आज १० जून आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता होती. आजच्याच दिवशी ठाकरे सरकारची भाकरी करपायला सुरूवात होती. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अफाट रणनीतीमुळे गेल्या वर्षी राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे सहावे उमेदवार धनंजय महाडीक अनपेक्षितरीत्या विजयी झाले होते. पुढे विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआचा डोलारा पूर्णपणे कोसळला आणि शिंदे-फडणवीस सरकारचा मार्ग प्रशस्त झाला. आश्चर्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्यासाठी शरद पवारांनी आजचाच मुहूर्त निवडला.
मविआ सरकारच्या काळातील पक्षीय बलाबल जर लक्षात घेतले तर चुरस होती ती राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी. अपक्षांच्या मदतीने शिवसेनेचा सहावा उमेदवार निवडून आणणार अशी भीमगर्जना मविआचे चाणक्य संजय राऊत यांनी केली होती. परंतु सगळ्या चाणक्यांना आणि रणनीतीकारांना उताणे पाडत फडणवीसांनी धनंजय महाडीक यांना विजयी केले. शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. मविआची ९ मतं या निवडणुकीत फुटली. पुढे विधान परिषदेच्या निवडणुकीतही फडणवीसांनी मविआला झटका दिला. परीषदेच्या निवडणुकीच्या दिवशीच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ४० आमदारांचा सुरत, गुवाहाटी हा प्रवास सुरू झाला.
वर्षभरापूर्वीचा हा इतिहास सांगण्याचे कारण इतकेच की मविआच्या कारकिर्दीत १० जून २०२२ हा दिवस हा काळा दिवस होता. याच दिवशी मविआत फूट पडायला सुरूवात झाली. त्याचे पर्यावसान पुढे मविआचे सरकार गाळात जाण्यात झाले. योगायोगाने १० जून हा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. आज या पक्षाने २५ वा स्थापना दिवस दिल्लीत साजरा केला. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेश जन्माचा मुद्दा पेटवत राष्ट्रवादी काँग्रेस या नावाने वेगळी चूल मांडली. त्याच वर्षी ते सोनियांच्या पक्षाशी आघाडी करून सत्तेवर आले, ते आजतागायत त्यांच्यासोबत आहेत.
पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता आता रद्द झालेली आहे. हा केवळ एक प्रादेशिक पक्ष आहे. परंतु दिल्लीत पक्षाचे अधिवेशन वा बैठक घेतल्यावर पक्ष राष्ट्रव्यापी असल्याचा आभास निर्माण करता येतो. त्यामुळे पवारांच्या पक्षांची अधिवेशन बैठका दिल्लीतच होतात. त्यामुळे २५ व्या स्थापना दिवसाचा सोहळा दिल्लीत असणे स्वाभाविक होते. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राजीनामा दिला होता. पुढे हा राजीनामा मागेही घेतला. परंतु अखेर आज पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी भाकरी फिरवली. वर्षभरापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मविआची भाकरी करपवली होती, तोच हा दिवस. भाकरी फिरवण्यासाठी तोच मुहूर्त योजला.
पवारांनी दिल्लीत आज दोन मोठ्या घोषणा केल्या. प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी केली. कार्यकारी अध्यक्ष पदावर दोन जणांची नियुक्ती करण्याचा पहिला मानही बहुधा पवारांकडे गेला आहे. कारण कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षपदी आणि कार्याध्यक्षपदी एकच नेता असतो अशी आजवरची परंपरा आहे. परंतु पवार हे पुरोगामी असल्यामुळे त्यांचा परंपरेशी काही संबध नाही. त्यामुळे त्यांनी कार्यकारी अध्यक्ष पदावर दोघांची नियुक्ती केली. प्रफुल पटेल या पदावर का? या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांच्या अत्यंत जवळचा, विश्वासू आणि मर्जीतला माणूस कोण याचे उत्तर प्रफुल पटेल हेच आहे. पवार हे उद्योगपतींमध्ये रमणारे नेतृत्व आहे. पटेल हा पवार आणि उद्योगपती यांच्यातील दुवा आहे.
केंद्रात यूपीएचे सरकार असताना पवारांच्या कृपेमुळेच प्रफुल पटेल केंद्रीय मंत्री झाले होते. पटेल हे पवारांचे हमराज आहेत. पवारांची कुंडली पटेलांकडे आहे. त्यामुळे सुप्रिया यांच्यासोबत त्यांचीही कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. अजित पवार यांच्यासाठी हा काळा दिवस. वर्षभरापूर्वी जशी मविआची भाकरी करपली होती, तशी ती आज अजित पवारांचीही करपली. सुप्रिया यांची कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती करून पवारांनी पक्षाची सूत्र अप्रत्यक्षरित्या त्यांच्या हाती सोपवत असल्याचे संकेत दिलेले आहेत. राज्यातील निवडणुकांची जबाबदारी त्यांनी सुप्रिया यांना सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्राच्या साडेतीन जिल्ह्यातील पक्ष त्यामुळे राज्यातील निवडणुकीची जबाबदारी सुप्रिया यांच्याकडे सोपवून पवारांनी त्यांच्या ताब्यात पक्षाच्या किल्ल्या दिलेल्या आहेत.
हे ही वाचा:
घनदाट जंगलात ११ महिन्यांच्या बाळासह ४० दिवसानंतरही ४ मुले राहिली जिवंत
शरद पवारांनी नेहमीप्रमाणे अजित पवारांना डावललं?
तप्रधान योजनेला बदनाम करण्यासाठी जेवणात टाकला होता साप
पाठीवरील बॅगच्या सहाय्याने त्याने विकृताला पळवले, मॅक्रॉन खुश झाले
अजित पवार यांना हा धक्का असला तरी तो अनपेक्षित नाही. थोरले पवार गेले काही दिवस याचीच तयारी करत होते, हे अजित पवारांना ठाऊक होते. त्यामुळे पवार जी भूमिका घेतील त्याच्या बरोबर विरुद्ध भूमिका घेऊन अजित पवारही संकेत देत होते. थोरल्या पवारांनी राजकारणाच्या सारीपाटावर त्यांचे फासे फेकले आहेत, आता पाळी अजित पवारांची आहे. क्षमतेच्या निकषावर अजित पवार हे कधीही सुप्रिया सुळे यांना वरचढ आहेत, हे थोरल्या पवारांनाही ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या हयातीत हा निर्णय घेऊन टाकला. त्यामुळे आता अजित पवार यांच्याकडे आता मर्यादित पर्याय आहेत. सुप्रिया यांच्या नियुक्तीमुळे नाराज नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.
थोरल्या पवारांचा निर्णय मान्य करून त्यांना सुप्रिया यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करावी लागेल. हा पर्याय सोपा आहे. दुसरा पर्याय स्वत:चे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी पावले टाकावी लागतील. हा पर्याय धोकादायक आणि अजित पवारांचा कस पाहणारा ठरेल. गेल्या १० जूनला मविआच्या फुटीची बीजे पडली होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसला तडा जाईल असा निर्णय पवारांनी जाहीर केलेला आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)