22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरसंपादकीय२८८ चा कात्रजचा घाट...

२८८ चा कात्रजचा घाट…

Google News Follow

Related

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. भंडाऱ्यात बोलताना त्यांनी काँग्रेस २८८ जागांवर निवडणूक लढवेल असे विधान केले आहे. उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही २८८ जागांवर तयारीला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. आमचाच मुख्यमंत्री असे दावेही दोन्ही पक्षांकडून सुरू झालेले आहेत. हे हाकारे नेमकी कोणाला जाळ्यात पकडण्यासाठी दिले जातायत? या मागे नेमकी कोणती रणनीती आहे?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १३ जागांवर यश मिळाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या लेकीने तेच मुख्यमंत्री बनणार असे जाहीर केलेले आहे. आदीत्य ठाकरे यांनीही महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, मुख्यमंत्री आपला हवा यासाठी निवडणूक महत्वाची, असे सांगतायत.

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मविआला संधी दिसते आहे. सत्ता आली तर त्याचा मोठा वाटा आपल्यालाच मिळायला हवा असे मविआतील दोन पक्षांचे प्रयत्न आहेत. शरद पवार मात्र सत्ता आल्याशिवाय त्यांचे पत्ते उघड करणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे दोघेही मुख्यमंत्री पदावर दावा करताना दिसत आहेत. स्बबळाची भाषा फक्त मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेतून बोलली जाते आहे का? या प्रश्नाचे उत्तर हो, नाही असे देता येत नाही. स्वबळावर लढण्याच्या आणि मुख्यमंत्री पदावर दावा करण्याच्या विधानांचा उपयोग मित्र पक्षांवर दबाव आणण्यासाठी होतोच. राजकीय विरोधकांनाही बेसावध ठेवता येते.

उद्धव ठाकरे आणि पटोले या दोघांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेपोटीच उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी काडीमोड घेतला होता. त्यांनी देशाच्या पंतप्रधान पदावर दावा केला खरा, परंतु आता पुढची पाच वर्ष तिथे काही संधी नाही. त्यामुळे किमान मुख्यमंत्री पद पुन्हा मिळावे अशी त्यांची इच्छा असणारच. काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोलेनांही मुख्यमंत्री पद हवे आहे. परंतु, त्यामुळे मविआमध्य संघर्षाची परीस्थिती निर्माण होण्याची शक्यता मात्र दिसत नाही. कारण एकत्र राहण्याचे फायदे त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले आहेत. तसेच भाजपाशी एकेकटे लढू शकत नाही याची जाणीव असल्यामुळेच ही आघाडी निर्माण झाली.

लोकसभा निवडणुकीत जागा वाटप जेवढे सोपे होते तेवढे विधानसभा निवडणुकीत नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दुय्यम भूमिका घेतली होती ती आता घेणे शक्य नाही. काँग्रेस ६४ विधानसभा मतदार संघात आघाडीवर तर ३७ मतदार संघात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उबाठा शिवसेना ५४ मतदार संघात आघाडीवर आणि ६१ मतदार संघात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष किमान ११० ते ११५ जागांवर दावा करण्याची शक्यता आहे. जागा वाटपाच्या आधीच मित्र पक्षांवर दबाव आणण्यासाठी २८८ च्या घोषणा केल्या जातायत.

लोकसभा निवडणुकीच्या काळात नेमके काय झाले ते आठवून पाहा. नाना पटोले स्वबळाच्या ताना छेडत होते. एकदा नाही अनेकदा त्यांनी स्बबळावर लढण्याची घोषणा केली. उबाठा शिवसेनेचे नेतेही जागांच्या मुद्द्यांवरून ताणतायत, असे चित्र दिसत होते. प्रत्यक्षात त्यांची चर्चा व्यवस्थित सुरू होती. बाहेर फक्त हाणामाऱ्या सुरू आहेत, असे चित्र दिसत होते, किंवा तसे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत होते. लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेस स्वबळावर लढणार आणि उबाठा शिवसेना आणि शरद पवार एकत्र लढतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. असे काही तरी होईल या आशेवर महायुतीचे नेतेही होते. जर असे झाले असते तर निकाल काही वेगळाच लागला असता. परंतु कोणत्याही परीस्थितीत भाजपाविरोधी मतांमध्ये फाटाफूट होणार नाही याची काळजी तिन्ही पक्षांनी घेतली.

हे ही वाचा..

ठाण्यातून ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेविका मुख्यमंत्री शिंदेच्या गटात सामील!

सिक्कीममध्ये भूस्खलन होऊन १२०० हून अधिक पर्यटक अडकले; नऊ जणांचा मृत्यू

आगीच्या अफवेवरून ट्रेनमधील प्रवाशांनी मारल्या उड्या, तिघांचा मृत्यू!

‘जी ७ शिखर परिषदेत सहभागी होऊन पंतप्रधान मोदी मायदेशी परतले’, ‘इटलीचे मानले आभार’!

ही रणनीती लोकसभा निवडणुकीत यशस्वीपणे वापरल्यानंतर ती पुन्हा एकदा वापरण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पुन्हा तेच चित्र दिसू लागले आहे. बाहेरुन हाणामाऱ्या दाखवायच्या आणि आत बसून भक्कम आघाडी निर्माण करायची. मविआत फूट पडण्याची शक्यता दिसत नाही. कितीही तडजोडी कराव्या लागल्या तरी मविआ एकत्रितपणे विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करणार. शरद पवार हे घडवून आणतील. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना स्वबळाच्या घोषणेने कात्रजचा घाट दाखवला होता. पुन्हा ते या खेळीला दाद देतील असे वाटत नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा