पावसाळ्यामुळे वज्रमूठ सभा स्थगित केल्याचा दावा मविआच्या नेत्यांनी केला होता. परंतु निर्धार सभांना मात्र पाऊस बाधा नसावी. त्या व्यवस्थित सुरू आहेत. हिंगोलीतील निर्धार सभेत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नावही घेतले नाही. मविआचा उल्लेख टाळून ते सारखे I.N.D.I.A. चे नाव घेत होते. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी यांच्याकडून झालेल्या भ्रमनिरासचे उट्टे बहुधा ते मविआवर काढतायत.
हिंगोलीच्या सभेत ठाकरे यांनी पुन्हा कमरेखालचे भाषण केले. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा एकदा टरबूज असा उल्लेख केला. टरबूजालाही पाणी लागतेच ना? हे त्यांचे विधान. याला खाजवून खरूज करून घेणे म्हणतात. तुम्ही आयती संधी दिली तर समोरचा तुम्हाला सोडेल कशाला? भाजपा नेते देवेंद्र फडणवीस एकदाच काय तो पंचनामा करून टाकतात, पण अलिकडे त्यांना बोलावेच लागत नाही. उद्धव ठाकरे भाजपाच्या धाकट्या पातीमुळेच हैराण आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज त्यांचा समाचार घेतला. काहीही शिल्लक ठेवले नाही. फडतूस, कलंक, टरबूजची परतफेड फावडा, नपुंसक या तितक्याच शेलक्या शब्दांनी केली.
फक्त राणे कशाला, रोज उठून एखादा भाजपा नेता येतो, टपली मारून जातो. किरीट सोमय्या यांनी ठाकरेंवर खिचडी बाण सोडला आहे. आशिष शेलार यांनी त्यांच्या पद्धतीने पंचनामा केला आहे. अतुल भातखळकर यांनी तर ठाकरेंना निशान ए पाकिस्तानचा दावेदार बनवून टाकला आहे. ठाकरेंचे नैराश्य दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपाचे नेते त्यांची लक्तरे काढतायत. कधी काळी त्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे त्यांच्याच पक्षातील लोक आता त्यांना येड्यात काढतायत. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील सभेला येड्याची जत्रा ठरवून टाकले. याचा अर्थ ठाकरेंना त्यांनी येड्यात काढले. उत्तर देणाऱ्यांची काय चूक? ठाकरे ज्या पातळीवर येऊन बोलतात, त्याच पातळीवर त्यांचे विरोधक त्यांना उत्तर देतात. त्यांच्या तोंडून टरबूज आले, तर विरोधकांकडे पडवळ आहेत.
आजारपणावरून टीका करायला लाज नाही वाटत का? असा सवाल करायचा आणि आपण स्वत: दुसऱ्याला शरीरयष्टीवरून डिवचायचे, असा धंदा उद्धव ठाकरे करतायत. ठाकरे तरी कुठे बांधेसुद आहेत? त्यांचा फिटनेस अक्षय कुमारसारखा असता आणि त्यांनी इतरांची खिल्ली उडवली असती तर समजून घेता आले असते. फिटनेसशी ठाकरेंचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. सोशल मीडिया कायम आक्रमक हिंदुत्व मांडणाऱ्या शेफाली वैद्य त्यांचा कायम पडवळदिगार असा पचका करत असतात. मग कशाला या भानगडी करायच्या? कधी एखाद्याचा वजनावरून उद्धार करायचा, कधी कोणाच्या पत्नीला धमकवायचे, नातवाला घाणेरड्या राजकारणात ओढायचे, हे धंदे त्यांनी करावेत, ज्याला समोरच्याचा जाळ झेलण्याची क्षमता असेल.
परंतु ठाकरे सध्या त्याचा विचार करताना दिसत नाही. सध्या त्यांची समस्या वेगळीच आहे. त्यांना भलताच घोर लागलेला आहे. महाविकास आघाडीचे तारु बुडताना त्यांना दिसते आहे. मविआचा रिमोट कंट्रोल सध्या बिघडलेला आहे. शरद पवारांचे सतत तळ्यात मळ्यात सुरू आहे. भाजपाला सामील झालेल्या अजित पवारांशी थोरल्या पवारांची वाढती जवळीक ठाकरेंना अस्वस्थ करते आहे. शरद पवारांबाबत स्वत: उद्धव ठाकरे उघडपणे व्यक्त झालेले नसले तरी त्यांचे डावे-उजवे म्हणजे संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी मात्र शरद पवारांच्या विरोधात तोंड उघडायला सुरूवात केलेली आहे. ते पार्श्वगायकाच्या भूमिकेत असले तरी गीतकार ठाकरेच आहेत.
हे ही वाचा:
एनएसईत ५० लाख लोक गुंतवणूक करत होते आज ती संख्या ७.५ कोटी
रिलायन्सच्या बोर्डात आता इशा, आकाश, अनंत अंबानी …
आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, तिकीट तपासनीसांनी डोळ्यावर बांधल्या पट्ट्या
पारुल चौधरी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र
संजय राऊत हे आक्रमक बोलण्याबाबत प्रसिद्धच आहेत. ते बोलताना प्रसिद्धी किती मिळेल याचा विचार करतात. बोलून काही गडबड झाली तर उद्या ते सिल्व्हर ओकवर जाऊन लोटांगण सुद्धा घालतील. परंतु दानवे यांनी पवारांच्या विरोधात बोलावे हे जरा अतिच आहे. ठाकरेंच्या इशारतीशिवाय हे घडलेले नाही. हिंगोलीच्या सभेत ठाकरे सुमारे पाऊण तास बोलले. भाजपावर त्यांनी तिखट हल्ले चढवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात त्यांनी शेलकी टीका केली. कधी काळी ज्यांच्या गळ्यात गळे घातले ते तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावरही टीका केली. परंतु शरद पवार यांच्या राजकारणाबाबत त्यांनी चकार शब्द काढला नाही.
भाषणात अनेकदा I.N.D.I.A आघाडीचा उल्लेख केला. परंतु मविआचे नाव सुद्धा घेतले नाही. मविआ बर्खास्त केल्याची किंवा I.N.D.I.A आघाडीत विलीन केल्याची घोषणा अजूनही मविआच्या नेत्यांनी केलेली नाही. संजय राऊत अजूनही मविआबाबत बोलत असतात. परंतु ठाकरेंनी मविआचा उल्लेख टाळला याला महत्व आहे. भविष्यात शरद पवारांनी जर रालोआची वाट धरली तर I.N.D.I.A आघाडीवर परिणाम होणार नाही. परंतु मविआचा मात्र बाजार उठणार. उद्धव ठाकरे यांनी उल्लेख टाळून मविआचे अस्तित्व संपल्याचे जाहीर केले आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)