विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळासह परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा एका ट्विटने रद्द करणारे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या एका ट्विटची महाराष्ट्राची जनता वाट पाहात आहे. आदित्य ठाकरे आता स्वत: च्या पक्षाच्या नेत्याला कान धरून घरी बसवतात की सरकारी पैशाची उधळपट्टी उघड्या डोळ्याने पाहातात, इथे जनता बारीक लक्ष ठेवून आहे.
आपला तो बाब्या आणि इतरांचा कार्टा हा नियम राजकारणात अगदी आम आहे. सत्ता गमावल्यानंतर आदित्य ठाकरे यांची भाषा किती बदलली आहे. सत्ता असताना मुंबईच्या नाईट लाईफचे उद्धारक बनलेले आदित्य ठाकरे सत्तेची उब गमावल्यानंतर मुंबईकरांच्या सोयीसुविधांकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. मित्रमंडळींसोबत दावोसच्या सरकारी दौऱ्यावर जाऊन कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्याबाबत आक्षेप घेतला होता.
घाना दौऱ्यावर जाणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि दावोस दौऱ्यावर जाणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरही टीका केली होती. दावोसला उद्योगमंत्री सामंत सुट्टीवर चालले असल्याची टीका केली होती. मग मविआ सरकारच्या काळात आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते. ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये नेमके काय दिवे लावायला गेले होते? पर्यावरण मंत्र्यांचे दावोसमध्ये काय काम होते. हा दौरा म्हणजे ठाकरे यांच्या सोबत असलेले अधिकारी आणि मित्रांची पिकनिकच होती. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण ही ठाकरेंची अवस्था आहे.
२५ वर्षे महापालिकेची लूट केलेले, कंत्राटदारांच्या मलिद्यावर पोषण झालेले आदित्य ठाकरे अवघ्या दोन वर्षात महापालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलू लागले, रस्त्यांच्या खड्ड्यांवर बोलू लागले. पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यावर बोलू लागले. सत्तेवर असताना या सगळ्या समस्यांची सबळ कारणे ते मुंबईकरांच्या तोंडावर फेकत होते. वाचाळ शिरोमणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात आता फारसा फरक उरलेला नाही. संजय राऊत वर्ष-सहा महिन्यात तरी एखाद वेळा डोकं ताळ्यावर असल्यासारखं बोलतात. आदित्य यांना तेही जमत नाही.
हे ही वाचा:
दोन वर्षांनंतर पुन्हा म्यानमार अस्वस्थ; भारताच्या गोटातही चिंतेचे वातावरण
कांदिवली पूर्व विधानसभेत छठ पूजा उत्सव उत्साहात
‘मेड इन इंडिया’ अंतर्गत एचपी, डेल सारख्या कंपन्या भारतात उत्पादन करणार
ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविराम नाही
अंबादास दानवे हे सर्वपक्षीय शिष्ट मंडळासोबत लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. १२ आमदारांमध्ये दानवे यांची वर्णी लागलेली आहे. वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हीड विद्यापीठात ते सुशासन आणि सार्वजनिक धोरणांचा अभ्यास करून महाराष्ट्र सरकारला सूचना करणार आहेत. २० ते २५ नोव्हेंबर असा हा पाच दिवसांचा दौरा आहे. या पाच दिवसांच्या दौऱ्याबाबत आदित्य ठाकरे मौन कशाला? मुळात असे दौरे प्रत्येक सरकारच्या काळात झालेले आहेत. त्यात काही गैर नाही. दुसऱ्याच्या देशात काही चांगले असेल तर ते पाहून त्याचा अभ्यास करून आपल्याकडे चांगल्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करणे यावर कुणाला आक्षेप असण्याचे कारण नाही.
परंतु मुख्यमंत्री, उद्योगमंत्री अशा प्रकारच्या दौऱ्यावर जातात तेव्हा तुमच्या पोटात मुरडा उठतो. सत्तेवर असताना तुम्ही तुमच्या मंत्रालयाचा संबंध नसताना अशा दौऱ्यात केलेल्या घुसखोरीचा तुम्हाला विसर पडतो. विरोधात बसल्यानंतर तुम्ही याच मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर टीका करता. माझ्या ट्विटमुळे मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला अशा टिमक्या वाजवता. मग तुमच्या पक्षाच्या नेत्याला अशा दौऱ्यावर का पाठवता? तुमच्या पक्षाचा नेता या दौऱ्यात सामील आहे, म्हणून तोंड बंद करून कशाला बसता. जर सत्ताधाऱ्यांची भूमिका तुम्हाला पसंत नाही, सत्ताधाऱ्यांचे दौऱे तुम्हाला उधळपट्टी करणारे वाटतात तर किमान तुमच्या पक्षाच्या नेत्याला घरी बसवून ही उधळपट्टी कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे.
हे ही वाचा:
‘भारताचे फलंदाज चांगले खेळले नाहीत; खेळपट्टीला दोष देणार नाही’
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शमीला मिठी मारली…
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जाहीर
पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या
परंतु हा विचार करण्या एवढी प्रगल्भता तुमच्या विचारात असण्याचे कारणच नाही. कारण तुमच्या प्रगल्भतेची आणि अभ्यासाची उडी नाईट लाईफ पलिकडे जातच नाही. ३२ वर्षांच्या तरुणाला सरकार किती किती घाबरते असे संजय राऊतांनी कितीही वेळा सांगितले तरी आदित्य ठाकरे यांच्यात किती धमक आहे, त्याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. एखाद्याची वारेमाप स्तुती करून त्यांना हास्यास्पद बनवण्यात राऊतांचा हातखंडा आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना कधी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा सल्लागार बनवून तर कधी भावी पंतप्रधान बनवून हास्यास्पद बनवलं, आता ते आदित्य ठाकरे यांच्यावर काम करतायत. आदित्य ठाकरे जणू अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांची नवी आवृत्ती आहे, असे त्यांचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजेच काय तर फुटलेल्या फुग्यात हवा भरण्याचा प्रयत्न करतायत.
आदित्य ठाकरेंना पक्षात कोणी मोजत नाही अशी स्थिती आहे. अंबादास दानवे काय किंवा अन्य कोणी काय यांना रोखणे तर दूरच त्यांना बोलण्याची हिंमतही आता ठाकरेंमध्ये उरलेली नाही. कारण पक्षात आता उरले चार लोक, त्यांना सुनावले तर तेही राहणार नाहीत, त्यामुळे अंबादास दानवे यांना आदित्य बोलणार नाहीत आणि ट्विटही करणार नाहीत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)