ब्राह्मणांना टार्गेट करून ऐक्य निर्माण होईल?

एक वाक्याने यशश्रीची निर्घृण हत्या करणाऱ्या दाऊद शेख सारख्या पिसाळलेल्या जनावराचा निषेध पवार करत नाहीत

ब्राह्मणांना टार्गेट करून ऐक्य निर्माण होईल?

सामाजिक ऐक्य परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली आहे. जात, धर्म, पंथातील अंतर कमी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करताना त्यांनी पुन्हा एकदा ब्राह्मणांना टार्गेट केले. त्यांना अशी गरज का वाटावी? ब्राह्मणांना लक्ष्य बनवून महाराष्ट्रात शांतता निर्माण होणार आहे, असे त्यांना खरोखरच वाटते आहे काय? पवार आगीत तेल ओतण्याचे काम करतायत, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे. अनेकांना त्यात तथ्य वाटू लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा महाराष्ट्रात एक वर्ग होता. म्हणून गागा भट्टांना उत्तरेतून बोलवावे लागले. ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग होता, दुर्दैवाने हा वर्ग आजही कुठे ना कुठे पाहायला मिळतो आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण होत आहे. पवारांचा आजवरचा जातवादी इतिहास ज्यांना माहिती आहे, त्यांना या विधानाचा अर्थ समजायला वेळ लागत नाही. ज्या दिवशी देशावर आणीबाणी लादली तो दिवस म्हणजे २५ जून हा ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा सुप्रिया सुळे यांनी धिक्कार केला होता. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, जे ५० वर्षापूर्वी घडले, ज्यांनी आणीबाणी लादली देशाने त्यांना माफ केले आहे. ही पवार कुटुंबियांची खासियत आहे. सगळे नियम ते ठरवतात आणि बदलतात सुद्धा. ५० वर्षांपूर्वीची आणीबाणी आठवायची नाही, मात्र साडे तीनशे वर्षापूर्वी मूठभर ब्राह्मणांनी काय केले ते मात्र विसरायचे नाही आणि लोकांना विसरू द्यायचे नाही. ज्या गागा भट्टांनी महाराजांचा राज्याभिषेक केला ते ब्राह्मणच होते. ते काशीतून आले असले तरी मुळचे ते पैठणचे होते, याचा शरद पवारांना विसर पडतो.

पवारांना पुन्हा पुन्हा ब्राह्मण आठवतात त्याचे कारण भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हेच आहेत. त्यांच्यामुळे पवारांचा हा ब्राह्मण विरोध वारंवार उफाळून येतोय. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला मूठभर ब्राह्मणांनी विरोध केला तरी अनेक ब्राह्मण त्यांच्यासोबत प्राणाची बाजी लावून लढत होते. काही ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला तसा हिंदवी स्वराज्याला विरोध करणारे प्रत्येक जाती जमातीचे होते. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य निर्माणच होऊ नये म्हणून छत्रपतींचे अनेक नातेवाईक ज्यामध्ये भोसले, घोरपडे, शिर्के असे कित्येक होते, ते मुघल आणि आदीलशहाच्या बाजूने लढत होते. पवारांना त्यांची आठवण का होत नाही, हे कोडे आहे. अधर्वट इतिहास सांगून पवार महाराष्ट्रात कोणते ऐक्य निर्माण करू इच्छितात, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्तेवर असताना पवारांनी जी भूमिका वारंवार मांडली ती विरोधात असताना मांडण्यात त्यांना अडचण काय आहे. मागास वर्ग आणि मागास जनजाती वगळता आर्थिक निकष हाच आरक्षणाचा आधार हवा असे त्यांनी कित्येकदा ठणकावून सांगितले आहे. हीच भूमिका आज त्यांनी जाहीरपणे मांडली तर महाराष्ट्रात पेटलेला वणवा एका क्षणात शांत होईल. त्या वेळी घेतलेली भूमिका बाजूला ठेवून पवार आणि त्याच्या कन्या सुप्रिया अलिकडे मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लीमांना आरक्षण देण्याची मागणी करीत आहेत.

बदललेली भूमिका मांडण्यापूर्वी आपली पूर्वीची भूमिका चुकली होती, हे त्यांनी जाहीरपणे सांगितले पाहिजे. सत्ता काळात अशा अनेक समाजांना आपण आरक्षणापासून वंचित ठेवले हे त्यांनी सांगितले पाहिजे. त्या समाजांची जाहीर माफी मागा आणि त्यानंतर हवे तर ते सत्ताधाऱ्यांना शहाणपण शिकवा. सत्तेवर असताना आरक्षणाचा अधिकार नाकारायचा आणि विरोधात बसल्यावर पेटवापेटवी करायची हे त्यांचे धोरण आहे. त्यामुळे उद्या जर महाराष्ट्र मणिपूर सारखा धगधगला तर त्याची जबाबदारी कधी तळ्यात कधी मळ्यात भूमिका घेणाऱ्या पवारांसारख्या नेत्यांवर असेल.

महाराष्ट्रात सर्व जाती धर्मात ऐक्य व्हावे अशी फक्त विधाने करून ऐक्य निर्माण होत नाही. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर अशी भूमिका घेण्याची धमक लागते त्यासाठी. दहशतवादी इशरत जहाँसाठी पवार आणि त्यांचे चेले-चपाटे गळा काढत फिरत होते. तिला न्याय देण्यासाठी आवाज उठवत होते. त्यांच्या पक्षातील जितेंद्र आव्हाडांसारखे उठवळ नेते तिच्या स्मृती अजरामर करण्यासाठी तिच्या नावाने रुग्णवाहिका चालवत होते. ती इशरत दहशतवादी आहे, हे स्पष्ट झाल्यानंतरही पवारांनी आपली चूक मान्य केलेली नव्हती. एका धर्माच्या विरोधात, देशाच्या विरोधात दहशत निर्माण करणाऱ्यांच्या पालख्या आपण खांद्यावर नाचवल्या, त्याबद्दल त्यांनी कधी खेद वा खंत व्यक्त केली नाही.

हे ही वाचा:

ऑलिम्पिक २०२४; नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगला कांस्यपदक जिंकण्याची संधी !

“अनिल देशमुखांनी दाखवलेल्या फडणवीसांसोबतच्या फोटोला अर्थ नाही”

दिल्ली कोचिंग सेंटर मृत्यू प्रकरण : बुलडोजर कारवाईला सुरुवात

दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर नियमांचे उल्लंघन करणारे १३ कोचिंग सेंटर्स सील

इशरतच्या एन्काऊंटरनंतर मुस्लीम समाजाला न्याय मिळाला पाहिजे, असा ठणाणा करत अश्रू ढाळणारे उरणच्या यशश्री शिंदेबाबत मौन बाळगतात. एक वाक्याने तिची निर्घृण हत्या करणाऱ्या दाऊद शेख सारख्या पिसाळलेल्या जनावराचा निषेध करत नाहीत. यशश्री आणि इशरतच्या वयात फार फरक नाही. तरीही यशश्रीच्या हत्येचा एका वाक्यात हळहळ व्यक्त केली जात नाही की पवारांचे अश्रू आणि संवेदना फक्त मुस्लीमांसाठी राखीव आहेत? यशश्री हिंदू असल्यामुळे तिच्यासाठी अश्रू ढाळून मतं मिळणार नाहीत. उलट ती गमवावी लागतील. पवारांना जे सामाजिक ऐक्य हवे आहे ते असे आहे. त्यांचे सामाजिक ऐक्य दाऊद शेख सारख्या पिसाळलेल्या जनावरांमुळे धोक्यात येत नाही. ते फक्त ब्राह्मणांमुळे येते.

पवारांच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य धोक्यात आलेले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर जातीच्या नावावर वणवा पेटवण्याचा आरोप केलेला आहे. जेव्हा अशा प्रकारचे आरोप होतात तेव्हा समोरच्याची टवाळी करून पवार त्याला बगल देतात. परंतु महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही. पवार जे राजकारण करतायत ते कदाचित त्यांना अल्पकाळासाठी यश देऊ शकेल, परंतु शंभर वर्षांनंतर महाराष्ट्र त्यांची आठवण एक जातीयवादी नेता अशीच करेल. राज ठाकरे म्हणालेलेच आहेत, महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात पवारांनी हातभार लावू नये.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version