त्यामुळे आघाडीची बैठक समन्वयकाशिवाय होणार आहे. तूर्तास सगळेच अध्यक्ष आहेत. असे घोषित करण्यात आले नसले तरी प्रत्येकाची भावना तशी आहे.

 

हे ही वाचा:

ही गर्दी बुद्धिबळासाठी सुचिन्ह!

गोविंदांच्या विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर

सोनिया, राहुल गांधीना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नेणार का?

सुनील राऊतांना पक्षात घ्यायला कोणी १०० रुपये पण देणार नाही

या बैठकीपूर्वी शिउबाठाचे प्रवक्ते आणि आघाडीचेही स्वयं घोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी बैठकीत कोणकोण सहभागी होणार याची जंत्री दिली होती. त्यात महाराष्ट्रातून वंचित आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेही नाव होते. परंतु बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार नाही, असे राऊतांनी स्पष्ट केल्यामुळे त्यांना बैठकीतला रस कमी झाला असावा. फक्त जेवणावळीसाठी बैठकीला जाण्यात अर्थ नाही असे प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना वाटले असावे. आघाडीच्या तीन बैठका झाल्या. पहिली पाटण्याला, नंतर बंगळुरू आणि आता मुंबई. परंतु जागावाटपाचा मुद्दा चर्चेस येतच नाही. कारण एकदा हा मुद्दा चर्चेला आला की हाणामारी सुरू झालीच समजा.

दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात आघाडीतील काँग्रेसेतर पक्षांची राज्य आहेत. इथल्या जागावाटपात काँग्रेसला स्थान देण्याची अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि नीतिश कुमार यांची इच्छा नाही. काँग्रेस शासित राज्यात काँग्रेसची मानसिकता हीच आहे. २०१९ पासून देशात मोदीविरोधी आघाडी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीआधी जुळवाजुळव सुरू होते. काही तरी खुसपट निघते आणि सर्व काही पाण्यात जाते. जायेगा तो मोदी… अशी नवी घोषणा राऊतांनी दिलेली आहे. ही घोषणा प्रत्यक्षात यावी म्हणून उद्धव ठाकरे यांनी जेवणावळीसाठी कंबर कसलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version