राज्यातील सत्ता गेली, महापालिका जाण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत विविध विकास कामांचे उद्घाटन झाल्यानंतर शिउबाठा सत्तेपासून दूर जाण्याची ही प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. त्यामुळे शिउबाठा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पोटदुखी अधिक तीव्र झाली आहे. आम्ही पायाभरणी केलेल्या विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान करणार असून हे आमच्या कामावर शिक्कामोर्तब आहे, असा दावा शिउबाठाने केलाय.
मुळात हा दावा करताना शिउबाठाच्या नेत्यांची काही तरी गल्लत झालेली दिसते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा झालेली विकास कामे आणि पंतप्रधान ज्या कामांचे उद्घाटन करायला येतायत या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो कनेक्टिविटी, सांडपाणी प्रक्रीया, रेल्वे पायाभूत सुविधा आदी ३८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करायला येणार आहेत. याचा महाविकास आघाडी सरकारशी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काडीचाही संबंध नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेला विकास पूर्णपणे वेगळा होता.
या काळात कुर्ला गोवावाला कंपाऊंडचा विकास झाला. या विकासाचे कर्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक होते. पाकिस्तानात दडी मारून बसलेला माफीया दाऊद ईब्राहीम याची गुंतवणूक हे या विकास प्रकल्पाचे वैशिष्ट्य. या प्रकल्पामुळे मलिक परिवाराचा प्रचंड विकास झाला. मलिकांचा जावई समीर खान हर्बल टोबॅकोच्या विकास प्रकल्पात होता. परिवहनमंत्री अनिल परब परिवहन आणि गृहमंत्रालयात बदल्यांची विकास योजना यशस्वीपणे राबवली. त्याच वेळी खिशातले कोट्यवधी रुपये गुंतवून त्यांनी दापोलीच्या विकासासाठी इथे रिसॉर्ट उभारला.
कोविडच्या काळात पात्रता आणि अनुभव नसलेल्या मित्रांना कोविड सेंटरची खिरापत वाटून त्यांचा विकास करत होते. मुंबईच्या महापौरांनी कोविड सेंटरच्या माध्यमातून विकासाचा मार्ग स्वीकारला. मुख्यमंत्र्यांचा विश्वासू एपीआय सचिन वाझे एंटालियाखाली स्फोटके भरलेले वाहन ठेवून उद्योगांचा विकास करत होता. कॉँग्रेसचे अस्लम शेख मालवणीत बेकायदा स्टुडिओ उभारून सिने सृष्टीसाठी विकास योजना राबवत होते. त्यांचे मित्र-सहकारी आदित्य ठाकरे पब-नाईट क्लबच्या विकासासाठी नाईट-लाईफची लागवड करीत होते.
अवघी महाविकास आघाडी अशा विकास प्रकल्पांत गुंतली होती. आता या विकास प्रकल्पामुळे मुंबईकरांच्या वाट्याला रस्त्यावरचे खड्डे, पावसाळ्यात तुंबणारे पाणी, तुडंब भरून वाहणारे नाले, घरात भरणारे पाणी येत असेल तर हा त्यांच्या नशीबाचा भाग आहे. परंतु शिउबाठाचे नेते त्यांची विकास कार्य ज्या सत्तेच्या आधारावर राबवत असतात त्या सत्तेचा बाजार महाराष्ट्रातून उठला. महापालिका निवडणुकांची सेमी फायनल आता येऊ घातली आहे. पक्षात झालेली फूट आणि त्यानंतर लागलेली गळती लक्षात घेता, या निवडणुकीत हाती फारसे काही लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे ना राज्यात ना मुंबई-ठाण्यात ना अन्य कुठे अशी परिस्थिती येणार याची जाणीव शिउबाठाच्या नेत्यांना लागली आहे.
अशा काळात देशाचे पंतप्रधान मुंबईत येतात आणि विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका लावतात ही बाब शिउबाठाला सहन कशी व्हावी. पंतप्रधान मेट्रो कनेक्टिविटी, पायाभूत सुविधा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या सर्व प्रकल्पांची पायाभरणी आम्हीच केली असा शिउबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा दावा आहे. ही पायाभरणी कशी झाली त्याची कथाही रसाळ आहे. या पायाभरणीत युवानेते आदित्य ठाकरे यांची भूमिका ऐतिहासिक आहे.
मेट्रो प्रकल्पांचा निपटारा करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मेट्रो कारशेडचीच वासलात लावण्यात आली. पर्यावरणाच्या नावाखाली कारशेडचा बाजार उठवण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा द्वेष आणि त्याला मिळालेल्या अहंकाराच्या तडक्यामुळे मुंबईकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कारशेडचा बळी घेण्यात आला. परंतु त्याच काळात पर्यावरणाचा बळी देऊन ३.७ किमीचा वांद्रे-वरळी सायकल ट्रॅक उभारण्याच्या कारवाया सुरू होत्या. त्यासाठी १६८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. हाय-वे बनवण्यासाठी जेवढा खर्च होतो, त्याच्या पाचशे पट खर्च या सायकल ट्रॅकसाठी होणार होता. म्हणजे लुटीची कल्पना करा. इथे न्यायलयाचा दट्ट्या बसला आणि ट्रॅक बोंबलला.
जिथे मुंबईकरांच्या सुविधेचा मुद्दा येतो अशा प्रत्येक ठिकाणी पर्यावरणाचा कोलदांडा घालण्यात आला. गारगाई पिंजाळचा प्रकल्प पर्यावरणाच्या नावाखाली बासनात गुंडळून आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना भविष्यात पिण्याचे पाणीही मिळणार नाही याची व्यवस्था केली होती. हेही पर्यावरणाच्या नावाखाली झाले. ठाकरे ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या सत्ताकाळात मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने गेल्या काही वर्षात ३८ हजार ८९९ झाडे तोडण्यात आली. त्यापैकी २१ हजार झाडांची कत्तल बिल्डरांच्या खासगी प्रकल्पासाठी करण्यात आली.
हे ही वाचा:
मुघलांचे कर्दनकाळ धर्मवीर महाराणा प्रताप
फक्त मोदीच नाहीत, ठाकरेही विकास पुरूषच…
भ्रष्टाचाऱ्यांना सोलले आणि मुंबई मनपा निवडणुकीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोडला नारळ
मुंबईकरांनो, मोदींनी रणशिंग फुंकलंय!
गारगाईच्या प्रकल्पाऐवजी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा महागडा प्रकल्प मुंबईकरांच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न सुरू होता. सांडपाणी ही मुंबईची मोठी समस्या. मुंबईचा मैला प्रक्रियेशिवाय समुद्रात सोडला जातो. त्यासाठी तात्काळ सांडपाणी प्रकल्पांच्या उभारणीचा मार्ग मोकळा करावा, असे आदेश २०१९ मध्ये दिले होते. परंतु हा प्रकल्प हा खाबूगिरीचा कडेलोट झाला. देशातील अन्य प्रकल्पांच्या तुलनेत पाचशे टक्के महागडा ठरला.
आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण धोरण हे असे आहे. मुंबईकरांच्या गळ्याला नख लावणारे. पर्यावरणाचे नाव घ्यायचे आणि खाबूगिरी करायची हा शिउबाठाचा बाणा. परंतु आता खाबूगिरीसाठी सत्ताच उपलब्ध नसल्यामुळे ठाकरे आणि त्यांचा पक्षाची तडफड सुरू आहे.
हे सगळे विषय मुंबईकरांच्या हिताचे असले खरा विकास यातून साधला जात नाही. खरा विकास म्हणजे एक उभी असताना मातोश्री-२ उभी करणे आणि मातोश्री-३ साठी तयारी करणे. गौरी भिडे यांनी केलेल्या जनहीत याचिकवर तिथे या खऱ्या विकासाची सुनावणी होणार आहे.