23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरसंपादकीयमविआला ‘गडकरी प्रेम’ सिद्ध करण्याची संधी

मविआला ‘गडकरी प्रेम’ सिद्ध करण्याची संधी

Google News Follow

Related

मविआची सत्ता गेल्या पासून उबाठा गटाच्या नेत्यांमध्ये बेताल बोलण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यांचे नेतृत्वही उद्धव ठाकरेच करतायत. ‘ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय परीवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तिकीटासाठी दिल्ली समोर झुकू नये. मविआच्या सोबत यावे आम्ही त्यांना जिंकून आणतो’, अशी बडबड ठाकरे गेले काही दिवस करतायत. ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’, असा आव आणतायत. नागपूरमधून गडकरींना तिकीट मिळणार याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. हे ‘गडकरी प्रेम’ सिद्ध करण्याची संधी नागपूरकरांनीच मविआला दिलेली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज त्यांच्या सभांमधून किंवा पत्रकार परिषदांमधून उंच उंच पतंग बदवत असतात. कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी हे आवश्यकही असते. परंतु स्वप्नरंजन आणि वास्तव यात फरक असतो. वस्तुस्थिती काय हे सर्वांना ठाऊक आहे. जिथे ठाकरेंची मातोश्री आहे, त्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघात पक्षाचा उमेदवार निवडून आणणे त्यांना झेपत नाही. तिथे झिशान सिद्दीकी निवडून येतो. ते ठाकरे नागपूरमधून गडकरींना जिंकून आणण्याची भाषा करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार…’ ची घोषणा दिलेली आहे. सर्व पक्षातील दमदार नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जातोय, तो याच घोषणेच्या पूर्ततेसाठी. भाजपाला राजीव गांधीनी यांनी केलेला ४१४ जागांचा विक्रम मोडीत काढायचा आहे. अशा वेळी नितीन गडकरी यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्याचे तिकीट कापून एक हक्काची जागा धोक्यात आणण्याचे धंदे भाजपाचे केंद्रीय नेतृत्व कशाला करेल?

महाराष्ट्र भाजपाची लोकसभा निवडणुकीची यादी जाहीर झाली असती आणि त्यात जर गडकरींचे नाव नसते तर विषय वेगळा होता. मित्र पक्षांसोबत वाटाघाटी संपल्यानंतरच ही यादी जाहीर होईल. वाटाघाटी पूर्ण झालेल्या नसताना उमेदवार जाहीर करायला महायुती म्हणजे मविआ थोडीच आहे. काँग्रेसला खुंटीला टांगून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा आपापले उमेदवार जाहीर करीत आहेत. महायुतीने मात्र ही शिस्त पाळलेली दिसते. गडकरींना उमेदवारी मिळणार याबाबत कुणाच्या मनात शंका नाही. महाराष्ट्राच्या यादीत त्यांचे नाव शंभर टक्के दिसणार आहे.

ठाकरेंचा दावा म्हणजे बालिशपणा असल्याचे मत व्यक्त करून गडकरींनी त्यांचे दात घशात घातले आहेत. दुसऱ्या बाजूला नागपूरकरांनी पाचर मारली आहे. नितीन गडकरी यांनी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात देशभरात खूप मोठे काम केलेले आहे. त्यामुळे ते बिनविरोध लोकसभेत जावे यासाठी नागपूरातील काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना हे आवाहन केलेले आहे. गडकरी यांचे नागपुरात मोठे काम आहे. त्यामुळे समोर कोणीही उभा राहिला तरी ते जिंकून येणार हे नक्की. परंतु आता नागपूरकरांच्या आवाहनामुळे ठाकरे अडचणीत येणार आहेत. आमच्याकडे या तुम्हाला जिंकून आणतो असे ठाकरेंनी जाहीरपणे सांगितले आहे. मोदी कसे गडकरींचे तिकीट कापायला निघाले आहेत आणि आपल्याला मात्र गडकरींच्या प्रेमाचे कसे भरते आले आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केलेला आहे.

कधी काळी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या शिवसेना नेत्यांना रोज उठून लाखोली वाहणाऱ्या ठाकरेंचे गडकरी प्रेम इतके ऊतू का जाते आहे, हे जगाला ठाऊक आहे. हे प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे, ही बाब उघड करण्याचा चंग नागपूरकरांनी बांधलेला आहे. नागपूरच्या जनतेने गडकरींना बिनविरोध लोकसभेवर पाठवा असे आवाहन केलेले आहे. मविआचे नेते हे आवाहन मनावर घेतील काय?

हे ही वाचा:

अहमदनगर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

ऑनलाइन ट्रोलिंगनंतर तरुणीने रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले!

शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!

मतदारांशी संपर्क साधण्यात राहुल गांधींकडून चूक

एका चॅनलला दिलेल्या ताज्या मुलाखतीत गडकरी यांनी ठाकरे कुटुंबियांबाबत त्यांच्या भावना सविस्तर बोलून दाखवल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दिलदार व्यक्तिमत्व होते. त्यांचे आपल्यावर प्रेम होते. सध्या भाजपा आणि ठाकरे यांच्यात वितुष्ट आलेले असले तरी आपले आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध आहेत, आजही त्यांच्याशी संवाद आहे, असे गडकरी म्हणाले. तेच गडकरी ठाकरेंच्या ऑफरला हास्यास्पद म्हणाले. याचा अर्थ व्यक्तिगत संबंध आणि राजकारण वेगळे आहेत, हे गडकरींना माहिती आहे. उद्धव ठाकरे व्यक्तिगत संबंधातही राजकारण करतात हेही त्यांना ठाऊक असावे. त्यामुळे लबाडाघरचे हे आवताण गडकरींनी साफ फेटाळून लावले.

गडकरींना गुळ लावण्याचा प्रयत्न फक्त उद्धव ठाकरे करतायत अशातला भाग नाही. सुप्रिया सुळे यांनीही अनेकदा गडकरींवर स्तुतीसुमनांची उधळण केलेली आहे. विरोधक जेव्हा गडकरींचे कौतुक करतात त्यात गडकरींच्या कर्तृत्वाचा भाग आहेच, शिवाय दगडापेक्षा वीट मऊ ही भावनाही आहेत. मोदी विरोधकांना इतके टोचतायत, त्या तुलनेत गडकरी त्यांना गोड गुलकंद वाटले तर त्यात आश्चर्य ते काय? गडकरींचे वाटणारे कौतुक प्रामाणिक आहे, हे सिद्ध करण्याची संधी त्यांना नागपूरकरांनी दिलेली आहे. गडकरींना बिनविरोध लोकसभेत पाठवण्याची मागणी नागपूरकरांन केलेली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी ती मनावर घ्यावी.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा