राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची संमती असो वा नसो, अजित पवार मुख्यमंत्री बनायला तयार आहेत. ते काय बोलले हे महत्वाचे आहे, परंतु ते कुठे बोलले हे त्याही पेक्षा जास्त महत्वाचे. मुख्यमंत्री पदावर दावा करण्यासाठी अजितदादांनी घरचेच मैदान निवडले. घरचे वर्तमानपत्र असलेल्या सकाळ समुहाला दिलेल्या मुलाखतीत दादांनी हा दावा केला, हे विशेष.
राजकारणी अनेकदा जे बोलतात ते करत नाही, करतात ते सांगत नाहीत. इथे मौनाचीही एक बोली आहे. अनेकदा इशाऱ्यांची किंवा संकेतांची भाषा वापरली जाते. शरद पवार असे ‘इशारो इशारों मे‘ बऱ्याच गोष्टी सांगण्यात माहीर आहेत. परंतु अजित पवार मात्र देधडक-बेधडक बोलतात.
लवकरच अजित पवार फुटणार या चर्चेत हा संपूर्ण आठवडा गेला. मी मरेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार अशी स्पष्टोक्ती करून अजितदादांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न तोकडा पडल्याचे चित्र आहे. पक्षातील अनेकांचा यावर अजून विश्वास बसत नाही. बोलले ते न करण्याची पवार घराण्याची परंपरा बहुधा ही चर्चा न थांबण्याचे एक मुख्य कारण असेल.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने उतरली आहे. पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे. या यादीत अजित पवारांचे नाव नाही. त्यामुळे अजितदादांचे पित्त चाळवण्याची पुनरावृत्ती होईल अशी दाट शक्यता आहे. थोरल्या पवारांनी पुन्हा एकदा अजितदादांना मापात राहण्याचा इशारा दिला आहे. मला पित्ताचा त्रास असल्यामुळे या कडक उन्हाळ्यात कर्नाटकमध्ये प्रचाराला जाऊ शकणार नाही, असे मीच आदरणीय पवारसाहेबांना सांगितले होते, त्यामुळे माझे नाव या यादीत नाही. असा खुलासा दादांकडून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अजित पवार प्रचंड खुलासेबाज झालेले आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी विक्रमी संख्येने खुलासे केलेले आहेत.
नुकतीच सकाळ समुहाने अजित पवारांची एक प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत दादा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल फार प्रेमाने बोलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्यांनी जे काही सांगितले ते ऐकण्यासारखे आहे. मोदींची लोकप्रियता, त्यांचा करीष्मा, जनतेचे त्यांना असलेले समर्थन सगळ्यात बाबतीत अजितदादांनी तोंड भरून कौतुक केले. जे अटलबिहारी वाजपेयी यांना जमले नाही ते पूर्ण बहुमताचे सरकार आणण्याचे काम मोदींच्या करिष्म्यामुळेच झाले हे त्यांनी जाहीरपणे मान्य केले.
हे काही पहिल्यांदा घडत नाही. पंढरपूरमध्ये तुकाराम शिळा लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान मोदी आणि अजितदादा यांच्यातील सौहार्द सगळ्यात पहिल्यांदा लोकांसमोर आले. थोरले पवार पंतप्रधान मोदींवर अनेकदा जहरी टीका करतात. उद्योगपती गौतम अदाणी यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतल्यानंतर संभ्रमात पडलेल्या यूपीएतील मित्र पक्षांना दिलासा देण्यासाठी पवारांनी गुजरात दंगलीतील आरोपींच्या झालेल्या सुटकेवरून मोदींवर काल अशी टीका केली होती. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात पवार बोलत होते. सुटका केली विशेष न्यायालयाने परंतु टीकेचे धनी झाले मोदी.
थोरल्या पवारांना असा समतोल साधण्याची सवय आहे. परंतु अजितदादा मोदींच्या विरोधात कधीच बोलत नाही. त्यांच्या डिग्रीच्या मुद्यावरून विरोधकांनी जो धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला, त्यावरही अजितदादांचे उत्तर विरोधकांना गप्प करणारे आहे. थोरल्या पवारांना नेमकी हीच बाब खटकत असावी म्हणून त्यांनी दादांना वेळोवेळी झटके देण्याचा प्रयत्न करतात. परंतु अजितदादा आता आवरण्यातले राहिलेले नाहीत. पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदाचे आपणच सगळ्यात प्रबळ दावेदार आहोत, हे त्यांनी सकाळ समुहाला म्हणजेच घरच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत ठणकावून सांगितले. २०२४ मध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहात का? या प्रश्नावर आता संधी मिळाली तर मी आताही तयार आहे, असे मिश्किल पण मनातले उत्तर त्यांनी दिले.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरचे सांगिओटे गाव ईद साजरी करणार नाही!
खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधी २० वर्षांनी सोडला बंगला
काळजी नको, लसीचे ५० ते ६० लाख डोस उपलब्ध !
साईभक्तानो शिर्डीत साईबाबाला हार, फुले अर्पण करा!
जो सक्षम आहे, ज्याच्या पाठी संख्याबळ आहे त्याच्याकडे नेतृत्व सोपवायला हवे, असेही ते या मुलाखतीत म्हणाले आहेत. त्यांचा संकेत स्पष्ट आहे. सवयीनुसार ते अत्यंत परखडपणे बोलले आहेत. मुख्यमंत्री पदासाठी पवारांच्या संमतीची वाट पाहणार नाही, क्षमता असलेल्याच संधी मिळेल, त्यांनी बिनदिक्कत सांगून टाकले आहे.
अजित पवारांचे अचानक गायब होणे, मोबाईल बंद ठेवणे, त्यांच्या नाराजीची चर्चा ही थोरल्या पवारांची स्क्रीप्ट आहे, असे अनेकांना वाटते. परंतु अजित पवार कोणाच्या नाचवण्याने नाचतील असे नेते आहेत, यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण वाटते. मनाला पटेल ते बोलणारा, वाटेल ते करणारा नेता अशी अजितदादांची ओळख आहे. ते थोरल्या पवारांचे बोट धरून राजकारणात आले, त्यांच्या तालमीत तयार झाले, तरी ते त्यांच्यासारखे नाहीत.
सत्तेसाठी वाट्टेल ते, हा थोरल्या पवारांचा मंत्र आहे. उद्या अजित पवारांना संधी मिळाली तर याच मंत्राचा हवाला देऊन ते त्याचे सोने करणार नाहीत, कशावरून? सत्तेचा मोह कुणाला सुटलाय, याच सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व खुंटीला टांगून ठेवले, याच सत्तेसाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खुंटीवर टांगले. त्यामुळे उद्या अजित पवारांनी काही वेगळा विचार केला तर त्यांना कोण दोष देऊ शकेल? त्यांना रोखण्याची क्षमता थोरल्या पवारांमध्ये नाही. आज वय अजितदादांच्या बाजूने आहे आणि थोरल्या पवारांच्या विरोधात. हे अजितदादांनाही माहिती आहे, त्यामुळे थोरल्या पवारांना काय वाटेल याची तमा न बाळगता ते मुख्यमंत्री पदावर बिनधास्त दावा करतायत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)