राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा कोणताही पुरावा नाही

अजित पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर किंवा पक्षावर कधीही टीका केली नाही, त्यामुळे पक्षात फूट पडली, हे खरे नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा कोणताही पुरावा नाही

महिन्याभरापूर्वी अजित पवार भाजपा-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला होता. पक्षाचे नाव आणि निशाणी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाकडे याचिका केली होती. शरद पवार यांच्या गटाने याबाबत आयोगाला उत्तर दिले असून पक्ष फुटल्याचा कोणताही पुरावा नाही, अजित पवारांनाही तसे सिद्ध करता आलेले नाही असा युक्तिवाद केला आहे.

 

थोरल्या पवारांच्या उत्तरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये लुटूपुटूची लढाई सुरू आहे की काय, या चर्चेला ऊत आला आहे. महिन्याभरापूर्वी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. ३० जून रोजी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी आमदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. पक्षाच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४० पेक्षा जास्त आमदार अजित पवार यांच्याकडे आहेत, असा दावा केला जातोय. पक्षाध्यक्षपदी अजित पवार यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ चिन्ह मिळावे म्हणून अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे याचिका केली.

 

त्यावर शरद पवार यांच्या गटाने काल उत्तर पाठवलेले आहे. पक्षाचे नाव आणि निशाणी मिळावी म्हणून अजित पवारांनी केलेली याचिका अपरिपक्व आणि दुर्दैवी असल्यामुळे ही विनंती फेटाळून लावावी, असे थोरल्या पवारांच्या गटाने म्हटले आहे. परंतु पक्षात फूट पडल्याचा कोणताही पुरावा अजित पवार सिद्ध करू शकले नाहीत. निवडणूक आयोगाकडूनही तशी टिप्पणी करण्यात आलेली नाही. १ जुलै २०२३ पूर्वी अजित पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर किंवा पक्षावर कधीही टीका केली नाही, त्यामुळे पक्षात फूट पडली, हे खरे नाही. असे या उत्तरात म्हटले आहे.

 

शरद पवार गटाने जे उत्तर पाठवले आहे, त्यात अजित पवार यांच्यावर वा त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची कुठेही मागणी नाही. अर्थ स्पष्ट आहे की ही लुटुपुटूची लढाई अनंत काळ सुरू राहावी. त्यातून काहीच निष्पन्न होऊ नये अशी थोरल्या पवारांचीही इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट आज सत्तेत बसला आहे, एक गट मविआचा खांब बनून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांसोबत बैठका बैठका खेळतो आहे. एकाच पक्षाचे नेते दोन वेगळ्या भूमिकांमध्ये आहेत, तरी थोरले पवार म्हणतायत, पक्षात फूट पडल्याचा कोणताही पुरावा नाही.

 

निवडणूक आयोगानेही तसे काही म्हटले नसल्याचे या गटाचा दावा आहे. निवडणूक आय़ोगाने तसे कशाला म्हणायला हवे. आयोगाचे काम पुरावे तपासणे आणि निवाडा देणे. जसा त्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या तंट्यात दिला. तिथे ठाकरेंनी निदान त्या १६ आमदारांना अपात्र करा, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात केली होती. परंतु इथे तसेही काही दिसत नाही. पक्षात फूट पडली हेच मान्य नसल्यामुळे फुटीर गटावर कारवाईचा प्रश्न येतोच कुठे?

 

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टरस्ट्रोकने ठाकरेंना घरी बसवणारे मास्टर

मणिपूरमध्ये केंद्राकडून अतिरिक्त ८०० जवान रवाना

ऑस्कर विजेता माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’मधील कलाकारांचे पैसे बुडवले?

चांद्रयान लागले कामाला; चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले

अजित पवार गटालाही घाई नाही. हा आमचा पक्षांतर्गत मामला आहे. शरद पवार हेच दैवत आहे. त्यांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा एवढेच आमचे म्हणणे आहे, असे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल म्हणतायत. थोडक्यात काय, तर कोणालाच कोणावर कारवाई करण्याची ईच्छा नाही. दोन्ही गट शरद पवारांना मानणारे आहेत. तिढा फक्त सरकारमध्ये सामील व्हायचे की नाही एवढाच आहे. त्यावर शरद पवारांनी जालीम उपाय काढलेला दिसतोय. ज्यांना तिथे जायचे आहे, त्यांनी तिथे जावे, ज्यांना त्यांच्यासोबत राहायचे असेल त्यांनी इथे राहावे. पक्षात फूट पडलेली नाही असे म्हणत राहावे. दोन्ही हातात लाडू घेऊन खात राहावे.

थोरल्या पवारांचे हे जे काही चालले आहे, ते उद्धव ठाकरे यांच्या काळजाची धडधड वाढवते आहे. ठाकरेंचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या गच्चीवर साप सापडला होता. आज मातोश्रीच्या आवारात चक्क कोब्रा सापडला. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीची दारे खुली केल्याची खबर बहुधा त्याच्या पर्यंत पोहोचली असतील. कधी एकनाथ शिंदेंमुळे, कधी देवेंद्र फडणवीसांमुळे तर कधी पवारांमुळे ठाकरेंची झोप उडालेली आहे. त्यात आता सापाची भर पडली आहे. त्यामुळे अलिकडे उद्धव आणि आदित्य ठाकरे शरद पवारांबाबत कमी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल जास्त बोलत असतात. लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एका मंचावर आले होते. त्यामुळे ठाकरे काही काळ गपगार झाले. आता तर पवारांच्या भूमिकेमुळे त्यांची पार दातखीळ बसलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version