पिंजरा हा व्ही. शांताराम यांचा गाजलेला तमाशापट. या सिनेमाची सगळीच गाणी अप्रतिम आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री संध्या तमाशा कलावंतीणीच्या भूमिकेत असून छबीदार छबी… या एकाच गाण्यात त्यांनी अनेक साड्या बदलल्या आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आजची पत्रकार परिषद पाहून त्या गाण्याची आठवण झाली. संध्या यांनी प्रत्येक कडव्याला साड्या बदलाव्या तशा ठाकरे भूमिका बदलत आहेत. मुंबई महानगर पालिका हातून जाणार या विचाराने अस्वस्थ झालेल्या उद्धव ठाकरेंनी तुष्टीकरणाचा हिरवा चोळणा काढून भगवी कफनी चढवण्याचा चंग बांधलेला आहे.
अनुभव नसलेला डॉक्टर रुग्णाला एक औषध देता, त्याने आराम वाटला नाही तर औषध बदलून देतो. ठाकरेंची परिस्थितीही त्या डॉक्टरसारखी झालेली आहे. खंजीर खुपसून सत्ता मिळण्याची एक खेळी यशस्वी झाली, परंतु बाकी सगळा अंधार आहे. काँग्रेसच्या सेक्युलरीझमला कुर्निसात केला, आमचे हिंदुत्व, तुमचे हिंदुत्व असे करत हिंदुत्वाचा नवा वाण बाजारात आणला. नंतर सगळ्या बाबरी प्रेमी नेत्यांसोबत गळ्यात गळे घालण्याचे कार्यक्रम सुरू केले. हिरवा चोळणा घातल्याचे संकेत दिले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोती ठाकरेंच्या नाकापेक्षा जड झाला असल्याचे उघड झाले.
सर्वाधिक जागा लढवून ठाकरेंचा स्ट्राईक रेट सगळ्यात कमी राहिला. विधानसभा निवडणुकीत ठाकरेंनी पक्षावर चढवलेला हिरवा रंग अधिक ग़डद केला. मुल्ला- मौलवींच्या दाढ्या कुरवाळून मतं मागितली, वोट जिहादचे सिपहसालार बनून मतं मागितली. परंतु हिदुंत्वाचा रेटा इतका होता की मतदारांनी फक्त २० जागांवर ठाकरेंचा बाजार उठवला. त्यामुळे ठाकरे हिरवा चोळणा काढण्याच्या तयारीत आहेत. बांगलादेशी हिंदूंचा मुद्दा भाजपाला घेरण्यासाठी उत्तम आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपावर आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा हल्ला बोल केलेला आहे. ‘आम्हाला शेंडी जानव्यांचे हिंदुत्व नको’, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासारखेच सतत तळ्यात मळ्यात करणारे तथाकथित शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना मातोश्री निवासस्थानी बोलावून त्यांची पाद्यपूजा केली. मुख्यमंत्रीपदाचा आशीर्वाद दिल्यामुळे बहुधा
ठाकरेंनी त्यांच्या शेंडी आणि जानव्यावर आक्षेप घेतला नाही. ठाकरेंचे भूमिका बदलणे हे असे असते. पुढे त्या अविमुक्तेश्वरानंदानी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठीही बॅटींग केली होती. हा भाग वेगळा.
एकदा शेंडी जानवे नाकारायचे आणि भलत्याच शेंडी जानवेवाल्याचे पाय धुवायचे असा हा प्रकार. जेव्हा सगळं काही स्वार्थासाठी असते ते तेव्हा तोंडात अशी माती जातेच. ‘आम्हाला मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नको’, असे म्हणणारे ठाकरेंनी
आता रेल्वेने कुठल्या तरी मंदिराला नोटीस दिली असल्याचा मुद्दा पुढे करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला बडवायला सुरूवात केलेली आहे. ठाकरेंना जर घंटा बडवणारा हिंदू नको असेल तर मंदीर असले काय, नसले काय त्यांना काय फरक पडतो? तुमचे हिंदुत्व मशिदींना एफएसआय़ वाढवून कसा देता येईल, राज्यभरात उर्दू भवने कशी उभारता येतील याचा विचार करते. तो सुरू ठेवा.
ठाकरे हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊ पाहातायत, परंतु त्यांच्या खांद्यावर आधीच ओझे आहे. आधी त्यांनी सज्जाद नोमानी यांना खांद्यावरून उतवले पाहिजे. नोमानी आणि भगवा झेंडा एकाच वेळी ते खांद्यावर कसा घेणार? नोमानीचा आणि तुमचा एजेंडा वेगळा आहे. तुम्ही त्याच्यासारखे हिंदूविरोधी नाही, हे जनतेलाही कळयला हवे. त्यासाठी नोमानींच्या नोकरीचाही राजीनामा दिला पाहीजे आणि तसे जाहीर केले पाहीजे. कारण नोमानीने विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केले होते की उद्धव ठाकरे वोट जिहाद के सिपहासालार आहेत. हा वोट जिहाद तुमच्यासारख्या हिंदूविरोधी राजकारण्यांना सत्तेवर
बसवण्यासाठी आणि नंतर त्यांच्यामाध्यमातून मुस्लीम धार्जिणी राजवट आणण्यासाठी होता.
उद्धव ठाकरे यांनी आता साठी ओलांडलेली आहे. असेही त्यांना काम करण्याची सवय नाही. त्यामुळे दिवसपाळी आणि रात्रपाळी अशा दोन शिफ्टमध्ये त्यांना काम जमेल याची सुतराम शक्यता नाही. जमले असते तर रात्री नोमानी यांचा सिपहसालार म्हणून आणि सकाळी हिंदुत्ववादी म्हणून काम केले असते. एका हातात लाडू आणि दुसऱ्या हातात शिरखुर्मा ठेवला असता आणि हादडलाही असता. त्यामुळे भगवी कफनी आणि भगवा झेंडा हाती घेण्यापूर्वी ठाकरेंनी नोमानीच्या नादी लावून आपण हिंदुत्व खुंटीला बांधून ठेवले होते, याची जाहीर कबुली दिली पाहिजे. सावरकरद्रोही राहुल गांधी यांच्याशी चुंबाचुंबी केली, याबद्दल माफी मागितली पाहिजे. नंतर त्यांनी भगवा खांद्यावर घ्यायला हरकत नाही.
हे ही वाचा:
चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू प्रकरणी ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक
प्रार्थनास्थळांना आव्हान देणारे नवे खटले दाखल होणार नाहीत!
दिल्लीतील शाळांना धमकीसत्र सुरूचं; सहा शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
‘जॉय बांगला’ यापुढे बांगलादेशचा राष्ट्रीय नारा नाही!
राजकीय भूमिका बदलणे हे एका गाण्यात चार साड्या बदलण्या इतके सोपे थोडेच आहे. तुम्ही सेक्युलरीझमचा शेंदूर पक्षाला इतक्या कमी काळात फासलात की तुमच्या पक्षाचे नेते आता निष्ठा व्यक्त करण्यासाठी शपथ सुद्धा देवादिकांची घेत नाहीत. पीराची घेतात. रत्नागिरीतील उदाहरण ताजे आहे. ही तुमच्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची परिस्थिती. हे तुमचे हिंदुत्व. याच बेशरम राजकारणाला हिंदूंनी लाथा घातल्यावर तुम्हाला आता बांगलादेशातील हिंदूंची आठवण होते आहे. मोदींना काय करायचे ते शिकवू नका. त्यांनी डोक्याला भस्म रगडले आहे. त्यांच्यात एखाद्याचे राजकारण भस्म करण्याची क्षमताही आहे. २० जागा मिळाल्यानंतर तरी यावर तुमचा विश्वास बसायला हवा. त्यामुळे मोदींवर भलते सलते आरोप
करण्याच्या भानगडीत पडू नका. ते दुकान चालवत नाहीत, देश चालवतायत. मोदींना ना मातोश्री १, २ अशी सिरीज उभारण्यातही रस, ना लंडनमध्ये मालमत्ता बनवण्यात. मोदींनी आपण तोंड उचकटून बोलत राहीलो तर काहीही होत नाही,
असा राहुल गांधी यांचाही समज होता. हा समज मोदींनीही गेली १० वर्षे टिकू दिला. आता त्यांचा हिशोब करण्याचे काम सुरू झाले आहे. उद्या ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून वेळीच सावध व्हा.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)