राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा अखेर मागे घेतला. ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी अचानक राजीनाम्याची घोषणा करून धुरळा उडवून दिला होता. परंतु, धरसोडीच्या परंपरेला जागत, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत, ते पुन्हा पदावर विराजमान झाले. ही एक व्यवस्थित लिहीलेली पटकथा होती, असे मानायला बऱ्यापैकी वाव आहे. दोन नेत्यांनी केलेल्या भाकीतामुळे यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. पवारांच्या या पटकथेने तीन जणांच्या विकेट काढल्या आहेत.
पक्षाच्या बैठकीत राजीनामा न देता एका आत्मकथा प्रकाशन सोहळ्याच्या जाहीर कार्यक्रमात हा राजीनामा का दिला? मीडियाचे अनेक कॅमेरे समोर असताना ही घोषणा का केली? दोन दिवसांनी त्यांना आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहीजे ही उपरती का झाली? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. परंतु त्यावर चर्चा करण्यापूर्वी दोन नेत्यांनी केलेली भाकीतं तपासून पाहायला हवी.
भाजपा नेते नितेश राणे यांनी पत्रकार परीषदेत हे स्पष्ट केले होते की, १ मे रोजी बीकेसीत झालेली वज्रमुठ सभा अखेरची असेल. दुसरे भाकीत केले होते पवारांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी. येत्या १५ दिवसांत देशात दोन राजकीय भूकंप होतील, त्यातला एक महाराष्ट्रात आणि दुसरा दिल्लीत असेल. दिल्लीतील भूकंप काय असेल याचा लोकांना साधारणपणे अंदाज होता. शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या प्रकरणाचा निकाल या काळात अपेक्षित आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो.
दिल्लीचे गणित सोपे होते, परंतु महाराष्ट्रात नेमके काय होणार याबाबत उत्सुकता होती. तो भूकंप म्हणजे पवारांचा राजीनामाच होता, हे स्पष्ट झाले आहे. अर्थात पवार राजीनामा देणार हे त्यांच्या कुटुंबियांना आणि जवळच्या नेत्यांना ठाऊक होते. ही ठरवून खेळलेली खेळी होती. ज्या अर्थी राजीनामा ठरवून दिलेला होता, त्या अर्थी राजीनामा मागे घ्यायचे हेही आधीच ठरले होते. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्या दिवशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या गंभीर भावाचा प्रतिभा शरद पवार यांच्या चेहऱ्यावर अजिबातच मागमूस नव्हता.
पवारांनी राजीनामा दिल्यावर मविआच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशा परिस्थितीत वज्रमुठ सभा होण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे वज्रमुठ सभा होणार नाहीत, असा मेसेज उडत उडत नितेश राणे यांच्याकडे पोहोवण्यात आला.
सगळं कसं ठरलेले होते.
पवारांचे टार्गेटही ठरलेले होते. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेचे टायमिंग पाहा. हा दुसरा भाग खरे तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणणे उचित होते, आत्मकथेच्या क्लायमॅक्समध्ये रंगत आली असती. परंतु, निवडणुकीला वर्ष शिल्लक असताना याचे प्रकाशन करण्यात आले. देशातील एक अत्यंत महत्वाची निवडणूक डोळ्यासमोर असताना पवारांसारख्या नेत्याने राजीनामा देणे म्हणजे बोर्डाची परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्याने शाळा सोडण्यासारखे होते.
एकीकडे मविआत सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांचे नेते एकीची वज्रमुठ मजबूत आहे, असा दावा प्रत्येक वज्रमुठ सभेत करत असतात. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनुभव नसल्याची, सतत घरी बसल्याची, त्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावणारी टीका केल्यानंतर मविआमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होईल, हे न समजण्या इतके पवार कच्च्या गुरूचे चेले नाहीत. परंतु, तरीही पवारांनी उद्धव यांच्या कपाळी अकार्यक्षम मुख्यमंत्री, कमकुवत नेता असल्याचा शिक्का मारला. जनमानसात त्यांची मुळातच गाळात गेली प्रतिमा अधिकच काळवंडून टाकली.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंनी बारसूची जबाबदारी ढकलली फुटीर आमदारांवर
टिल्लू ताजपुरियाची तिहारमधील हत्या पोलिस बघत राहिले!
यूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल !
सावध राहा! बंगालच्या उपसागरात ”चक्रीवादळ मोचा” !
अजित पवारांनाही तुर्तास थंड केले आहे. राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या शिलेदारांची गाळण उडणार, ते पायावर लोटांगण घालणार हे पवारांना माहीत होते. कारण पवार आणि पक्ष वेगळे नाहीत. त्यांचा अंदाज खरा ठरला. पवार राजीनाम्याबाबत मागे फिरणार नाहीत, हे ठणकावून सांगणारे अजित पवार पुन्हा एकदा तोंडावर पडले. पवारांनी राजीनामा दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जो तमाशा झाला तो आठवून पाहा. पवार बोलू इच्छिणाऱ्या प्रत्येक नेत्याला माईक द्यायला सांगत होते. जणू प्रत्येकाकडून वदवून घेत होते. सगळ्यांनी पवारांसमोर शरणागती पत्करून त्यांना परत बोलावून घेतले.
आता इतकी गळ घालून जर त्यांना पक्षाच्या अध्यक्ष पदावर कायम राहण्यासाठी जर पटवण्यात आले आहेत तर, त्यांचे सगळे ऐकावेही लागेल, हे ओघाने आलेच. त्यामुळे पवार आता पुढचे फासे अशा प्रकारे टाकतील की, अजित दादांची पार कोंडी होईल आणि सुप्रिया सुळे यांचा मार्ग मोकळा होईल.
गेले तीन दिवस पवारांना विनवण्यासाठी पक्षातील तमाम नेते, यूपीएतील अनेक नेते त्यांना फोन करीत आहेत. गेले तीन दिवस देशातील तमाम मीडियाचा प्रकाशझोत स्वत:कडे वळवून घेण्यात पवारांना यश आले आहे. २०२४ पर्यंत मोदीविरोधी राजकारणाचा केंद्र बिंदू राहण्यासाठी या तीन दिवसांची ऊर्जा पवारांना पुरेल असे दिसते आहे. मोदींना आव्हान देऊ शकणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कढी सध्या पातळ झालेली आहे. केजरीवाल लिकर घोटाळ्याने घायकुतीला आलेले आहेत, तर ममता या भाच्याचे प्रताप निस्तरताना मेटाकूटीला आल्या आहेत. त्यातल्या त्यात राहुल गांधी साडे तीन-चार हजार किमीची पदयात्रा काढून चर्चेत आले होते. पवारांनी त्यांच्या कष्टावर पाणी ओतले आहे. राजीनाम्यानंतरचा घटनाक्रम अशा प्रकारे कव्हर केला आहे, की आता एवढे सगळे करून पवारांनी पक्षावरील मांड पक्की केली हे निश्चित, परंतु यातून पक्षाचे काही भले होईल असे चित्र दिसत नाही. अजित पवार हे पूर्वीही संधीची वाट पाहात होते. पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर त्यांच्या अस्वस्थतेच भर पडण्याची शक्यता आहे. आता ते अधिक सावधपणे फिल्डींग लावतील. पवारांनी भाकरी फिरवलेली नाही, याचा अर्थ भाकरी करपणार हे नक्की.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)