चक्रव्यूह तोडता येईल का?

राष्ट्रवादीशपच्या प्रवक्ता बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी फक्त भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचे आदेश दिले आहेत. शिंदे तुजसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही… अशी बातमी सुत्रांच्या हवाल्याने व्हायरल होते आहे. हे जरी सत्य असले तरी त्यात नवीन काही नाही. सुप्रिया सुळे जर असे म्हणाल्या असतील तर इतिहासातील चुकांपासून शिकण्याची त्यांना सवय नाही, असेच म्हणता येईल. अकेला देवेंद्र क्या करेगा… असे त्या म्हणालेल्या, पुढे त्यांना काय काय पाहावं लागलं हे सर्वश्रूत आहे.

महाराष्ट्राचे गेल्या काही महिन्यातील राजकारण पाहिले तर विरोधकांचे टार्गेट देवेंद्र फडणवीस हेच आहेत, हे उघड आहे. संजय राऊतांपासून शरद पवारांपर्यंत एकच माणूस राज्यात विरोधकांच्या हिटलिस्टवर आहे. उबाठा शिवसेनेची तोफ क्वचित कधी तरी एकनाथ शिंदे यांच्याकडेही वळते. परंतु ठाकरेंचा दारुगोळाही जास्त फडणवीसांवरच खर्च होताना दिसतो. कारण राज्यात मविआच्या नेत्यांचे दोन्ही हातांनी ओरबाडणे सुरू होते. ते सत्तासोपान देवेंद्र फडणवीसांमुळेच बुडाखालून सरकले हे मविआच्या नेत्यांना ठाऊक आहे.

फडणवीस हेच टार्गेट होते. मविआचे नेते त्यांची खैर कधीच करत नव्हते. मनोज जरांगे जर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणाच्या नावाची जपमाळ ओढत असतील ते देवेंद्रच आहेत. जरांगे कोणासाठी तुतारी फुंकतात हेही सगळ्यांना माहीत आहे. सुप्रिया सुळे यांनी नवे काही सांगितले असेल तर ते शिंदे तुजसे बैर नही, हे आहे. भाजपाला जर चिंता करायची असेल तर याची करण्याची गरज नाही. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी शरद पवारांच्या मांडीवर बसेपर्यंत भाजपा नेतृत्व झोपा काढत होते. शिंदेही तसे करतील असे दिसत तरी नाही, तरी दुधाने तोंड पोळलेल्याने ताक फुंकून प्यायचे असते.

शरद पवार दोन-दोन वेळा शिंदेंची भेट घेतात. सूत्रांचा हवाला देऊन सुप्रिया सुळे यांच्या नावाने शिंदे तुजसे बैर नही, अशा पुड्या सोडल्या जातात हे काही भाजपाच्या दृष्टीने चांगले नाही. उद्धव ठाकरे सध्या नाराज आहेत. त्यांच्या नाराजीच्या तापावर उतारा म्हणून शिंदे तुजसे बैर नही… असा मेसेज दिला जात असल्याचे नाकारता येत नाही.

दोन सशक्त बैल सोबत असले, एकमेकांसाठी उभे असले तर सिंहालाही त्यांची शिकार करता येत नाही. मग कोल्हा सिंहाला सल्ला देतो, दोघांमध्ये मतभेद निर्माण करा. दोघांना वेगळे करा, मग एकेकाची शिकार करा. शरद पवारांना ही गोष्ट ठाऊक आहे. २०१९ मध्ये त्यांनी पंचतंत्रात सांगितलेल्या या गोष्टीचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या खुबीने वापर केला. उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन त्यांचे पार पोतेरे करून टाकले. आता भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचे पवारांसमोर मोठे आव्हान आहे. हिंदू मतं एकवटण्याचे सामर्थ्य आजही या दोन नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे २०१९ च्या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्याचे पवारांनी मनावर घेतलेले दिसते. सुप्रिया सुळे यांचे सुत्रांच्या हवाल्याने आलेले ताजे विधान त्याचेच संकेत देत आहेत.

हे ही वाचा:

‘शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ, लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणे गैर’

लोअर परळच्या कमला मिल परिसरात पुन्हा आगीचे लोट !

तीन दिवसांत भाजपाशी जोडले १ कोटी लोक

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश !

माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु मी आधुनिक अभिमन्यू असल्यामुळे चक्रव्यूहातून माझी सुटका करून घेईन, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. आपण चक्रव्यूहात अडकलो आहे, हे फडणवीसांना मान्य आहे, हा त्यांच्या विधानाचा अर्थ. सुप्रिया सुळे यांच्या सुत्रांनी दिलेल्या वक्तव्याचाही हाच अर्थ आहे. देवेंद्र चक्रव्यूहात अडकलेला आहे, त्यामुळे त्यांची खैर नाही, असे त्यांनी सुचवायचे आहे का?

फडणवीसांच्या क्षमतेचे चुकीचे निदान त्यांनी यापूर्वी केलेले आहे. अकेला देवेंद्र क्या करेगा? हा प्रश्न त्यांनी मविआची सत्ता असताना विचारला होता. फडणवीसांनी एकही शब्द न बोलता या प्रश्नाचे उत्तर दिले. ते सुळे यांच्यासह मविआत सहभागी असलेल्या सगळ्याच पक्षांना महाग पडला. त्यांच्या नव्या विधानाचे उत्तर फडणवीस कशा प्रकारे देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चक्रव्यूहात लढणारा कायम एकटा असतो, याची कल्पना फडणवीसांना असणार. विरोधात लढणारे युद्धाचे नियम पाळणार नाहीत, हेही त्यांना ठाऊक असेल. तरीही चक्रव्यूहातून सुटका करून घेण्याचा आशावाद ते व्यक्त करीत आहेत. तो कितपत खरा ठरेल याचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version