काँग्रेसला ना उद्धवजींच्या मानाची चिंता, ना मानेची…

एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांना ठाकरेंच्या मानेकडे दुर्लक्ष केले असताना, दुय्यम आणि तिय्यम दर्जाचे काँग्रेस नेते त्यांच्या मानाचाही विचार करताना दिसत नाही.

काँग्रेसला ना उद्धवजींच्या मानाची चिंता, ना मानेची…

किती ही इशारे दिले, तरी शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाहीत, याची काँग्रेसला इतकी खात्री झालेली आहे, की दर चार दिवसांनी यांना टपल्या मारल्याशिवाय त्यांना अन्न पचत नाही. माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. तरीही शिउबाठाचे नेते मूग गिळून बसलेले आहेत. एकीची वज्रमुठ कायम आहे. या मुठीला कोणताही तडा गेलेला नाही. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस हा पक्ष चौथ्या क्रमांकावर आला असला तर तूर्तास या पक्षाचे नेते शिउबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यावर मूग दळताना दिसतायत.

सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा जेव्हा उद्धव ठाकरे यांनी २६ मार्च रोजी मालेगाव सभेत दिला होता. तेव्हा असा इशारा देऊन काँग्रेसला काडीचाही फरक पडणार नाही, असे आम्ही ठामपणे सांगितले होते. कारण शिउबाठाकडून अलिकडे फक्त गरज असेल तेव्हा, किंवा भाजपाला उत्तर देण्यासाठी हिंदुत्वाच्या बाता मारल्या जातात. परंतु त्यातला पोकळपणा जनतेलाही कळलेला आहे आणि शिउबाठाच्या मित्रपक्षांना सुद्धा. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कानावर ठाकरे यांची नाराजी घातली. स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणे महाराष्ट्रात जड जाईल, असे बजावले, तर काँग्रेसवाल्यांना काडीचाही फरक पडलेला नाही. त्यांच्या टिवल्याबावल्या सुरूच आहेत. कोणीही उठतो आणि ठाकरेंना वाकुल्या दाखवतो.

भाजपा नेते आशिष शेलार यांनी अलिकडेच या मुद्द्यावर बोट ठेवून ठाकरेंना सुनावले होते. ‘शिवसेना जोपर्यंत हिंदुत्वाला घट्ट धरून होती, तोवर देशभरातील दिग्गज नेते मातोश्रीवर येत असत. हिंदुत्व सोडल्यानंतर मात्र ठाकरे पिता-पुत्रांना वारंवार इतरांच्या दारावर जावे लागते आहे.’ ठाकरेंची घसरलेली पत मविआतील मित्र पक्षांच्याही लक्षात आली आहे. छत्रपती संभाजी नगरच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासाठी विशेष मोठे आसन ठेवण्यात आले होते. त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चिडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यावर खुलासा करताना असे सांगितले की, ‘उद्धव ठाकरेंना मानेचे दुखणे असल्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी आणि मोठी खुर्ची ठेवण्यात आली.’

हे ही वाचा:

अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या ४४ मालमत्तांना मुंबई अग्निशमन दलाने बजावल्या नोटीस

पहिल्या महायुद्धात लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या चित्राच्या निर्यातीवर ब्रिटनची बंदी

मुंबई पुणे जुन्या मार्गावर बस दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू, गोरेगावचे झांज पथकही होते

मागून आलेल्या बसने धडक दिल्याने पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

परंतु मानेचे हे दुखणे मित्रपक्षांच्या दणक्याने अचानक बरे केलेले दिसते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ‘मविआतील तीन पक्षांच्या एकीची वज्रमुठ कायम आहे’, असे ठणकावून सांगितले. मात्र त्याचवेळी ‘नागपूरमधील मविआच्या सभेत सर्व नेत्यांसाठी समान खुर्च्या असतील’, अशी माहीतीही देऊन टाकली. संभाजी नगरच्या सभेनंतर अजितदादांचा हवाला देऊन आम्ही असे म्हटले होते की ठाकरेंना मिळालेली मोठी खुर्ची ही मविआतील मानामुळे मिळालेली नसून दुखऱ्या मानेमुळे मिळालेली आहे. परंतु या सभेतला जेमतेम दोन आठवडे उलटले असताना अचानक ठाकरेंची मान बरी झालेली असावी. त्यामुळेच नाना पटोलेंनी सर्वांना सारख्या खुर्च्या मिळणार असे सांगून टाकले आहे.

याचे दोन अर्थ निघतात, एक तर ठाकरेंची मान बरी झालेली आहे आणि त्यांना वेगळ्या आणि मोठ्या खुर्चीची गरज नाही. किंवा मान दुखावलेली असली तरी नेत्यांना मंजूर नाही म्हणून ठाकरेंना वेगळी खुर्ची देण्याची मविआच्या वरीष्ठ नेत्यांची तयारी नाही. मविआच्या नेत्यांचा हा कद्रूपणा वारंवार दिसत असतानाही एकीच्या वज्रमुठीचा दावा मविआचा प्रत्येक नेता करतो आहे. परंतु एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांना ठाकरेंच्या मानेकडे दुर्लक्ष केले असताना, दुय्यम आणि तिय्यम दर्जाचे काँग्रेस नेते त्यांच्या मानाचाही विचार करताना दिसत नाही. शिउबाठाने निर्वाणीचा इशारा दिल्यानंतरही शिवानी वड्डेटीवार यांनी सावरकरांचा पुन्हा एकदा अपमान केला आहे.

या आधी शिउबाठाचे नेते संजय राऊत यांना सावरकर अपमानप्रकरणी शब्द गिळण्याची वेळ आली होती. त्यानंतर स्वत: उद्धव ठाकरे या विषयावर बोलले. तरीही शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांनाही दखलपात्र ठरवले. शिवानी या एका कॅबिनेट मंत्र्याच्या कन्या आहेत, या पलिकडे त्यांची फारशी ओळख नाही. या वक्तव्याच्या निमित्ताने त्यांच्याबाबत चर्चा होते आहे. किंबहुना अशी चर्चा व्हावी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गुडबुकमध्ये प्रवेश मिळावा म्हणूनच त्यांनी हे शेण खाल्ले असण्याची शक्यता जास्त आहे.

‘बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र असून तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात ते वापरले पाहिजे’, हे विधान त्यांनी सावरकरांच्या नावावर खपवले आहे. मागचा पुढचा संदर्भ न देता ते वापरलेले आहे. शिवानी यांनी वापरलेले विधान सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकाच्या संदर्भात आहे. ते विधान मुस्लीम आक्रमकांच्या संदर्भात आहे. मुस्लीम राज्यकर्ते हिंदूंच्या मुलीबाळी उचलून नेतात, त्यांच्यावर बलात्कार करतात, त्यांना बाटवतात. हा संदर्भ त्यांच्या कथनामागे होता, हे वडेट्टीवार कन्येने मोठ्या खुबीने दडवले. मुस्लीम राज्यकर्ते हे चाळे करत होते, असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले असते तर ते चंद्रपूरच्या सभेत उपस्थित असलेल्या लोकांनाही कळले असते.

मुळात काँग्रेसच्या पचपचीत विचारधारेला सावरकर झेपणारे नाहीत. शिउबाठाने सुद्धा हा पचपचीत विचार शिरोधार्य मानला असल्यामुळे ठाकरेंना काँग्रेससमोर मान झुकवणे क्रमप्राप्त आहे. फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांना अध्येमध्ये निर्वाणीचे इशारे द्यावे लागतील आणि काँग्रेसला क्षणभर थोबाड गंभीर करून ते ऐकल्यासारखे करावे लागते. काही दिवसांनी पुन्हा येरे माझ्या मागल्या. लोकांना मात्र दोन्ही पक्षांचे हे चाळे लक्षात आले आहेत. त्याचे चोख उत्तर जेव्हा वेळ येईल तेव्हा जनता देईलच. दिग्गजाला मिळणारा मान काँग्रेसकडून ठाकरेंना मिळणार नाही हे निश्चित, त्यांच्या दुखऱ्या मानेचेही ते काळजीही ते घेतील याची शक्यता कमी.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version