29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरसंपादकीयधमक्या देण्याचा अधिकार फक्त मविआच्या नेत्यांना

धमक्या देण्याचा अधिकार फक्त मविआच्या नेत्यांना

सभ्यतेच्या मर्यादा ओलांडण्याची परंपरा राज्यात शिंदे-फडणवीसांची सत्ता आल्यावर सुरू झालेली नाही. ती महाविकास आघाडीची सत्ता असतानाच सुरू झाली.

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्वीटरवरून आलेल्या धमकीनंतर त्यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली आहे.  ‘पवारांना काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्याच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांवर आहे’, असा इशारा त्यांनी दिला आहे.  ‘नेत्यांना धमक्या दिल्यास खपवून घेणार नाही’, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर दिली आहे. राज्यात धमक्यांचा सिलसिला सुरू झाला आहे.

 

पवारांना ‘तुमचा दाभोलकर होईल’, अशी धमकी आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. ‘पवारांना काही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्याच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांवर असेल’ असे सुळे म्हणाल्या. राज्यात गेल्या काही महिन्यात दडपशाही आणि गुंडगिरी वाढली असल्याचा दावाही त्यांनी केला.

 

त्यावर फडणवीसांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘महाराष्ट्राची उच्च राजकीय परंपरा आहे, राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी देणे आणि समाजमाध्यमांवर व्यक्त करताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे खपवून घेतले जाणार नाही’, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. पवार आणि संजय राऊत यांना एकाच वेळी धमकी आली आहे. ‘सकाळचा भोंगा बंद करायला सांग, नाही तर गोळ्या घालू’ अशी धमकी संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना आलेली आहे. काही दिवसांपूर्वी राऊत यांना अशीच धमकी आली होती. धमकी देणारा बेवडा होता, असे नंतर उघड झाले.

 

धमकी देणाऱ्यांवर फडणवीस कारवाई करतीलच, परंतु ते पुढे जे काही म्हणाले आहेत ते महत्वाचे आहे.  ‘समाजमाध्यमांवर सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे खपवून घेणार नाही’, असे त्यांनी सांगितले आहे. सभ्यतेच्या मर्यादा ओलांडण्याची परंपरा राज्यात शिंदे-फडणवीसांची सत्ता आल्यावर सुरू झालेली नाही. ती महाविकास आघाडीची सत्ता असतानाच सुरू झाली. फडणवीस विरोधी पक्षनेते होते, त्यांचे ट्रोलिंग सुरू झाले. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही, परंतु त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर सुरू झाला. समाज माध्यमांवर भाजपाची बाजू मांडणाऱ्यांनाही धमक्यांचा प्रसाद मिळू लागला. मविआच्या सरकारच्या काळात ट्रोलर गँग सोकावलेली असताना पोलिसांची कारवाई फक्त भाजपा समर्थकांवर होत होती. सुनैना होले, निखील भामरे, समीत ठक्कर, अशी अनेक नावे सांगता येतील.

 

सत्तेचा वरवंटा राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी फिरवला होता. पोलिसही त्यात सामील होते. हा वरवंटा इतका भयंकर होता की भाऊ तोरसेकर यांच्यासारखा ज्येष्ठ पत्रकार त्यातून सुटला नाही. भाऊंनी शरद पवारांवर एक व्हीडीयो केला होता. त्या व्हीडीयोच्या खाली आलेल्या एका कॉमेंटवरून शरद पवारांच्या हत्येचा कट केल्याची तक्रार शिवाजी नगर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.  एका बाजूला ट्रोलर गँग सक्रीय असताना, पोलिस एकतर्फी कारवाई करत असताना संजय राऊत यांच्यासारखे नेते तोंडाचा पट्टा चालवत होते.

हे ही वाचा:

आठ लाखांची लाच घेताना आयएएस अधिकाऱ्याला पकडले

इजिप्तमध्ये पर्यटकाला शार्कने नेले पाण्यात ओढून; व्हायरल व्हीडिओमुळे थरकाप

चित्रा वाघ संतापल्या, आव्हाड नाही…हाड हाड!

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत महिन्याभरात १६३ मुले पुन्हा कुटुंबीयांकडे परतली!

‘सौ दाऊद एक राऊत’, असा लौकीक सांगणारा हा नेता, ज्याने गुवाहाटीवरून ४० प्रेतं येतील असे अत्यंत हिंसक आणि वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या नेत्याला ही धमकी आलेली असल्यामुळे प्रकरण गंभीर आहे. हे तेच राऊत आहेत, ज्यांनी किरीट सोमय्या यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याची खिल्ली उडवली होती. जखमी झालेले सोमय्या टोमॅटो सॉस लावून आले होते, अशाप्रकारचे वक्तव्य केले होते. कांदिवलीतील एका नौदल अधिकाऱ्याला मविआच्या गुंडानी मारहाण केलेली तेव्हा राऊतांनी त्याचे समर्थन केले होते.

 

मविआ सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड राऊतांच्या एक पाऊल पुढे होते. त्यांनी तर अपहरण आणि मारहाणीपर्यंत मजल मारली.  हा माज शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यानंतरही कायम आहे. हे दोन नेते मोकाट सुटलेले आहेत. कॅमेराच्या समोर शिवीगाळ करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. राऊत-आव्हाडांचे वर्तन लोकांना शिसारी आणणारे आहे. आज पेरलेले जेव्हा उगवले आहे, तेच लोक धमकी, धमकी म्हणून थयथयाट करतायत. परंतु मविआच्या राज्यात नेते आणि कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला असेल तर शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात तेच होऊन कसे चालेल? मविआच्या अडीच वर्षांच्या काळात ठाकरे सरकारची ठोकशाही जनतेने अनुभवली आहे. परंतु शिंदे-फडणवीसांच्या राज्यात तोच कोळसा उगाळला जाऊ नये, कायद्याचे राज्य असावे अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे.

 

फडणवीसांनी केवळ सुप्रिया सुळे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही, त्यांनी एक गर्भित इशाराही दिलेला आहे. ते जर असे सांगत असतील की, सभ्यपणाच्या मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई होईल तर त्याचा त्रास जास्त मविआच्या ट्रोलर्सना जास्त होणार आहे. आजही सत्ताधारी पक्षाचे आमदार असो वा कार्यकर्ते यांना गलिच्छ भाषेत ट्रोल करण्याचे काम सुरू आहे. ट्रोल करणारी ७० टक्के अकाऊंट फेक असतात. या ट्रोलिंगमधून महिलाही सुटत नाही.

 

आता शरद पवारांवर ज्या बातमीवरून टीका सुरू झाली त्या चॅनलने आता दिलगिरी व्यक्त केली आहे. पण शरद पवार जे काही म्हणाले ते कसं काय पुसता येईल. पवारांचे शब्द ऐका, ‘आमच्या सहकाऱ्याने सांगितले की मला समृद्धी मार्ग पाहायचा आहे, त्या रस्त्याने आम्ही औरंगाबादला आलो, त्यानंतर पॉझ घेऊन पवार म्हणाले संभाजी नगर वाद वाढवायचा नाही मला’. वाद वाढवायचा नाही म्हणत पवारांनी वाद निर्माण केला. राज्य सरकारने औरंगाबादचे नामांतर केले असताना पवारांना औरंगाबाद म्हणावेसे वाटते. यह रिश्ता क्या कहलाता है?

 

औरंगजेबाबाबत मनात प्रचंड चीड आणि संताप असलेले लोक महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या दुसऱ्या छत्रपतींना हाल हाल करून मारणारा हा क्रूरकर्मा अनेकांच्या डोक्यात जातो. त्यामुळे जेव्हा शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केले तेव्हा अनेकांना समाधान वाटले. पवारांना ही भावना माहीत नसेल असे नाही. ते काय उद्धव ठाकरेंसारखे घरी बसून नसतात, सतत फिरत असतात, त्यामुळे जनतेची नाडी त्यांना अचूक ठाऊक असते. तरीही त्यांनी पुन्हा औरंगाबादच म्हणावे याला काय अर्थ आहे. बोली भाषेत याला काडी करणे म्हणतात. परंतु राजकीय नेत्यांनी डोक्यात कायम राजकारण ठेवून काहीही म्हटले तर जनतेने सुसंस्कृतपणेच व्यक्त झाले पाहिजे. मर्यादा ओलांडता कामा नये, या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा