24 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरसंपादकीयलोकांचे अश्रू तरी पुसा...

लोकांचे अश्रू तरी पुसा…

Google News Follow

Related

मुंबईतला पाऊस भीतीदायक आणि जीवघेणा बनलाय. काळ्या ढगांनी आकाश भरलं की झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीबांच्या पोटात गोळा येतो.

गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत कहर केला आहे. अलिकडे भरती असो वा नसो, मुंबईच्या सखल भागात पाणी तुंबते. पूर्वी हिंदमाता, सायन, सांताक्रूझ सब-वे अशा ठराविक ठिकाणी पाणी भरत होते. परंतु आता त्यात बऱ्याच नव्या जागांची भर पडली आहे.

पाऊस सुरू झाला की तासाभरात लोकांच्या घरात पाणी शिरते. कोसळणाऱ्या पावसात रात्रभर जागत घरात तुंबलेले पाणी उपसणे हा एकमेव कार्यक्रम असतो. पोतेरे पिळून घरातल्या बाईच्या तळहाताची सालटी निघतात. घरातली कच्चीबच्ची घराच्या गळक्या पत्र्यावर सुरू असलेला पावसाचा दणदणाट भेदरलेल्या डोळ्यांनी आणि सुन्न चेहऱ्याने ऐकत असतात. कर्ता पुरूष आपल्या कर्माला दोष देत हताशपणे हा नशीबाचा तमाशा बघत असतो.

हे ही वाचा:

विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

अमरिंदर विरुद्ध सिद्धू वाद चिघळणार?

शेर बहादुर देउबांवर नेपाळला ‘विश्वास’

उघड्या गटारात पडून ४ वर्षांचा मुलगा बेपत्ता

कालचा शनिवार मुंबईकरांसाठी घातवार ठरला. चेंबूर आणि विक्रोळीत दरड कोसळून ३३ जणांचा बळी गेला. कांदिवली पूर्वमध्ये तुंबलेल्या पाण्यामुळे वीजेचा शॉक लागून २१ वर्षाच्या कोवळ्या तरुणाचा बळी गेला. कांदिवली ठाकरे कॉम्प्लेक्समध्ये महापालिकेच्या पार्कींगमध्ये पाणी साचले, सुमारे चारशे गाड्या या पार्कींगमध्ये होत्या. त्यात अनेक रिक्षांचा समावेश होता. रात्रभर या गाड्या पाण्यात राहिल्या. मुसळधार पावसाने लोकांच्या पोटावरही पाय आणला.

पावसावर कोणाचा जोर नाही. पण मुंबईत झालेले मृत्यूचे तांडव फक्त पावसामुळे झालेले नाही. आस्मानीसोबत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची ढीम्म सुलतानीही याला जबाबदार आहे. झाल्याप्रकाराचे खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडणे गरजेचे होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किंवा केंद्र सरकारच्या डोक्यावर फोडणे शक्य नव्हते. त्यामुळे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी ते पावसावर फोडले. ‘पावसाची दगाबाजी’ असा ठपका ठेवून हात झटकले. पावसामुळे चेंबूरच्या टेकड्यांवरील घरात राहणाऱ्या रहीवाशांचे मृत्यू केवळ पावसामुळे झाले असे कसे मानावे?

शहरातील आपत्कालिन व्यवस्था कोलमडल्याचे चित्र होते. चेंबूर दुर्घटनेनंतर पहाटेपर्यंत तिथे प्रशासनाची मदत पोहोचलेलीच नव्हती. वेळेवर हालचाल झाली असती तर कदाचित काहीजणांचे प्राण वाचले असते. दहीसरचा आपत्कालिन कक्ष पाण्याखाली होता, यावरून कल्पना यावी. रहीवाशांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खबरदारी घेतली असती तर हा प्रकार टाळता आला नसता? मुंबईत अशा टेकड्यांवर राहणाऱ्या सुमारे २५ हजार लोकांचे जीवित धोक्यात आहे. परंतु चेंबूर विक्रोळीतील दुर्घटनेनंतरही महापालिकेने हालचाल केल्याचे ऐकीवात नाही.

मुंबईतील नद्यांचे नाले झाले. या नाल्यांच्या प्रवाहातील अडथळे दूर करून ते पाणी थेट समुद्रात जावे यासाठी पालिका गेली अनेक वर्षे शेकडो कोटी रुपये खर्च करते आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासाठी तीन हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च झालेली आहे. परंतु नाल्यांच्या प्रवाहात असलेले अडथळे संपलेले नाहीत. मिठी नदीच्या स्वच्छतेच्या नावाखाली दरवर्षी पालिका कोट्यवधी रुपये खर्च करते, पण मिठीतला गाळ आणि कचरा कमी होण्याचे नाव नाही. मुंबईतील टक्केवारीजीवी नाल्यातल्या गाळामुळे गबर होतायत. मुंबईतले नाले हे सत्ताधारी शिवसेना आणि कंत्राटदारांसाठी कुरण बनले आहे. नाल्यातून, कचऱ्यातून, रस्त्यातल्या खड्ड्यातून पैसा कमावण्याचा यशस्वी प्रयोग मुंबईत गेली अनेक वर्षे सुरू आहे. याच प्रयोगामुळे दर पावसात मुंबईकरांच्या जीवाशी, संसाराशी, रोजगाराशी खेळ होतो आहे.

पाणी जिरवण्याची क्षमता असलेली दलदल, त्यावर असलेले तिवरांचे जंगल (कांदळवन) महापालिकेच्या कृपेने बिल्डरांवर कुर्बान झाले. तिवरांची कत्तल करायची, रातोरात डेब्रिजचे ट्रक लोटून दलदल बुजवायची, निर्माण झालेल्या नव्या भूमीवर आधी झोपड्या ठोकायच्या. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्या पक्क्या करून घ्यायच्या. त्यांना पाण्याच्या जोडण्या द्यायच्या. काही काळाने इथे एसआरए योजना राबवून इमारती ठोकून मोकळे व्हायचे. हे प्रकार गेली काही वर्षे राजरोस सुरू आहेत.
तिवरांचे क्षेत्र आक्रसत असल्याच्या मुद्द्यावर उपग्रहांनी काढलेल्या छायाचित्रांनीही शिक्कामोर्तब केले आहे. मुंबईत पूर्वी एकच धारावी होती, धारावीशी स्पर्धा करणारे गणपत पाटील नगर गेल्या काही वर्षात मुंबईकरांच्या डोळ्या देखत उभे राहीले. तिथेही पूर्वी कांदळवन होते. मालवणीत याची पुनरावृत्ती होतेय. अशी अनेक गणपत पाटील नगरं मुंबईत पालिकेच्या कृपेने दलदलीच्या जागेवर उभी राहतायत. हे पालिकेचे कर्तृत्व आहे.

ब्रिमस्टोवॅड, मिठी नदीची सफाई, दर वर्षी होणारी नालेसफाई यावर गेल्या पंचवीस वर्षात शिवसेना सत्ताधारी असलेल्या महापालिकेने प्रामाणिकपणे काम केले असते, दलदल आणि टेकड्यांवर ठोकल्या जाणाऱ्या झोपड्या वेळीच रोखल्या असत्या तर कदाचित मुंबईकरांच्या वाट्याला दर पावसात हे भोग आले नसते. परंतु या पापांकडे दुर्लक्ष करायचे आणि कधी ‘नऊ कि.मी. लांब ढगा’ची, तर कधी ‘अनैसर्गिक पावसा’ची अतर्क्य बोंब ठोकायची असा शिवसेनेचा खाक्या आहे.

हे ही वाचा:

कुठे गेले अनिल देशमुख?

…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत

भरदिवसा वकिलावर तलवारीने वार; दहिसरमध्ये कायदा सुवस्थेचे तीन तेरा!

आरोप बिनबुडाचे! भारतात कोणाचीही हेरगिरी नाही

दुर्घटनेत जे जीवानिशी गेले त्यांच्या मृत्यूपेक्षा शिवसेना नेत्यांना भाजपाच्या टीकेची चिंता जास्त आहे. सत्तेमुळे आलेली सुस्ती इतकी प्रचंड की इतक्या मोठ्या संख्येने आलेली जीवितहानी पाहूनही मुख्यमंत्र्यांना घरातून बाहेर पडून लोकांचे अश्रू पुसण्याची सवड मिळाली नाही. चेंबूरच्या किंकाळ्या ‘मातोश्री’ आणि ‘वर्षा’पर्यंत पोहोचण्यापूर्वी दिल्लीत पोहोचल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त करून मदत जाहीर केल्यानंतर तब्बल दोन तासांनी मुख्यमंत्र्यांना जाग आली. ट्वीट करून मदत जाहीर करण्याची सवड मिळाली. पालकमंत्री आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेचा एकही नेता, मंत्री घटनास्थळी फिरकला नाही.

मुंबईकराची परिस्थिती बिकट आहे. इथे माणसं कधी ऑक्सिजन अभावी, कधी उपचारांअभावी तर कधी मॅनहोल मध्ये पडून मरतायत. भिंतीखाली चिरडून मरतायत, कधी वीजेच्या शॉकने तर कधी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे लोकांचे बळी जातायत. सत्ताधाऱ्यांना त्यांची जबाबदारी घेण्याची इच्छा नाही. याच्या मूळाशी असलेल्या समस्या संपवण्याची इच्छाशक्ती नाही. लोक हतबल झालेत, हवालदील झालेत. त्यांच्या जखमांवर फुंकर घालणारे कोणी नाही, त्यांचे अश्रू पुसणारे कोणी नाही. मुंबईकरांच्या वाट्याला मरणाचे उत्सव आलेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा