मुंबई शहरात गँगवॉर नावाचा रोग हाताबाहेर गेला होता, तेव्हा सरकारला त्यावर एन्काऊंटर नावाचा अक्सीर इलाज सापडला. एन्काऊंटर स्पेशालिस्ट नावाची एक नवी जमात निर्माण झाली. काही जण एन्काऊंटरच्या इतके प्रेमात पडले की एन्काऊंटरचे अर्धशतक, शतक कसे पूर्ण व्हावे म्हणून झटू लागले. अनेकांवर सुपारी घेऊन एन्काऊंटर केल्याचे आरोप झाले. अनेक जण तुरुंगात गेले. डोक्यात हवा गेल्याचे परिणाम दुसरे काय. डोक्यात गेलेली हवा वाईटच, कायम माती करते. मनोज जरांगे पाटील यांची परीस्थितीही वेगळी नाही. नवा नवा जन्म झालेल्या खोंडाच्या डोक्यात हवा जावी आणि ते चौखूर उधळावे, तसे त्यांचेही झालेले आहे. ते सध्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट होण्याची तयारीला लागलेले आहेत.
बनार्ड शॉ एकदा म्हणाला होता, सिगरेट सोडणे ही अगदी सोपी गोष्ट आहे. मी अनेकदा सोडलेली आहे. यातला तिरकस विनोद समजायला थोडा जड आहे, पण या विनोदात कमालीची गंमत आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणही असेच विनोदी मार्गाने चालले आहे. एका वर्षात सहाव्यांदा आमरण उपोषण करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झालेला आहे. सलाईन लावून अनेकदा आमरण उपोषण केल्याबद्दल त्यांची नोंद गिनेज बुकात करायला हरकत नाही. पूर्वी उपोषण सोडताना त्यांना ज्युस पाजायला नेते जात, अलिकडे नेतेही कंटाळलेले दिसतात.
जेवण केल्यानंतर अनेकजण वॉकला जातात, तसे जरांगे उपोषणानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. घराच्या पेक्षा हॉस्पिटलचा मुक्काम त्यांना जास्त आवडायला लागलाय असे दिसते. अलिकडे फडणवीस, फडणवीस, फडणवीस ऐकून लोकांनाही वैताग आलाय. जरांगेंच्याही हे लक्षात आलेले दिसतेय, त्यामुळे जरांगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मोर्चा वळवलेला दिसतो. डीआरडीओचे शास्त्रज्ञ एखादे क्षेपणास्त्र बनवल्यानंतर त्याचा पल्ला वाढवत नेतात, तसेच तुतारीवाल्यांच्या या क्षेपणास्त्राचे झालेले आहे. जरांगे यांचाही पल्ला वाढलेला आहे. मागे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धडा शिकवण्याची भाषा करत होते. आता ते थेट केंद्रीय गृहमंत्र्यांवर घसरलेले आहे. अमित शहा यांचा राजकीय एन्काऊंटर करू अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहे. समोर चॅनलचा बूम आला की आपण ब्रह्मदेव आहोत, आपल्यात सुपरमॅन संचारला आहे, आपल्या शरीरातून प्रकाश वाहू लागला आहे. लोक आपल्या चेहऱ्यावरचे तेज पाहून डोळे झाकतायत, असे भास अनेकांना होतात.
अचानक शक्तिमानसारखी गिरकी घेऊन लोक थेट पंतप्रधानांशीच सामना करायला जातात. आपलं शिक्षण किती, आपला पगार किती, कशाचाही विचार करत नाहीत. जरांगेंची याबाबत स्पर्धा फक्त संजय राऊतांशी आहे. बाकी कोणी त्यांच्या आसपास सुद्धा उभे राहू शकत नाही. अमित शहा यांचा एन्काऊंटकर करण्याची भाषा जरांगेंचे चालक आणि मालक सुद्धा करीत नाहीत. जरांगेच्या डोक्यात जेवढी हवा आहे तेवढी त्यांच्याही नाही.
हे ही वाचा:
सोमनाथ मंदिराजवळील बेकायदेशीर मशीद, कब्रस्तान आणि दर्गा जमिनदोस्त
हसन नसरल्लाहला मारले लेबेनॉनमध्ये, मोर्चा जम्मू काश्मीरमध्ये!
नाव जाहीर करायला लाज का वाटते ?
जम्मू-काश्मीरमधील मौलवी म्हणाले, योगी साहेब ‘राम-राम’
बरं फक्त लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांनी नाही, अनेकांनी जरांगेंचे कपडे उतवले आहेत. काल पर्यंत जे प्रकाश आंबेडकर जरांगेसोबत तिसऱ्या आघाडीचे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांचे ताजे विधान ऐका. जरांगे यांनी विधानसभा निवडणुका लढवल्या नाहीत तर ते मविआसाठी काम करतात हे स्पष्ट होईल. आणि तेच होणार आहे. जरांगे चालक-मालकांच्या शब्दा बाहेर एकही पाऊल टाकणार नाहीत. ते विधानसभा निवडणुका लढवणार नाहीत. ते फक्त सुपारी वाजवणार. रात्री गुपचुप जाऊन बैठका घेणार आणि ज्यांची सुपारी मिळाली, ती वाजवण्याचा प्रयत्न करणार.
अमित शहा यांनी कोणा कोणाचे राजकीय एन्काऊंटर केले त्याचा हिशोब जरांगे मांडतायत. अमित शहा यांनी केले असतील वा नसतील, परंतु जरांगेचा काय संबंध? त्याचा मराठा आरक्षणासाठी काय संबंध? कुणबी आरक्षणाशी, सगेसोयऱ्यांशी कशाशी तरी संबंध आहे का? ते शरद पवारांचे राजकीय एन्काऊटर मोजतात का? कशाला उगाच फुकाची बडबड करायची? लोकांना उगाच संशय येतो, यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न पडतो. सध्या मुस्लीम संघटनांनी डोक्यावर घेतले असल्यामुळे आयतुल्ला खोमेनी किंवा शहबाज शरीफ यांचा राजकीय एन्काऊंटर करण्याची भाषा करणे अडचणीचे आहे. बाकी काय बडबडच करायची असेल तर जो बायडन, पुतीन किंवा शी जिनपिंगचा राजकीय एन्काऊंटर करण्याची भाषा करा. लोकांचे मनोरंजन तरी होईल. जरांगे पुरे झाले आता. अति झाले आणि हसू आले.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)