मविआतील जागा वाटपाच्या पूर्णविरामानंतर स्वल्पविराम

स्थानिक नेत्यांचा कडेलोट करत काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी सांगलीची जागा उबाठासाठी सोडली

मविआतील जागा वाटपाच्या पूर्णविरामानंतर स्वल्पविराम

महाविकास आघाडीचे जागावाटप आज अखेर गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर झाले. काँग्रेस १७, उबाठा गट २१ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा जाहीर झालेल्या आहेत. जागा वाटपाबाबत मविआने महायुतीवर आघाडी घेतली आहे. महायुतीत अनेक जागांवर अजून खल सुरू असताना जागावाटप पूर्ण करून मविआच्या नेत्यांनी बाजी मारली आहे. परंतु स्थानिक काँग्रेसचे नेते मात्र हा पूर्णविराम नसून स्वल्पविराम असल्याचे सांगत भलतेच संकेत देत आहेत.

मविआच्या जागा वाटपावरून उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये ज्या प्रकारची हाणामारी सुरू होती ते पाहाता मविआत फूट पडेल असेच संकेत होते. परंतु जागावाटप मार्गी लावून मविआच्या नेत्यांनी एक मोठा अडथळा पार पाडला आहे. मविआचे रीमोट कंण्ट्रोल असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जागावाटपात फक्त १० जागा मिळाल्या. सर्वाधिक २१ जागा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेला मिळाल्या. दोन नंबरच्या १७ जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.

ठाकरेंनी जागावाटपा दरम्यान प्रचंड आक्रमकता दाखवली. सांगली, रायगड, ईशान्य मुंबई अशा अनेक जागा एकतर्फी जाहीर केल्या. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भिवंडीची जागा एकतर्फी जाहीर केली. सांगली आणि भिवंडी या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता. सांगलीच्या जागेसाठी तर विश्वजीत कदम, विशाल पाटील, विक्रम पाटील या नेत्यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. सांगलीबाबत आश्वासन घेतले होते. परंतु स्थानिक नेत्यांचा कडेलोट करत काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी ही जागा उबाठा शिवसेनेसाठी सोडली. त्यानंतर हा पूर्णविराम नसून स्वल्पविराम असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली आहे.

जागावाटप जाहीर केल्यानंतर सांगलीत विशाल पाटील यांची पोस्टर्स लागली आहेत. आमचे काय चुकले?  असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून जनता विचारते आहे. आता लढा जनतेच्या कोर्टात असे संकेत या पोस्टरच्या माध्यमातून सांगलीचे काँग्रेस नेते देतायत. विशाल पाटील हे दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर मैदानात उतरावे लागले होते. काँग्रेसचे तिकीट २०२४ मध्येही त्यांच्या नशिबी नाही. यंदाही त्यांना तसाच काहीसा जुगाड शोधावा लागेल अशी स्थिती आहे.

जे सांगलीत झाले तेच भिवंडीत झाले. दोन्ही ठिकाणी मित्रपक्षांनी काँग्रेसचा गेम केला. खरं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या तुलनेत काँग्रेसची परिस्थिती बरी आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सांगलीसारख्या हक्काच्या जागेवर माघार घेईल असे वाटत नव्हते. ठाकरे-पवारांच्या पक्षात उभी फूट पडली परंतु काँग्रेस पक्ष एकसंध राहिला. अशोक चव्हाण बाहेर पडले, परंतु मोठ्या संख्येने आमदार बाहेर पडले अशी चित्र दिसले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस मविआचे नेतृत्व करेल असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात जागांचा मोठा वाटा ठाकरेंना मिळाला.

उत्तर-पश्चिम मुंबईबाबत आग्रही असलेल्या संजय निरुपम यांना पक्षाने नारळ दिला. सांगलीसारख्या मजबूत जागेच्या मोबदल्यात उत्तर मुंबईसारखी हमखास पडणारी जागा पदरात पाडून घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी मविआला भोवण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटप जाहीर केल्यानंतर हाणामाऱ्या होण्यापेक्षा होऊ द्या उशीर अशी भूमिका बहुधा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेली आहे. हे आस्ते कदम… धोरण योग्य वाटते आहे. उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सातारा आदी जागांचा तिढा मार्गी लावल्यानंतरच या जागांचे वाटप जाहीर होईल.

हे ही वाचा:

ईडीने सादर केलेल्या पुराव्यांनुसार अरविंद केजरीवालांची अटक योग्यच

नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

प्रेमप्रकरणे, प्रेमविवाहाचे धोके सांगण्यासाठी केरळमध्ये दाखवला ‘द केरळ स्टोरी’

“राज्यातलं काँग्रेस नेतृत्व खूप कमकुवत झालंय”

प्रत्येक जागेवर सुरू असलेले खटले संपवल्याशिवाय जागा वाटप जाहीर करायचे नाही, असे हे धोरण आहे. बारामतीत बंडाचे निशाण फडकवणारे विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील अशा नेत्यांना शांत करण्यात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. महादेव जानकर यांना पुन्हा महायुतीकडे वळवण्याचे कामही त्यांनी केले. परंतु बराच घोळ अजून शिल्लक आहे, पालघर, ठाण्याच्या जागेवरून शिवसेना-भाजपामध्ये अद्यापि एकमत नाही. अमरावतीत बच्चू कडू भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बोलतायत. एवढा एक अपवाद वगळला तर मोठी हाणामारी कुठे दिसत नाही.

क्षमतेपेक्षा जास्त जागा एखाद्या पक्षाला मिळाल्या तर जिथे क्षमता नाही तिथे माती होण्याची शक्यता असते. महायुतीत भाजपा जास्त जागा लढवतो आहे त्याचे कारण नेमके हेच आहे. महायुतीच्या उमेदवारांबाबतही भाजपाने व्हेटो ठेवलेला दिसतोय. त्यामुळेच भावना गवळी यांना वाशिममधून पुन्हा उमेदवारी मिळाली नाही. पक्षप्रवेश केल्यानंतरही गोविंदाला तिकीट मिळण्याची शक्यता नाही. जागा कोणाच्या तरी पदरात टाकून मोकळे व्हायचे त्यापेक्षा थांबा, वाट पाहा आणि जिंकेल त्यालाच तिकीट द्या ही भूमिका योग्य आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version