‘आम्ही असू की नसू, पण २०२४ मध्ये ते नसतील’, या शब्दात बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी शपथविधी सोहळ्यानंतर भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. २०१४ आलेले २०२४ मध्ये राहतील का? असा सवाल विचारणाऱ्या नीतीश कुमार यांचा रोख अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. २०१४ मध्ये भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर नीतीश यांनी रालोआतून काढता पाय घेतला होता. २०२२ मध्ये पुन्हा मोदी रागाचा आलाप करत नीतीश यांनी भाजपासोबत काडीमोड घेतला आहे. एकेकाळी सत्तेवर येण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी गरीबी हटाओचे नारे दिले जात, सध्या मोदी हटाव चे नारे दिले जातायत. काळ इतका बदलला आहे.
नीतीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात जे घडले त्याची पुनरावृत्ती बिहारमध्ये घडताना दिसते आहे. शिवसेनेने भाजपासोबत निवडणूक लढवली. परंतु मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेले. बिहारमध्ये नीतीश कुमार यांनी २०२० मध्ये भाजपासोबत निवडणूक लढवली होती. परंतु आता दोन वर्ष भाजपाच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पद उपभोगल्यावर नीतीशना भाजपा अपमान करत असल्याची उपरती झाली आणि ते राष्ट्रीय जनता दलाच्या मांडीवर बसले. भाजपाशी फारकत घेऊन नीतीश यांनी राज्यातील १७ टक्के मुस्लिम मतदारांना शिट्टी मारली आहे. भाजपाशी फारकत घेतल्यानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हाच प्रयत्न केला होता.
नीतीश यांनी जनमताचा अनादर केल्याचा आरोप भाजपाचे नेते करतायत. त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपाने आपला अपमान केल्याचा दावा नीतीश करतायत. कमी जागा मिळून सुद्धा भाजपाने नीतीश यांना मुख्यमंत्री पद बहाल केले होते. या घडामोडीनंतर सन्मानाचे मुख्यमंत्रीपद देऊन अपमान करण्याची नीती भाजपाने बिहारप्रमाणे महाराष्ट्रात का वापरली नाही, असा प्रश्न उद्धव यांच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल.
२०२० मध्ये एकत्र निवडणुका लढवून भाजपाला ७४ जागांवर विजय मिळवला तर नीतीश कुमार यांच्या जदयूला फक्त ४३ जागा मिळाल्या. इथेच पहिल्यांदा नीतीश यांच्या पोटात पहील्यांदा कळ आली असावी. गेल्या दोन निवडणुकीत नीतीश यांचा जनाधार सातत्याने घटतो आहे. २०१० मध्ये त्यांना ११५ जागा मिळाल्या होत्या. २०१५ मध्ये हा आकडा ७१ वर आला. २०२० मध्ये फक्त ४३ जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. आपली ताकद कमी होते आहे, जनाधार घटतो आहे आणि भाजपाची मात्र ताकद वाढते आहे हे कुठे तरी नीतीशना खटकत होते. २०२० मध्ये कमी जागा मिळवूनही भाजपाने कोणतीही खळखळ केल्याशिवाय नीतीशना मुख्यमंत्री पद बहाल केले. तरीही आपले मुख्यमंत्रीपद भाजपाच्या कृपेवर अवलंबून असल्याचे शल्य त्यांना असावे. त्यातूनच त्यांनी राजदसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ज्या लालूपुत्रांच्या चाळ्यांना कंटाळून ते भाजपासोबत आले होते, अखेर त्यांच्याच वळचणीला जाण्याचे त्यांनी ठरवले.
आपण पंतप्रधान पदाचे दावेदार नाही, असे नीतीश यांनी स्पष्ट केले आहे, परंतु मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान राहणार नाहीत, अर्थात केंद्रात भाजपाची सत्ता राहणार नाही असा दावा नीतीश यांनी केला आहे. म्हणजे मोदींना पंतप्रधान पदावरून दूर करून राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आणि लालू यांच्या छत्रछायेखाली बिहारचा कारभार करायचा असा हा गेम प्लान असावा.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर दिल्लीतही सत्ता येईल, अशी दिवास्वप्न आदित्य ठाकरे यांना पडू लागली होती तसाच हा प्रकार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता २५ वर्षे टिकेल असा दावा करणारे संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत. त्यांचे सरकार कधीच इतिहासजमा झालेले आहे.
हे ही वाचा:
परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या
कर्मचाऱ्यांच्या मुलींनी बांधली पंतप्रधानांना राखी
बेपत्ता मुलांना शोधून पालकांच्या चेहऱ्यावर आणणार ‘मुस्कान’
हा घटनाक्रम ताजा असताना नीतीश कुमार पुन्हा तेच स्वप्नरंजन करू लागले आहेत. आदित्य ठाकरे यांचे एकवेळ ठिक होते, ते राजकारणात अगदीच नवशिके होते, परंतु विरोधी पक्ष अगदीच तोळामासा झालेला असताना बिहारचे आठ वेळा मुख्यमंत्री झालेल्या नीतीश यांनी मोदींना हटवण्याची भाषा करणे हे जरा अतिच झाले आहे. बाटग्याची बांग जरा जास्तच जोरात असते. आपल्या समाजवादी साथींसोबत नवी नवी साथ करताना मोठ्या आवाजात मोदींच्या पराभवाची भविष्यवाणी करणे नीतीश यांना गरजेचे वाटले असावे.
लोकसभा निवडणुकांना २ वर्षापेक्षा कमी काळ राहिला आहे. तोपर्यंत नीतीश कुमार यांचा नवा संसार टिकेल याची शाश्वती कोणी देऊ शकेल काय? एक मात्र खरे की, तुरुंगात बसलेल्या लालू प्रसाद यांच्यासाठी बऱ्याच काळाने एक गूड न्यूज आली आहे. एकेकाळी लालू यांच्या जंगलराज पासून बिहारची सुटका करण्यासाठी नीतीश कुमार भाजपासोबत आले होते. लालूंना पराभूत करून बिहारमध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यात नीतीश यांची मोठी भूमिका होती. नीतीश यांच्यासोबत आपण भांडलो, आरोप केले, परंतु काही झाले तरी आम्ही समाजवादी आहोत, काका-पुतणे आहोत, म्हणूनच आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत, या शब्दात तेजस्वीप्रताप हे नीतीश यांच्या नव्या घरोब्यावर व्यक्त झाले आहेत.
भाजपाची साथ सोडून नीतीश पुन्हा एकदा जंगलराजच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. लालूंच्या साथीने मोदींना हटवण्याची भाषा करीत आहेत. बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती होते आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)