बुडत्याचा पाय खोलात, आता ड्रग्ज प्रकरणीही आरोप

शिउबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आरोप करावेत आणि त्याचे बुमरॅंग होऊन मातोश्रीला शेकावे हा प्रकार वारंवार होताना दिसतो आहे.

बुडत्याचा पाय खोलात, आता ड्रग्ज प्रकरणीही आरोप

युवा सेनेचे अध्यक्ष आदीत्य ठाकरे यांचे ग्रह सध्या वक्री अवस्थेत दिसतायत. दिशा सालियान प्रकरणी त्यांच्याविरोधात जनहीत याचिका करण्यात आली आहे. आता ‘ड्रग्ज मुक्तीची सुरूवात मातोश्रीपासून करा’, असा टोला त्यांना भाजपाने लगावलेला आहे. शिउबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आरोप करावेत आणि त्याचे बुमरॅंग होऊन मातोश्रीला शेकावे हा प्रकार वारंवार होताना दिसतो आहे.

यूट्यूबर एल्विश यादव याच्यावर ड्रग्ज प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ड्रग्ज प्रकरणाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी ‘ड्रग्ज मुक्तीची सुरूवात मातोश्री पासून करा’, असे प्रत्युत्तर दिले. याप्रकरणी त्यांनी आदीत्य ठाकरें आणि त्यांच्या सेलिब्रिटी मित्रांचे उघडपणे नाव आहे.

शिउबाठामध्ये सगळ्यात वजनदार आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचा नेता कोण असेल तर संजय राऊत. त्यांना मातोश्रीतील सगळ्या भानगडी माहित आहेत. तळघरातील फडताळात किती सांगाडे आहेत, याचा तपशील त्यांच्याकडे आहे.
एकेकाळी मातोश्रीवर असेच वजन नारायण राणे यांचे होते. ते शिवसेना प्रमुखांचे सर्वात जवळचे नेते होते. नारायण राणे यांच्यावर शिवसेना प्रमुखांचा इतका विश्वास होता की, राज्यात मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करून त्यांना नारायण राणे यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लावली. तेव्हा मातोश्रीची गुपितं राऊतांपेक्षा राणे यांच्याकडे आणि त्यामुळे त्यांच्या मुलांकडे आहेत. राऊत- राणे यांच्या जुगलबंदीत राणे आजवर भारी पडलेले आहेत. परंतु, एकीकडे राणे ठाकरेंवर आरोप करत असताना राऊतांचाही त्याला हातभार लागताना दिसतो आहे.

राणे पिता पुत्रांनी मातोश्रीवर इतके गंभीर आरोप केले आहेत की त्याची गंभीर दखल घेऊन उद्धव ठाकरे यांनी राणेंवर बदनामीचा खटला दाखल केला पाहिजे होता. परंतु, तसे काही होताना दिसत नाही. सहाराच्या मराठी कामगारांना कामावर कमी केल्यानंतर तोंड बंद ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सात कोटी रुपये घेतले. एअर इंडीयाच्या मॅनेजर कडून ते दरमहा २५ लाख रुपये घ्यायचे. हे आरोप नारायण राणे यांचे.

दिशा सालियनची आत्महत्या नसून तिची बलात्कार केल्यानंतर हत्या करण्यात आली. सुशांत सिंह राजपूतला याबाबत माहीती असल्यामुळे त्याचाही काटा काढण्यात आला, असा आरोप नितेश राणे आणि नारायण राणे या दोघांनी केला आहे. आता याप्रकरणी राशिद खान या याचिकाकर्त्याने जनहीत याचिका केली आहे. आदीत्य ठाकरे यांच्या वकीलांनी याप्रकरणी कॅव्हेट दाखल केले आहे म्हणजे याचिकेची सुनावणी करताना आमचेही म्हणणे न्यायालयाने ऐकून घ्यावे, अशी विनंती केली आहे. दिशा सालियन आणि सुशांत प्रकरणात सर्व संबंधित तपास यंत्रणांनी आपल्याला क्लिनचिट दिली असताना विनाकारण आपली बदनामी करण्यासाठी ही याचिका दाखल केली असल्याचे प्रतिज्ञापत्र ठाकरे यांच्या वकीलाने न्यायालयात दाखल केलेले आहे.

राशिद खान यांचे वकील निलेश ओझा यांनी आदीत्य ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रावरच आक्षेप घेतलेला आहे. ठाकरे यांनी या प्रतिज्ञापत्रात दिशा आणि सुशांत प्रकरणात सीबीआय आणि स्थानिक पोलिसांनी तपास करून आपल्याला क्लिनचिट दिली असल्याचा दावाच खोडसाळ आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू असून सुशांतच्या हत्येसह आम्ही कोणतीही शक्यता फेटाळलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. तर राज्य सरकारने पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन केले आहे, त्यामुळे आदीत्य ठाकरेंचा क्लिनचिटचा दावा पूर्णपणे बिनबुडाचा आहे. खोट्या माहीतीच्या आधारे त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यामुळे न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. सुटका करून घेण्यासाठी टाकलेले प्रत्येक पाऊल ठाकरेंना अधिक गाळात घालते आहे.

राशिद खान यांच्या याचिकेत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. दिशा सालियानची आत्महत्या ८ जून २०२० आणि सुशांत सिंहचा मृत्यू १४ जून रोजी झाला. या दोन्ही दिवशी आदित्य ठाकरे, त्यांना सुरक्षा देणारे पोलिस यांचे मोबाईल लोकेशन काय होते? दिशा सालियनच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आल्यामुळे तिच्या आजूबाजूच्या इमारती आणि त्या दिवशी ट्रॅफीक पोलिसांचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची विनंती जनहीत याचिकेत केलेली आहे. कोणत्याही प्रकरणामध्ये इलेक्ट्रॉनिक महत्वाचे असतात. ते नाकारता येत नाहीत.

सुशांतची हत्या झाली तेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये होतो, त्या दिवशी आजोबांचे निधन झाले होते असा दावा आदीत्य ठाकरे यांनी केला आहे. माधव पाटणकर हे आदीत्य यांचे आजोबा. अंधेंरीच्या क्रीटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांचे १५ जून रोजी निधन झाले. दिशा सालियनचा मृत्यू ८ जून रोजी आणि सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू १४ जून रोजी झाला. त्यामुळे आदीत्य ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे जर ते क्रीटी केअरमध्ये असतील तर मोबाईल लोकेशनवरून ही बाब चटकन उघड होऊ शकेल. कारण दिशाने ज्या इमारतीवरून उडी घेतली ती इमारत मालाड पश्चिमेला आहे. सुशांत सिंह राजपूतचे घर वांद्रे पश्चिमेला होते. आदीत्य यांना अटक करून त्यांची चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे.
६ डिसेंबरला या प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात होणार आहे.

आदीत्य ठाकरे यांच्या मागे कायद्याचे शुक्लकाष्ठ लागलेले असताना आता नितेश राणे यांनी ड्रग्ज प्रकरणी त्यांच्यावर आरोप केलेले आहे. ठाकरेंसोबत बॉलिवूड अभिनेता दिनो मोरया याचेही त्यांनी नाव घेतेले आहे. संजय राऊत यांनी जर ड्रग्ज प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर वाह्यात आरोप केले नसते तर राणेंना मातोश्रीवर ड्रग्ज प्रकरणी आरोप करण्याची गरज वाटली नसती.

हे ही वाचा:

मोदी सरकारचा मोठा निर्णय; मोफत रेशन योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ

गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य

छत्तीसगडमधील काँग्रेसने तर ‘महादेव’लाही सोडले नाही!

पाकिस्तानी लष्कराच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला

एल्विश यादव हा गणेशोत्सवात वर्षावर हजर होता, त्याच्यावर एफआयआर झाला म्हणून मुख्यमंत्र्यांचा संबंध ड्रग्ज प्रकरणाशी जोडून राऊत मोकळे झाले. नितेश राणे यांनी आदीत्य ठाकरेंकडे बोट दाखवलेले आहे. एखादी व्यक्ती ड्रग्जचे सेवन करते की नाही याचा शोध घेणे काही फार कठीण नाही. रक्त तपासणी केली तर एका क्षणात दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल.

Exit mobile version