शिवसेना-भाजपा युतीचा इतिहास २५ वर्षांचा. यापैकी अखेरच्या पाच वर्षांचा अपवाद वगळता शिवसेना हा मोठा भाऊ होता. परंतु राजकारण हा सापशिडीचा खेळ आहे. छोटा भाऊ कायम छोटा राहात नाही. युतीच्या अखेरच्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा-शिवसेनेचे सरकार आले भाजपाकडे मोठ्या भावाची भूमिका आली. शिवसेनेचे मोठा भाऊ हे बिरुद खालसा झाले. त्याच इतिहासाची आता महाविकास आघाडीमध्ये पुनरावृत्ती होते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी अलिकडेच मविआच्या नेत्यांची बैठक झाली. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. ही बैठक तिन्ही पक्षातील ताळमेळ अधिक घट्ट करण्यासाठी झाली असली तरी प्रत्यक्षात या बैठकीनंतर मविआत जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे.
शिवसेनेने गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती करून १८ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी १३ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिउबाठाकडे शिल्लक असलेल्या खासदारांची संख्या फक्त पाचवर आली आहे. तरीही, ‘जिंकलेल्या १८ जागांपैकी मित्रपक्षांसाठी एकही जागा सोडता येणार नाही’, असे शिउबाठाचे नेते संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘प्रत्येक जागेचा मेरीटवर विचार होईल’, असे सांगितले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने फक्त एक जागा जिंकली होती. त्यामुळे जिंकलेल्या जागा सोडता येणार नाही, हा शिउबाठाचा हेका काँग्रेसला परवडेल असे दिसत नाही. ‘आम्ही सर्व विधानसभांवर लक्ष ठेवून आहोत’, असे विधान नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्याचा अर्थ शिउबाठाच्या लक्षात आलेला दिसत नाही.
या अर्थ स्पष्ट आहे की, २०१९ मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा होत्या, हा २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकातील जागा वाटपाचा निकष असणार नाही. शिवसेना फुटल्यानंतर मविआचे सरकार कोसळले. महाविकास आघाडीतील जागावाटपाचे गणित याच मुद्यामुळे बदलेल असे स्पष्ट दिसते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांच्या परखड स्वभावानुसार हा मुद्दा अधिक रोखठोकपणे मांडला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीनुसार आता ५४ जागा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मविआतील सर्वात मोठा पक्ष आहे. कारण काँग्रेसकडे ४४ जागा आहेत. अजित पवारांनी शिउबाठाचा उल्लेख केला नाही. परंतु २०१९ च्या आकडेवारीनुसार शिवसेना हा ५६ जागांसह सर्वात मोठा पक्ष असला तरी पक्षफुटीनंतर उरलेल्या शिउबाठाकडे फक्त १५ आमदार आहेत, हे अजित पवारांनी उल्लेख न करता सूचित केले आहे.
पवारांचा इशारा संजय राऊतांना व्यवस्थित कळला. त्यामुळे यावर थेट उत्तर न देता मोठा भाऊ ठरवण्यासाठी आता डीएनए टेस्ट करावी लागेल, असे वळणदार उत्तर दिले आहे.
अजित पवारांनी मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या शिउबाठाला तुमच्याकडे आता फक्त १५ आमदार शिल्लक आहेत, याची आठवण करून दिली आहे. मोठा भाऊ म्हणून तुमचा दर्जा खालसा झाल्याचेही स्पष्ट केले आहे.
आम्ही जिंकलेल्या जागेवर दावा सोडणार नाही असे संजय राऊत यांनी कितीही सांगितले तरी ते होणे नाही. अजित पवार यांनी आणखी एक विधान केले आहे. कोणतीही जागा कोणाचीही मक्तेदारी नाही. अर्थात यामध्ये जिंकलेल्या जागाही येतात.
पक्षातून ८० टक्के लोकप्रतिनिधी बाहेर पडल्यानंतरही ठाकरेंच्या पक्षाला मोठा भाऊ समजून जागावाटपातील सर्वाधिक वाटा द्यायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काही खुळे नाहीत. परंतु जागा सोडणार नाही, असे बोलत राहाणे राऊतांना भाग आहे, नाहीतर कुंपणावर बसलेले अनेक नेते पुन्हा एकदा पक्षातून बाहेर पडण्याची भीती.
युतीच्या काळात मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेला २०१४ मध्ये भाजपाकडे आलेला मोठेपणा सहन झालेला नाही. भाजपाचा मुख्यमंत्री अजिबात सहन झाला नाही. त्यातूनच उद्धव ठाकरे यांचे अंतरंग द्वेषाने धगधगायला लागले. त्यांनी भगव्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दावणीला बांधले.
त्यातून त्यांना मिळालेला मोठेपणा औट घटकेचा ठरल्याचे चित्र आहे. कालपर्यंत महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आज सर्वात छोटा पक्ष आहे. परंतु हे वास्तव स्वीकारण्याची ठाकरेंची इच्छा नाही. बरेचदा संख्याबळ हाच राजकारणात मोठेपणाचा निकष असतो. बिहारमध्ये भाजपाने कमी जागा असताना नीतीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद बहाल केले, त्याचे कारण त्यांची स्वच्छ प्रतिमेचा ओबीसी अशी त्यांची प्रतिमा. उद्धव ठाकरे ना स्वच्छ आहेत, ना त्यांच्याकडे प्रतिमा आहे.
संख्याबळानुसार राजकीय पक्ष लहान-मोठे ठरत असतात. हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही घडले होते.
१९९१ मध्ये नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी १८ आमदारांसह बंड केले आणि शिवसेना फोडली. शिवसेना-भाजपा युतीचा तो काळ होता. मनोहर जोशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. भुजबळांनी शिवसेना फोडल्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ कमी झाले. भाजपा हा शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष झाला. जोशींचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात आले. भाजपाने या पदावर दावा केला. संख्याबळ भाजपाच्या बाजूने होते, त्यामुळे जोशींना बाजूला सारून गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते पदी विराजमान झाले. त्यावेळी सामनाने भाजपाचा मुंडा असा अग्रलेख प्रसिद्ध करून खदखद व्यक्त केली होती. मुंडेवर घणाघाती टीका करण्यात आली. परंतु ‘छोटे आणि मोठे’ या वादाचा युती परिणाम झाला नाही. युती कायम राहिली. कारण बाळासाहेब हे दिलदार नेते होते. ते बोलून मोकळे होत असत, मनात आकस ठेवत नसत.
उद्धव यांचे नेमके उलट आहे. पुढे १९९५ मध्ये युतीची सत्ता आली तेव्हा पुन्हा हे समीकरण बदलले. मनोहर जोशी युतीचे मुख्यमंत्री झाले आणि मुंडे उपमुख्यमंत्री.
‘पापुआ न्यू गिनी’च्या पंतप्रधानांनी मोदींच्या पायाला केला स्पर्श!
कोल्हापुरातील खाशाबा जाधवांचा विजय स्तंभ झाला ‘पराभूत’
पित्याने आपल्या दोन लेकींसाठी बिबळ्याच्या जबड्यात हात घातला
तीन मोलकरणींनी केली ४० लाखांची साफ’सफाई’!
जे शिवसेनाप्रमुखांनी केले ते उद्धव ठाकरे यांना जमले असते तर युती आणखी किमान दहा वर्षे टिकली असती. हिंदुत्व अधिक बळकट झाले असते. आता परिस्थिती अशी आहे की भाजपाच्या मोठेपणामुळे चीडचीड करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वाट्याला मविआमध्येही धाकटी भूमिका आली आहे. परंतु आता परतीचे मार्ग बंद झाले आहेत, तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)