गौप्यस्फोटांना ऊत… मविआचे सरकार अदानींनी पाडले; पवारांच्या पाठिंब्याने?

मविआचे सरकार शहीद झाले, त्या मागे धारावीचा पुनर्विकासच होता

गौप्यस्फोटांना ऊत… मविआचे सरकार अदानींनी पाडले; पवारांच्या पाठिंब्याने?

उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणजे असा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे, जिथे दर सेकंदाला गौप्यस्फोट होत असतात. हे रोज उठून इतके गौप्यस्फोट करताय की लोकांना वात यायला लागलाय. मविआचे सरकार उद्योगपती गौतम अदानी यांनी पाडले, असा नवा गौप्यस्फोट राऊतांनी केलेला आहे. हे सरकार अदानींना अडचणीचे होते, असा दावा त्यांनी केलेला आहे. राऊत बोलतायत ते सत्य आहे असे मानले, तर त्याचे दोन अर्थ निघतात. एक मविआ सरकार पाडण्यात शरद पवारांचा सहभाग तरी होता किंवा हे सरकार कोसळण्यास त्यांना काही हरकत तरी नव्हती.

धारावीचा प्रकल्प दोघांच्या मतभेदाच्या केंद्रस्थानी होता, असे मानायला वाव आहे. ईडी आणि सीबीआयचा वापर करून भाजपाने महाराष्ट्रातील मविआ सरकार पाडले असा दावा संजय राऊत यांनी वारंवार केला. खरे तर मविआतील अनेक नेत्यांनी हा दावा केला आहे. बहुधा त्यातली गंमत संपली असावी म्हणून त्यांनी ईडीला बाजूला केले. अदाणी नावाचा नवा खलनायक मैदानात उतरवला. राहुल गांधी वारंवार दावा करतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अदाणी यांच्याशी घट्ट संबंध आहेत. प्रत्यक्षात अदाणी आणि पवार यांचे जास्त घट्ट संबंध आहेत. त्यांच्या सतत होणाऱ्या गाठीभेटींवरून तरी तसेच म्हणावे लागले.

जुलै २०२२ मध्ये मविआ सरकार कोसळल्यानंतरही शरद पवार आणि अदाणी यांची वारंवार भेटत होते. २०२३ मध्ये अदाणी यांच्या अहमदाबादेतील कार्यालयात, एकदा पवारांच्या बारामतीत आणि दोन वेळा सिल्व्हर ओक निवासस्थानी दोघांच्या गाठीभेटी झाल्या. या सगळ्या बैठका प्रदीर्घ होत्या. सुनियोजित होत्या, एकही भेट निसटती झालेली नाही. त्यामुळे अदाणींनी जर सरकार पाडले असेल तर ते पवारांना विश्वासात घेऊनच पाडले असण्याची शक्यता आहे.

 

पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीमुळे झाला होता. या शपथविधीच्या आधी झालेल्या बैठकीत भाजपा नेत्यांच्या सोबत गौतम अदाणी होते. दिल्लीतील अदाणी यांच्या निवासस्थानीच ही बैठक झाली होती, अशी नवी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर आणल्यानंतर राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. खरे तर पहाटेचा शपथविधी हा घासून गुळगुळीत झालेला विषय आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, अजितदादा, प्रफुल पटेल, स्वत: शरद पवार या विषयावर इतकं बोलले आहेत की महाराष्ट्रातील जनतेला त्याचे अपचन झालेले आहे. त्यात अदाणींचे नाव घेऊन अजितदादा यांनी तडका लावला एवढेच.

हे ही वाचा:

व्ही. एन. देसाई रुग्णालयात प्रसुतीनंतर आई, नवजात मुलाचा मृत्यू

शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवारांचे!

ट्रम्प टीममधील भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी आहेत कोण?

जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!

अदाणींना मविआचे सरकार नको होते कारण त्यांना मुंबई, महाराष्ट्र विकत घ्यायचा होता, ओरबाडायचा होता. म्हणून आधी त्यांनी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडला असा राऊतांचा नवा दावा आहे. हा दावा एक तर निव्वळ बकवास आहे किंवा मविआचे सरकार गडगडवण्यात शरद पवारांचाही हात होता हे सत्य आहे. कारण मविआच्या सत्ताकाळात ठाकरे आणि पवारांमध्ये जे प्रमुख मतभेद होते, त्यात अदाणी हा एक महत्वाचा विषय होता.

शरद पवारांना उद्धव ठाकरे यांचा किती ताप झाला होता हे त्यांनी ‘लोक माझे सांगाती’च्या दुसऱ्या आवृत्तीत अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. ठाकरेंच्या कुवतीपासून त्यांच्या तुटपुंज्या अनुभवाबाबत पवार सविस्तर बोलले आहेत. राऊतांचे मानावे तर डोक्याला झालेला ठाकरेंचा ताप जावा म्हणून अदाणींच्या माध्यमातून पवारांनी आधी मविआचा बाजार उठवला आणि नंतर अजित पवारांना तिथे पाठवले असे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मविआचे सरकार पडल्यानंतरही अदाणी आणि पवार यांचे मेतकूट कायम राहिले. या दोघांच्या नात्यातील गोडवा स्पष्ट करणारी अनेक उदाहरणे आहेत.

सरकार पडल्यानंतर बारामतीत अदाणींचे झालेले आगमन. त्यावेळी रोहित पवारांनी केलेले ड्रायव्हिंग, सुप्रिया सुळे यांच्या मालमत्तेच्या यादीत अदाणींच्या शेअर्सची लंबीचौडी यादी. अदाणींनी पवारांच्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेला २५ कोटींची देणगी दिली. बारामतीतील रोबोटीक लॅबच्या उद्घाटन सोहळ्यात पवारांनी या देणगी बाबत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अदाणींचे आभार मानले. पवार आणि अदाणी यांचे संबंध किती घनिष्ट आहेत हे सांगणारा हा दिवस होता २४ डिसेंबर २०२३चा. याच्या ठीक एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांनी अदाणींच्या धारावी पुनर्विकास योजनेवर तोफ डागली होती. ठाकरेंच्या टिकेला फार भीक न घालता शरद पवार अदाणींच्या गळ्यात गळे घालत होते.

काँगेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झोड उठवण्यासाठी अदाणींशी त्यांच्या संबंधांना लक्ष्य केले होते. त्यावेळीही पवार यांनी अदाणी यांची बाजू घेतली. मी विकास विरोधी नाही, असे सांगत राहुल गांधी यांना चपराक लावली. ठाकरे आणि अदाणी यांच्यात जी ठिणगी उडाली आहे, ती धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून. ठाकरेंचा या प्रकल्पाला विरोध आहे. जुलै २०२२ मध्ये मविआचे सरकार कोसळले. त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे २१ सप्टेंबर रोजी अदाणी यांनी ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्य सुमारे तासभर चर्चा झाली होती. त्यानंतरही ठाकरे यांचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध राहिला याचा अर्थ स्पष्ट आहे की या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही.

ठाकरे या प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरले. पुन्हा सत्तेवर आलो तर हा प्रकल्प रद्द करू असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले. धारावी विकास प्रकल्प हा मुंबईतील सर्वात मोठा प्रकल्प असून त्याचा अर्थ सुमारे २० हजार कोटी रुपये आहे. त्याचा पहिला टप्पा ५४४९ कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पावरून जी हाणामारी होते आहे त्याच्या मुळाशी प्रकल्पाचे हे आर्थिक जडत्वच आहे. राजकारणात अशक्य काहीच नसते. शरद पवार कळायला शंभर जन्म लागतील हे संजय राऊतांचे विधान आहे. अजित पवार असे म्हणाले होते की पवारांच्या मनात काय आहे, हे कुणालाही कळू शकत नाही. दोघांनी त्यांच्या त्यांच्या विधानातून आपापले अनुभव सांगितले असण्याची शक्यता आहे. मविआचे सरकार शहीद झाले, त्या मागे धारावीचा पुनर्विकासच होता या गौप्यस्फोटाची जनता वाट पाहते आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version