जालन्यात उपोषण करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची अखेर महायुती सरकारला आठवण झाली. त्यांना भेटायला गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे शिष्टमंडळ गेले होते. ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देणार नाही, असे लेखी लिहून देईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असे हाकेंनी या शिष्टमंडळाला सांगितले. याच दरम्यान अंतरावली येथून हाके यांच्या भेटीसाठी आज मोठ्या संख्येने दलित आणि ओबीसी समाजातील लोक आले होते. या सगळ्या घडामोडींमुळे मनोज जरांगे प्रचंड अस्वस्थ आहेत.
ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येऊ नये, म्हणून लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरु केल्यापासून जरांगेंची विखारी विधाने पुन्हा सुरू झाली आहेत. हे सरकार पुरस्कृत उपोषण आहे, या शब्दात त्यांनी हाकेंची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे उपोषण कोणी पुरस्कृत केले होते ही बाब मात्र ना पत्रकारांनी त्यांना विचारली, ना जरांगेंनी सांगितली. शरद पवार सुद्धा हाके यांच्या उपोषणामुळे अस्वस्थ झालेले दिसतायत. हाके यांची भेट घ्यायला जाणार का, असे विचारले असता, त्यांनी चक्क नकार दिला. हे तेच शरद पवार आहेत, जे जरांगेंना भेटायला जाणारे राज्यातील पहिले बडे नेते होते. ते आल्यानंतर जरांगेंच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.
ओबीसी कोट्यातूनच आरक्षण घेणार, असा हेका धरल्यामुळे बहुधा हाकेंचा नाईलाज झाला. त्यांनी उपोषणाच्या मैदानात उतरायचे ठरवले. उशीरा का होईना मीडियाचे त्यांच्याकडे लक्ष जाते आहे. याचे थोडेफार श्रेय जरांगेनाही जाते. त्यांनी हाके यांच्यावर टीका करायला सुरूवात केली, प्रत्यक्षात त्याचा परिणाम उलटा झाला. हाकेंना सहानुभूती आणि प्रसिद्धी मिळाली. एका बाजूला हाके मराठा समाजाच्या विरोधात अवाक्षर बोलताना दिसत नाहीत. मराठ्यांना आरक्षण मिळावे, परंतु, ते ओबीसी कोट्यातून नको अशी त्यांची भूमिका आहे.
जरांगे मात्र उघड उघड सरकारला पेचात पकडण्याचा प्रयत्न करायत. ओबीसी कोट्यातूनच आरक्षण घेणार अशी त्यांची भूमिका आहे. न्यायालयात कोणत्याही प्रकारे टीकू शकत नाही. सगेसोयरे मुद्द्यासाठीही ते आग्रही आहेत. आरक्षणाबाबत मनमानी निर्णय घेतले तर त्याचे पुढे काय होते हे बिहारच्या उदाहरणावरून पुरेसे स्पष्ट झालेल आहे. नीतीश सरकारने महाआघाडी सरकारच्या काळात आरक्षणाचा कोटा ६५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. आर्थिक दुर्बळांसाठी १० टक्के आरक्षण असल्यामुळे कोटा ७५ टक्के झाला. पाटणा उच्च न्यायालयाने हा निर्णय समानतेच्या तत्वाविरुद्ध असल्याचे कारण देत केराच्या टोपलीत भिरकावला आहे. जरांगेना हे कळत असले तरी वळणार नाही. कारण महायुतीला पेचात पकडणे एवढाच त्यांचा मर्यादित उद्देश आहे. एवढीच कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. राज्यात उद्या खांदेपालट झाला तर सुप्रिया सुळे पुन्हा एकदा सांगतील की आरक्षणापेक्षा महत्त्वाचे प्रश्न राज्यासमोर आहेत. जरांगे त्यांना जाब विचारण्याच्या किंवा उपोषण करण्याच्या भानगडीत न पडता पवारांच्या उर्जेचे कौतुक करत बसतील.
हाके उपोषणाला बसल्यामुळे जरांगेंचा होणारा तिळपापड उघड दिसतो आहे. ज्यांना आरक्षण दिलेले आहे, तेही उपोषण करतायात, अशी विधाने ते करू लागले आहेत. गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट पणे सांगितलेले आहे की, ‘महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे, परंतु जरांगेंना समजूनच घ्यायचे नसेल तर काय करता येईल?’ हे महाजन यांनी वारंवार सांगितलेले आहे. त्याच महाजन यांना हाके यांची भेट घ्यायला पाठवणे, महायुती सरकारचा इरादा स्पष्ट करणारे आहे.
हे ही वाचा:
मुकेश अंबानींचा डीप फेक व्हिडीओ वापरून डॉक्टरची फसवणूक
भारत खेळणार बांग्लादेश, न्यूझीलंडविरोधात कसोटी मालिका
सुपर ८ ची विजयी सुरुवात; भारताचा अफगाणिस्तानवर विजय
दक्षिण मुंबईमधून दोन बांगलादेशी महिलांना अटक
‘या प्रकरणी बघ्याची भूमिका न घेता केंद्र सरकारने दोन्ही समाजांना समोरासमोर बसवून तोडगा काढवा’, असा मोलाचा सल्ला शरद पवार यांनी दिलेला आहे. हे शक्यच नाही, कारण जरांगेंच्या मागण्या न संपणाऱ्या आहेत. मराठा आरक्षण प्रकरणी त्यांनी जे काही सांगितले ते ऐकले गेले तर त्याच्या पुढच्याच दिवशी जरांगे मुस्लीमांना आरक्षण द्या, अशी मागणी करत पुन्हा गोधडीत शिरतील. अंतरावलीतील गावकऱ्यांना जरांगेंच्या गोधडी उपोषणाचा अजेंडा लक्षात आल्यामुळे त्यांनी अंतरावलीत उपोषणाला विरोध केला ही बाब फार जुनी नाही. त्यांना पाठींबा देणारे लोक आता हाकेंनाही पाठींबा देताना दिसतायत. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हाकेंच्या भेटीसाठी गेले होते. मराठा आणि ओबीसींचे ताट वेगळे हवे, असे विधान करत त्यांनी हाकेंच्या मागणीला पाठींबाच दिला. हवा बदलते आहे, अति तिथे माती होते हे जरांगेंनी वेळीच लक्षात घ्यावे.
उपोषणाचे बरेच फायदे त्यांच्यामुळे लोकांच्या लक्षात आले आहेत. उपोषणाला बसले की सरकारचे प्रतिनिधी येऊन पाय चेपायला लागतात. सगळ्या पक्षांचे नेते येऊन गाठीभेटी घेतात. ज्यांना लाभाची खात्री आहे, असे नेते येऊन पाया पडतात. आशीर्वाद घेतात. फुकटची प्रसिद्धी मिळते. कंटेनरमधून फुले उधळली जातात. फक्त गोधडीत शिरून जर इतके फायदे होत असतील तर ते फक्त जरांगेंपुरते मर्यादीत कसे राहील? जरांगेंच्या उपोषणाला आता हाकेंच्या उपोषणातून उत्तर देण्याचा प्रयत्न होतो आहे. ‘लोहे को लोहा काटता है’ असे म्हणतात. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची विनंती केंद्रीय नेत्यांना केली आहे. हे उत्तम, जरांगेंनी संपवण्याचा प्रयत्न केल्यामुळे कोणी संपत नाही, हे जरांगेंनाही कळू देत.