पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरीका आणि ईजिप्तचा झंझावाती दौरा पूर्ण करून भारतात परतले. नेहमीप्रमाणे क्षणभर विश्रांती न घेता भारतात कामाला लागले. भोपाळमध्ये ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना मोदींनी विरोधी पक्षांना झोडपून काढले. इतरांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पापांचा पाढा वाचला. सहकारी बँक घोटाळा ते सिंचन घोटाळा सगळी लफडी बाहेर काढली. मोदींचा एकूणच सूर लक्षात घेतला तर बहुधा ते आता शरद पवारांना गुरुदक्षिणा देण्याच्या मूडमध्ये दिसतायत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या भाषणात २०२४ च्या प्रचाराचा नारळ फोडला, असे म्हणता येईल. बिहारमध्ये झालेल्या विरोधाकांच्या बैठकीवर त्यांनी टीकास्त्र सोडले. २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकीबाबत विरोधकांमध्ये जास्त अस्वस्थता असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांची धडपड पाहिल्यावर लक्षात येत जनतेने भाजपाला जिंकून देण्याचा निश्चय केला आहे.
मोदींनी या भाषणात प्रत्येक पक्षांच्या घोटाळ्याचे तपशीलवार वर्णन केले. काँग्रेस, राजद, द्रमुक आदी पक्षांचा उद्धार करताना त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार केले. त्यांचा सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला. मोदी जेव्हा पवारांवर घणाघाती टीका करतात तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटते. पंतप्रधान बनल्यानंतर सुरूवातीचा काळ आठवला तर मोदींनी २०१७ पर्यंत पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. प्रारंभीच्या काळात दोन्ही नेत्यांचे सबंध उत्तम होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात झंझावाती प्रचार करणारे मोदी बारामतीत मात्र गेले नव्हते. त्यांची बारामतीत ठरलेली प्रचारसभा ऐनवेळी रद्द करण्यात आली होती. रासपाचे महादेव जानकर इथून लढत होते. त्यांचा पक्ष महायुतीचा घटक होता. मोदींची सभा रद्द झाल्याबद्दल त्यांनी नंतर अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. २०१५ मध्ये कृषीविज्ञान केंद्राच्या उद्घाटनासाठी मोदी बारामतीत आले होते. त्यावेळी ‘शरद पवारांना प्रदीर्घ राजकीय अनुभव असून देशाला त्याची गरज आहे’, असे प्रशंसोद्गार मोदींनी काढले. पवारांच्या घरी त्यांचे स्नेहभोजनही झाले. २०१६ मध्ये वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला मोदींनी पुन्हा हजेरी लावली. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांच्यासह पवारही मंचावर होते. ‘मला हे स्वीकार करायला कोणताही संकोच होत नाही की माझ्या प्रारंभीच्या काळात पवारांनी मला हात धरून चालायला शिकवले’, असे उद्गार मोदी यांनी काढले. पवारांचा उल्लेख गुरू आणि मार्गदर्शक म्हणून इथेच केला.
नंतर अध्येमध्ये मोदी पवारांवर एखादा कृपाकटाक्ष टाकत. आपल्या भाषणांत पवारांचा उल्लेख शरदराव असा करत. परंतु जाहीर सभांमध्ये पवारांचे उट्टे काढायला मोदींनी सुरूवात केली. ऑक्टोबर २०१९ मध्ये बीकेसीमध्ये झालेल्या सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाऊद कनेक्शनवर घणाघात केला होता. भोपाळच्या भाषणात मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याच्या मुद्यावर मोदींनी बॉम्ब फोडल्यानंतर पवारांनी केविलवाणा खुलासा केला आहे. ‘मी तर बँकेचा साधा सदस्यही नाही’, असे पवार म्हणाले आहेत. पवारांचा लोकांच्या अल्प-स्वल्प स्मरण शक्तीवर प्रचंड विश्वास आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या संदर्भात शरद पवार यांच्यासह ७० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.
हे ही वाचा:
‘रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण’ चोरी करणारे पोलिसांकडून ‘जेरबंद’!
दिल्लीतील साक्षी हत्याकांड; आरोपी साहिलवर ६४० पानी आरोपपत्र!
भारतीय लष्कराची क्षमता पाहून चीनला भरली धडकी, नियुक्त केले तिबेटी सैनिक
मालाडमध्ये झाड पडून एकाचा मृत्यू, विक्रोळीत भिंत कोसळली
पवार जर सदस्य नव्हते तर ते या घोटाळ्यात सामील कसे? असा प्रश्न अनेकांना प़डू शकतो. किंबहुना तो पडावा म्हणून पवारांनी तसे वक्तव्य केले आहे. याचे उत्तर एकदम साफ आहे. बँकेचे अध्यक्ष होते अजित पवार. कोट्यवधीची कर्ज मिळावीत म्हणून अजित पवारांना शरद पवारांचे शिफारस पत्र येत असे. मग त्या व्यक्तिला लायकी असो वा नसो, कोट्यवधीचे कर्ज बिनबोभाटपणे मिळत असत. पवारांची अशी अनेक शिफारस पत्रे तपास यंत्रणांच्या हाती लागली. पवारांनी शिफारस केलेली अनेक कर्ज बुडीत गेली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सहकारी बँकेचा घोटाळा हजार कोटीचा आहे.
शरद पवार असे थेट कुठेच सापडत नाहीत. लवासा घोटाळ्यात शेअर सुप्रिया सुळे यांच्या नावावर होते. अजित पवार हे त्यावेळी जलसिंचन मंत्री होते. तिथेही पवारांचा सहभाग कुठे होता? पवार पडद्यावर कुठेही दिसत नाहीत, कारण ते कायम दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतात. सहकारी बँक घोटाळ्यात न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली होते. सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने पवारांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. पंतप्रधान मोदींनी दिलेला नव्हता. शेण खायचं, तोंड पुसायचं आणि सांगायचं की कुठे काय खाल्लं? परंतु तोंड जरी पुसलेले असले तरी बरबटलेल्या हातांचे काय कराल? हे हात सांगतात की, समोरचा किती स्वच्छ आहे ते. मोदींच्या घणाघातानंतर विरोधक तिरमिरले असणारच. पवारांनी नेहमी प्रमाणे काखा वर केल्या आहेत. मी नाही त्यातला असे मीडियासमोर जाहीर केले आहे.
महाराष्ट्रातला मराठी मीडिया काही नेते सांगतात ते दाखवण्याचे काम करतो. शोध पत्रकारिता नावाचा विषय मराठी पत्रकारितेपुरता तरी संपलेला आहे. त्यामुळे तुमच्यावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेला याची आठवण कोणी करून द्यावी? बरं एखाद्याने धाडस करून जर असा प्रश्न विचारला की पवार त्याला दमदाटी करणार. याला पुन्हा पत्रकार परीषदांना बोलावू नका असा दम देणार.
मोदींनी प्रश्न विचारणे त्यातल्या त्यात सोयीचे आहे. पवार हे तुमचे गुरू होते, मग आता काय झाले? असा प्रश्न मोदींना विचारला की परखड पत्रकारिता सिद्ध झाली. लगे हात बातमी सुद्धा झाली. या पत्रकारांच्या माहितीसाठी की मोदी कोणाच्या बापाचे नाहीत. त्यांना कुटुंब नसल्यामुळे त्यांच्या राजकारणात स्वार्थ नाही, असलाच तर राष्ट्रीय स्वार्थ. त्यांचे राजकारण चाणक्याच्या तोडीचे निष्ठूर राजकारण आहे.
राजकीय गरजेपोटी एखाद्याला जवळ घेण्याचे आणि गरज सरली तर त्याच्या पेकाटात लाथ घालण्याचे प्रयोग त्यांना वर्ज्य नाहीत. त्यामुळे पवारांना गुरुदक्षिणा देण्याचे मोदींनी ठरवले असेल तर त्यांना कोणी रोखू शकत नाही. भोपाळमधल्या भाषणात अन्य पक्षांची नावे घेताना मोदींनी शिउबाठाचा उल्लेख केला नाही. उद्धव ठाकरेंचे नाव घेतले नाही. याचा अर्थ एवढाच कि मोदींच्या दृष्टीने उद्धव ठाकरे हे अदखलपात्र झालेले आहेत.