तुरुंगी सर्वसुखी असा कैदी नंबर ४६२२ आहे

तुरुंगी सर्वसुखी असा कैदी नंबर ४६२२ आहे

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यात गेली अडीच वर्षे वसुलीचा एक कलमी कार्यक्रम राबवण्यात येत होता. सध्या तुरुंगात असलेले मविआचे तीन नेते या भ्रष्टाचाराचा पुरावा आहेत. मविआच्या राजवटीत नेत्यांच्या जेलवारीचा शुभारंभ झाला तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापासून. त्यानंतर अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नबाव मलिक यांनी ऑर्थररोड तुरुंगात नंबर लावला. त्यांच्या पाठोपाठ आले शिवसेना नेते, खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत.

देशमुख १०० कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणी आत आले, मलिक दाऊद टोळीशी असलेल्या संबंधांमुळे गोत्यात आले. शिवसेना नेते राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी अटक झालेली आहे. तिघांच्या विरोधात प्रिव्हेन्शन ऑफ मनि लॉण्डरींग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुरुंगाची दुनिया वेगळी असली तरी तिथेही आम आणि खास असे वर्ग आहेत. सर्वसामान्य कैद्यांना रात्री पाठ टेकण्यापुरतीही जागा नसते. भयंकर चवीचे अन्न, गलिच्छ टॉयलेट असा सगळा मामला. पण
राजकीय नेते आणि उद्योजकांसाठी इथे खास बंदोबस्त आणि व्यवस्था आहेत. व्हीआयपी बॅरेक बांधण्यात आल्या आहेत. या बॅरेकमध्ये खिडकी, टीव्ही, पंखा, बेड, कमोड, वाचनासाठी पुस्तके, लिहीण्यासाठी कागद-पेन अशा सुविधा असतात. अन्य कैद्यांप्रमाणे त्यांना खेळायला कॅरमही दिलेला असतो. संजय राऊत हे हार्ट पेशंट असल्यामुळे त्यांना घरच्या जेवणाची मुभा देण्यात आली आहे. देशमुखांना मात्र घरचे जेवण नाकारण्यात आले आहे. कैदी क्रमांक ८९५९ हा राऊतांचा आणि देशमुखांना २२२५ हा क्रमांक देण्यात आला आहे.

पण यात सगळ्यात हुशार ठरले ते नवाब मलिक. मलिकांनी काही दिवस जेलमध्ये काढून स्वत:ची रवानगी हॉस्पिटलमध्ये करून घेतली. ते सध्या त्यांच्याच इलाख्यात म्हणजे कुर्ल्यात क्रीटी केअर हॉस्पिटलात मुक्कामाला आहेत. म्हणजे अगदी घराच्या बाजूला, स्वत:च्याच मतदार संघात. त्यामुळे हवी ती सुविधा त्यांना इथे उपलब्ध होऊ शकते.
पंचतारांकीत सुखांनी भरलेले आयुष्य जगणारे गुन्हेगार तुरुंग वाट्याला आल्यावर त्यातल्या त्यात बरी असलेली हॉस्पिटल जवळ करतात. इथे मनासारखे रीपोर्ट देणारे डॉक्टर उपलब्ध असल्यामुळे कितीही काळ मुक्काम ठोकता येतो. पैसे मोजले की काहीही उपलब्ध होऊ शकते. राज्य सरकारचे जे.जे. हॉस्पिटल तर यासाठी कुख्यात आहे. अनेक बडे मासे तुरुंगाला कंटाळून आजारपणाच्या नावाखाली इथे येतात आणि महिनोन महिने हलत नाहीत.

हे ही वाचा:

सीआयडी चौकशीतून विनायक मेटे यांच्या मृत्यूचे ‘गूढ’ उकलणार

पाकिस्तानात अत्याचाराचा कहर, विवाहाचा प्रस्ताव नाकारला म्हणून चाटायला लावल्या चपला

प्रफुल्ल पटेल यांना ‘किक’ मारण्याची वेळ

कांदे बटाटे… यांचे आणि त्यांचे !

नवाब मलिक यांनी ही आयडियाची जुनी कल्पना गेले दोन महिने तरी यशस्वीपणे वापरली आहे. राज्यात ठाकरे सरकार असताना ही मौज समजण्यासारखी होती कारण तेव्हा गुन्हेगारांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री सत्तेवर होते. पण आता राज्यात खांदेपालट झाल्यानंतरही तेच चित्र असणे पटत नाही.

ED ने देखील मलिक यांचा रिमांड मागितलेला आहे, परंतु ढासळलेल्या तब्येतीचे कारण देऊन मलिक हॉस्पिटलमध्ये मुक्काम ठोकून आहेत. त्यांना किमान सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे काम शिंदे – फडणवीस सरकारने तात्काळ करायला हवे. एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अलिकडे जात प्रकरणी अलिकडेच क्लीनचीट मिळाली. त्यानंतर त्यांनी मलिक यांच्याविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्हा प्रकरणी मलिकांची चौकशी करण्यासाठी त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी शक्यता आहे. परंतु ते होईल तेव्हा होईल तुर्तास मलिक क्रीटी केअरचा पाहुणचार भोगत आहेत.

गेल्या काही काळात ED जरा जास्तच सक्रीय झालेली आहे. महाराष्ट्रात अनेक बड्या नेत्यांची ED मार्फत चौकशी सुरू आहे. त्यामुळे नजीकच्या काळात इथे आणखी काही पाहुणे येण्याची शक्यता आहे. राजकीय नेते कैक आहेत, विजय मल्या, नीरव मोदी यांच्यासारखे लक्ष्मीपुत्रही रांगेत आहेत. ही बाब लक्षात घेऊन ऑर्थर रोड प्रशासनाने व्हीआयपी कैद्यांसाठी ९ नव्या बॅरेक बनवायला सुरूवात केली आहे. २०१९ मध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी भाजपा नेते मोहीत कंबोज यांनी एक ट्वीट करून राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता लवकरच देशमुख आणि राऊतांच्या भेटीला येणार असा दावा केला होता. कंबोज यांनी हा ट्वीट करण्यापूर्वी न्यूज डंकाने “ ऐका, राऊत प्रकरणी, पवारांच्या मौनाचे कारण…” या व्हीडीयोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना अटक होण्याची दाट शक्यता असल्याचा दावा केला होता.

पटेल तुरुंगात येतील अशी चर्चा आहे, कारण नवाब मलिक आणि त्यांनी केलेला अपराध सारखाच आहे. परंतु पटेल यांचा अपराध जास्त गंभीर आहे. जे कैदी सर्वसामान्य गुन्हे करून तुरुंगात येतात, त्यांच्या वाट्याला कोंडवाड्यातील गुरासारखे आयुष्य येते. तुरुंग म्हणजे त्यांच्यासाठी निव्वळ नरक यातना असतात. परंतु जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे, बड्या गँगस्टरशी संबंध असलेले राजकीय नेते येतात तेव्हा मात्र त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केल्या जातात. देशात लोकशाही आहे, पण पैसा आणि पत असल्याशिवाय ना बाहेर किंमत आहे, ना तुरुंगात.
ना बिवी ना बच्चा, ना बाप बडा न मैया सबसे बडा रुपय्या… या जागतिक सत्यावर विश्वास नसेल तर काही तरी सेटींग लावून एकदा तुरुंगाचे जग पाहायलाच हवे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version